पुणे : पुण्यातील कवी सुशीलकुमार शिंदे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रंथालीने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.मूळचे इंदापूरचे असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचे बारावीनंतरचे शिक्षण पुण्यातील शेतकी महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीएची पदव्युत्तर पदवी संपादन केली. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहामध्ये त्यांनी शहराच्या परिवेशाबाहेर जगणा-या माणसाच्या मनातील घुसमट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘उजेड पेरणा-या मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत’ अशा ओळींमधून त्यांनी समाजव्यवस्थेतील अनेक परंपरांचे गुलाम न राहता त्याविरुद्ध बंडाची असलेली क्षमता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.‘लोकमत’शी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘कवी आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतराने माणूस म्हणून व्यथित होत असतो. हीच व्यथा शब्दबध्द करताना कवितेचा जन्म होतो. साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा युवा पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाला आहे. आपण जे काही लिहिण्याचा प्रयत्न करतो, ते वाचकांपर्यंत पोहोचते यातील समाधान काही वेगळेच असते. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासारख्या काहीतरी लिहू पाहणा-याला मिळालेली कौतुकाची थाप आणि पोचपावतीच आहे.’
पुण्यातील कवी सुशीलकुमार शिंदे यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 4:41 PM