लडाखमधील शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना यंदाचा ' लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:27 PM2020-07-28T17:27:43+5:302020-07-28T17:29:10+5:30
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीदिनी म्हणजेच १ ऑगस्टला दरवर्षी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी दिला जातो पुरस्कार.
पुणे: विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढी घडविणारे, लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार करणारे आणि शिक्षणात गुणात्मक बदल करणारे लडाखमधील शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना यंदाचा ' लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे.
लडाख सीमेवरील अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादननिर्मितीसाठी भारताला ' आत्मनिर्भर' बनविण्याचा नारा दिला जात असताना सोनम वांगचुक यांनी स्वदेशीचा पुरस्कार हेच चीनच्या आव्हानाला खरे उत्तर ठरेल अशी ठाम भूमिका मांडली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग हे जगासाठी प्रेरणादायक ठरले.
शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी सोनम वांगचुक यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे , येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता होत असून, या पार्श्वभूमीवर वांगचुक यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे 37 वे वर्ष आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ रोहित टिळक उपस्थित होते.
लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिरामध्ये होणार्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे त्यादिवशी कार्यक्रम होणार नाही. मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नियोजन करून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल असे त्यांनी सांगितले.
...........
लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आम्ही खूप कार्यक्रमांचे नियोजन केले होते. मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. दि.१ व २ ऑगस्टला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने ' युगपुरुष' नावाची व्याख्यानमाला वेबिनारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. यात लोकमान्य टिळक यांचे विविध पैलू उलगडणारी मान्यवरांची व्याख्याने होणार असून, लोकमान्य टिळक यांच्यावरील छोटी फिल्म दाखवली जाईल. तसेच एक विशेषांकही काढण्यात येणार असल्याचे डॉ दीपक टिळक यांनी सांगितले.
.…..