अकोला- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत सिन्हा यांना फोन करुन, त्यांच्याशी चर्चा केली आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी यशवंत सिन्हा यांनी सोमवारपासून अकोल्यात आंदोलन सुरु केलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अकोला पोलीस मैदानात यशवंत सिन्हा आणि शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पण अजूनही त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. आज भाजपाचे नेते शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी यशवंत सिन्हांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार असल्याचं समजतं आहे.
एकीकडे भाजपाचेच ज्येष्ठ नेते सरकारविरोधात रस्त्यावर आले असताना दुसरीकडे विरोधकांनीही यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधत आहेत.
शेतकरी जागर मंचाच्या वतीने, यशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून छेडण्यात आलेल्या आंदोलनाला, दुसर्या दिवशी व्यापक पाठबळ मिळाल्याचे दिसून आलं. नाना पटोले मंगळवारी सकाळीच अकोल्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस मुख्यालयात जाऊन यशवंत सिन्हा यांची भेट घेतली. अरुण शौरी आणि वरुण गांधी हे ज्येष्ठ नेतेही अकोल्यात दाखल होणार असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणादरम्यान केला.
यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी सायंकाळी सिन्हा, तुपकर व सुमारे २00 शेतकर्यांना ताब्यात घेऊन पोलिस मुख्यालयात ठेवले. संध्याकाळी त्या सर्वांची मुक्तता करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले; मात्र सिन्हा यांनी पोलिस मुख्यालय सोडण्यास नकार दिला. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची तारांबळ उडाली. सिन्हा यांच्यासह आंदोलकांनी पोलिस मुख्यालयातच रात्र काढली.
दोन मुख्यमंत्र्यांनी दिले सिन्हा यांना सर्मथनयशवंत सिन्हा यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून पाठिंबा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये सिन्हा यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची पाठराखण करताना मला सिन्हा यांची काळजी वाटते, असे स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी खासदार दिनेश त्रिवेदी यांना पाठवित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. .