हवं ते मिळवण्याची 'हीच ती वेळ'; काँग्रेस नेत्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:29 AM2019-10-29T11:29:07+5:302019-10-29T11:57:53+5:30
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेवरुन युतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे युतीत असलेली शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही' असा सल्ला सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे. तांबे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून सल्ला दिला असून यामध्ये स्वतः चा अनुभव ही सांगितला आहे.
'2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले. मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजितला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या' असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपाच्या मदतीने माझा पराभव केला. हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती' असं म्हणत सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘बी’ प्लॅन तयार असून, शिवसेनेचे 15-16 आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत युतीचा 161 जागांवर विजय झाला असून भाजपाचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय (आघाडीसोबत जाण्याचा) असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे. जर प्रत्यक्षात शिवसेनेने आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर, त्यासाठी फडणवीस यांनी आपला ‘बी’ प्लॅन तयार करून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून तीन-चार वेळा निवडून आल्यानंतर सुद्धा मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांचा एक गट फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.