आपले महावितरण आपली जबाबदारी; वीजबिल भरण्यासाठी राबविणार प्रचार मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 11:53 AM2020-11-24T11:53:45+5:302020-11-24T11:55:11+5:30
लॉकडाऊन काळात एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ६४ लाख ५२ हजार इतकी आहे.
पिंपरी : वीजबिल थकबाकी वाढल्याने महावितरणसमोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. ग्राहकांनी वीजबिल भरावे, यासाठी कामगार संघटना मदतीला धावल्या आहेत. त्यांनी ह्यआपले महावितरण आपली जबाबदारीह्ण या अंतर्गत प्रचार मोहीम हाती घेतली आहे.
टाळेबंदी (लॉकडाऊन) नंतर वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर महावितरणसमोर उभा राहिला आहे. लॉकडाऊन काळात एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ६४ लाख ५२ हजार इतकी आहे. त्यामुळे दैनंदिन संचलन करण्यातही महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे वीजबिल भरणा मोहीम हाती घ्यावी लागत आहे.
महावितरणमुळेच टाळेबंदी असूनही अखंडित सेवा दिली. त्यामुळे आपण घरात टीव्ही पाहू शकलो, तसेच घरून काम करणेही त्यामुळेच शक्य झाले. कोरोनाकाळात सेवा देताना अनेक विद्युत कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यानंतरही सेवेमध्ये खंड पडला नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे वीज यंत्रणा कोलमडली. तेव्ही हेच वीज कर्मचारी आपल्या गावापासून दूर अंतरावर वीज सेवा सुरळीत करण्यासाठी झटत होते. वीज कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करून नियमित वीज भरण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
--------
केबल, मोबाईल शुल्क माफ झाले का?, मग वीज मोफत का?
कोरोना काळात नागरिकांना केबल टीव्ही, मोबाईल, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर मोफत मिळाला का ? मग वीज मोफत मिळेल अशा प्रचाराला बळी का पडता, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना काळात चोवीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------
कंपनी जगली तर कामगार जगणार आहे. त्यामुळे ही मोहीम हाती घेतली आहे. ऊर्जामंत्र्यांनी मोफत वीजेबाबत घोषणा केल्याने अनेकांनी वीज माफीच्या अपेक्षेने बिल भरले नाही. आता हा मुद्दा राजकीय झाला आहे. मात्र, नागरिकांनी आश्वासनांना न भुलता वीजबिल भरावे.
नीलेश खरात, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ
----------