यवतमाळातील कुख्यात गुंड प्रवीण दिवटेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2016 01:07 PM2016-08-27T13:07:27+5:302016-08-27T13:07:27+5:30
विदर्भाच्या गुन्हेगारी वर्तुळात नेटवर्क असलेला यवतमाळातील कुख्यात गुंड तथा काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रवीण दत्तूजी दिवटे याचा शनिवारी सकाळी निर्घृण खून करण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २७ - विदर्भाच्या गुन्हेगारी वर्तुळात नेटवर्क असलेला यवतमाळातील कुख्यात गुंड तथा काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रवीण दत्तूजी दिवटे याचा शनिवारी सकाळी निर्घृण खून करण्यात आला. त्याची पत्नी उषा दिवटे सध्या काँग्रेसची नगरसेविका आहे.
पोलीस सूत्रानुसार, शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अज्ञात सहा ते आठ हल्लेखोर दिवटेच्या वाघापूर रोडवरील घरवजा कार्यालयात शिरले. तेथेच त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्या त्याच्या छातीत आरपार गेल्या. शिवाय त्याच्यावर तलवार, खंजीर यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला चढविण्यात आला. गंभीर अवस्थेत दिवटेला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिवटेवरील हल्ल्याची वार्ता शहरात वाºयासारखी पसरली. वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्या घराच्या परिसरात चार ते पाच हजार तरुणांनी गर्दी केली होती. गुंठा राऊत खून खटल्यातून प्रवीण दिवटेची नुकतीच सुटका झाली होती. तो आगामी नगरपरिषद निवडणुकीची तयारी करीत असतानाच त्याचा ‘गेम’ झाला. त्याच्या खुनामागील नेमके कारण आणि मारेकरी कोण, हे स्पष्ट नसले तरी टोळी युद्धातून हा खून झाल्याचे पोलीस सांगत आहेत. या खुनात परंपरागत प्रतिस्पर्धी टोळीचा तर हात नाही ना, या दिशेने पोलीस तपास करीत आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी भेट दिली. घटनास्थळी बुलेट, शस्त्रे आढळून आली. घटनास्थळी साचलेले रक्ताचे तळे आणि एकूणच स्थिती पाहता हल्लेखोरांनी चार ते पाच किलो मिरची पावडर वापरली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांनी प्रयत्न चालविले आहे. प्रवीण दिवटे हा नागपूर आणि पुण्यातील मोठ्या टोळ्यांशी कनेक्ट असल्याचे पोलीस सांगतात. फरारीत तो याच शहरात आश्रयाला राहायचा. त्याला येथील काँग्रेसच्या एका गटाचे पाठबळ असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)