आम्ही काय चूक केली, ते सांगावे लागेल; राजीनामा देऊन निवडणूक लढवा - आदित्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:57 AM2022-06-28T06:57:42+5:302022-06-28T06:58:44+5:30
एकनाथ शिंदे आणि समर्थकांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे.
मुंबई : जे पळून गेले आहेत ते स्वत:ला बंडखोर म्हणत आहेत. जर त्यांना बंड करायचे होते तर इथेच करायला हवे होते. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. जेव्हा ते आमच्यासमोर असतील तेव्हा डोळ्यात डोळे घालून काय चूक केली हे सांगावे लागेल. ती त्यांची दुसरी परीक्षा असेल, अशा शब्दांत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला आव्हान दिले.
एकनाथ शिंदे आणि समर्थकांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. शिवसेनेकडून पक्ष संघटनेवरील ताबा कायम ठेवण्याची धडपड सुरू आहे. आदित्य ठाकरेही विविध मेळावे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत.
पळून जातात ते...
एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बाेलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दगाफटका करणारे, पळून जाणारे जिंकत नाहीत.
काही फुटीर आमदार ज्यांच्यात बंड करण्याची हिंमत नाही ते पळून गेले आहेत. खरेच हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान देतानाच महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही याचा पूर्ण विश्वास आहे.
सर्वांचे प्रेम आमच्यासोबत आहे. जे दगाफटका करतात, पळून जातात ते जिंकत नाहीत, असेही ठाकरे यांनी सांगितले.