जिल्हा परिषद शाळेत फुलले नंदनवन!
By admin | Published: August 16, 2015 12:10 AM2015-08-16T00:10:34+5:302015-08-16T00:10:34+5:30
जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या शाळांच्या खालावलेल्या शैक्षणिक दर्जावर एकीकडे ओरड होत असली तरी, वाशिम जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद शाळा या परिस्थितीला अपवाद ठरली आहे.
- सुनील काकडे, वाशिम
जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या शाळांच्या खालावलेल्या शैक्षणिक दर्जावर एकीकडे ओरड होत असली तरी, वाशिम जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद शाळा या परिस्थितीला अपवाद ठरली आहे. या गावातील प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि शासनाच्या अनुदानावर विसंबून न राहता मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळेत अक्षरश: नंदनवन फुलविले आहे.
रिसोड तालुक्यातील सोमठाणा हे जेमतेम १५०० लोकवस्तीचे गाव. येथील बहुतांश ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचे साधन प्रामुख्याने शेतीच असून, अनेक वर्षे शिक्षणाचा साधा गंधही गावकऱ्यांना नव्हता. २०११पर्यंत या गावातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती अत्यंत वाईट होती. गावातील गुरं शाळेच्या आवारातच बांधली जायची. २०११ साली मुख्याध्यापक डी.आर. शिंदे यांनी या शाळेची धुरा खांद्यावर घेतली आणि हळूहळू चित्र पालटायला लागले.
त्यांनी गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सोबतच शाळेचा परिसर स्वच्छ अन् सुंदर कसा होईल, याकडेही लक्ष केंद्रित केले. त्या वेळी शाळेची पटसंख्या ४५ होती. मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांनी ती वाढून ७५पर्यंत पोहोचली. त्यामुळे शाळेला एक शिक्षकही वाढवून मिळाला. शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवितानाच, त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी स्वत: ३० हजार रुपये खर्च करून शाळेत जलकुंभ उभारला. गावकऱ्यांनी ५० हजार रुपयांची लोकवर्गणी करून शाळेला कूपनलिकेची सोय करून दिली.
२०१४ साली सतीश शिंदे नावाचे इंग्रजी शिकविणारे शिक्षक या शाळेला लाभले. त्यांनी इयत्ता तिसरी ते पाचवीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीत पारंगत केले. त्यामुळेच की काय, इतर जिल्हा परिषद शाळांच्या तुलनेत या शाळेतील मुलांचे इंग्रजी वाखाणण्यासारखे आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना २५पर्यंतचे पाढे मुखपाठ आहेत. शिक्षक आणि पालकांचा नियमित संपर्क असून, विद्यार्थ्यांच्या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे. या वर्षी शाळेची पटसंख्या ७५ वरून ९३ वर पोचल्यामुळे चवथ्या शिक्षकाची जागा निर्माण झाली
आहे. गावातील नारायण शिंदे,
भागवत मापारी यांच्यासारख्या समाजसेवकांची शाळेच्या
प्रगतीमध्ये मदत झाल्याचा उल्लेख मुख्याध्यापक शिंदे यांनी केला. शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेल्या येथील ग्रामस्थांचे कार्य इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
शाळा परिसरात १५० वृक्ष
सोमठाणा जिल्हा परिषद शाळा परिसरात १५० फळझाडे व मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शाळा परिसरातील वडाच्या महाकाय वृक्षाला चबुतरा बांधून त्याची
रंगरंगोटी करण्यात आली. त्यावर मराठी व इंग्रजीत जिल्हे, विभाग, वार, महिन्यांचा उल्लेख करण्यात आला.
झाडाच्या फांद्यांना १०० पाट्या टांगून त्यावर इंग्रजी शब्द व चित्रे रेखाटण्यात आली आहेत. यासाठी जवळपास १५ हजार रुपये खर्च आला, तो गावकरी व शिक्षकांनी सामूहिकरीत्या भागविला. मार्च २०१५मध्ये १ लाख ४७ हजार रुपयांची लोकवर्गणी उभारून शाळेच्या मागच्या बाजूला जाळीचे कुंपन तयार करण्यात आले.
विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेचा परिसर मनोहारी दिसून येतो. जिल्हा परिषदेची शाळा असली तरी त्यात विनापरवानगी कुणालाही प्रवेश मिळत नाही, हे विशेष.
गावकऱ्यांनी दिली शाळेला पत्र्याची खोली : आपल्या मुलाबाळांची शैक्षणिक प्रगती पाहून आनंदाने हरखून गेलेल्या सोमठाणा येथील पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला मुक्तहस्ते आर्थिक योगदान देऊ केले आहे. शाळेला वर्गखोल्या कमी असल्यामुळे लोकवर्गणी करून ३० हजार रुपयांचा निधी उभा करण्यात आला. यातून शाळेसाठी पत्र्याची एक खोली बांधण्यात आली.