- किरण अग्रवाल संस्कृती, संस्कारांचे मंथन घडवून समाजाच्या उत्थानासाठी नवनिताचे कुंभ भरून घेण्याचे प्रयोजन कुंभमेळ्यामागे असले आणि तसे काही प्रमाणात घडूनही येत असले तरी अलीकडील काळात त्याला एका इव्हेण्टचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे, त्यामुळे उत्सव साजरा होण्याचे समाधान लाभून संबंधिताना पुण्य पदरी पडले असे वाटत असले तरी, धार्मिक आस्था अधिक प्रगाढ होण्याखेरीज सामाजिक तसेच प्रागतिक विचारांचे मन्वंतर घडून येणे राहूनच जाताना दिसते.उत्तर प्रदेशातील प्रयागराज (अलाहाबाद) येथे होत असलेल्या कुंभमेळ्याकडे दिव्य व भव्य कुंभ म्हणून पाहिले जात आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साधू सांप्रदायातील असल्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभक्कम पाठबळ उपलब्ध झाल्याने या कुंभाला वेगळी झळाळी प्राप्त होणे स्वाभाविकही आहे, तसे झालेही. त्यामुळे यंत्रणा घरचे कार्य म्हणून कुंभकामात जुंपली आहे. नाशिकवगळता उर्वरित सर्व कुंभमेळ्यात (प्रयागराज, उज्जैन व हरिद्वार) शैव व वैष्णव पंथीय आखाडे एकत्र स्नान करतात. त्यामुळे साधू समाजाचा पसारा मोठा असतो. प्रयागराज येथे नदीचे विस्तीर्ण पात्र आहे, अन्य ठिकाणी जागा कमी, नदी पात्र तुलनेने लहान अशा मर्यादा असतात. त्या प्रयागला नाही. त्यामुळे गंगा व यमुना काठी तब्बल ४५ एकर क्षेत्रात कुंभ ग्राम उभारून साधुसंतांसह भाविकांना आवश्यक त्या सुविधा देणे सरकारलाही शक्य झाले. नाशिकला गोदावरी नदी शहराच्या मध्यवस्तीतून वाहते त्यामुळे भाविकांच्या गर्दीचा ताण शहरावर पडतो. प्रयागराजला नदी व संगम क्षेत्र शहराबाहेर असल्याने बाहेच्या बाहेर गर्दीचे दळणवळण घडवून आणता येते. त्यामुळे शहराच्या अडचणींवर फारसे लक्ष न द्यावे लागता यंत्रणांना सुविधा पुरवण्यावर भर देता येतो. प्रयागराजचा कुंभ भव्यदिव्य करणे त्यामुळेच शक्य होत आहे.पण, हे होत असताना कुंभाचा संस्कृती मंथनाचा, अनुष्ठानाचा जो मूलभूत गाभा राहिला आहे किंवा विचारमंथन घडून समाजाला नवी मार्गदर्शक दिशा मिळणे अपेक्षित आहे, ते मात्र दिवसेंदिवस बाजूला पडत चालल्याचे दिसते. आखाड्यांमध्ये अहोरात्र कीर्तन, प्रवचन व निरनिराळ्या कथांचा जागर होत असतो खरा; पण श्रद्धेच्या पलीकडे सामाजिक जाणिवांचे अगर काळानुरूप बदलांचे पडसाद त्यात उमटताना दिसत नाही. पुरुष व महिला साधुसंतांसोबत यंदापासून तृतीयपंथीयांना या प्रवाहात सामावून घेऊन लिंगसमानता साधली गेली. ही गोष्ट लक्षणीय व ऐतिहासिक ठरली मात्र दुसरीकडे अंधश्रद्धांचं स्तोम मात्र तसेच आहे. ते काही सरताना दिसले नाही. मनुष्य जीवनात अंतिमत: कर्मच महान असल्याचे न सांगता दानदक्षिणेच्या स्वरूपानुसार हर प्रकारच्या समस्यामुक्तीचे अफलातून उपाय सांगणारे या कुंभग्राममध्ये ठायीठायी भेटतात. त्यांना बाजूला सारण्याची भूमिका काही शासन किंवा साधुसमाजानं घेतलेली दिसली नाही.पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. समाजालाच काय, कुटुंबीयांनाही एकत्र यायची संधी अपवादाने मिळे. अशा काळात एकांतात राहून चिंतन करणाऱ्यांनी व सामान्य जणांनी एकत्र येऊन समाजासाठी विचार करण्याकरता कुंभमेळे भरवले जाऊ लागलेत, त्यासाठी चार ठिकाणे निश्चित केली गेली. दर तीन वर्षांनी एकत्र येऊन समाजाला नवीन काही द्यायचे अशी त्यामागील कल्पना. समाजाच्या उत्थानासाठीच मोठमोठे यज्ञदेखील केले जात. त्याने संपूर्ण वातावरण भारून नैसर्गिक ऊर्जेचा लाभ अपेक्षिला जात असे. यज्ञातील अग्नी वर वर जाणारा, तर कुंभातील जल प्रवाही, हाच काय तो दोघांतील फरक. समाजही काळानुरूप प्रवाहित राहायला हवा अशी या कुंभामागील रचना वा अपेक्षा. पण आता तेच होताना दिसत नाही.साधारणपणे पंधराव्या व सोळाव्या शतकापर्यंत धर्म व समाज संस्कृतीच्या एकत्रित येण्याचे असे शुद्ध स्वरूप होते; पण त्यानंतर त्यात अंतर पडत गेले. त्यामुळे १९ व्या व विसाव्या शतकात कुंभमेळ्यांना उत्तरोत्तर उपासनेऐवजी इव्हेण्टचे स्वरूप येत गेले. साधुसंतांना अगोदर राजे-राजवाडे यांचा आश्रय लाभे, आता ती जागा सरकारने घेतली आहे. अर्थात आयोजनाचा वाढ विस्तार पाहता तेही आवश्यक आहेच; पण त्याचा अतिरेक होऊ लागला. दरम्यान समाजमाध्यमे वाढली, त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्ताने अध्यात्माची जागा कुतूहल व जिज्ञासेने घेतली. त्यातून अनेकजण या प्रांतात ओढले गेले. जनता पायाशी बसते, मानसन्मान तर लाभतोच शिवाय मेहनतीखेरीज अर्थार्जनही होते म्हटल्यावर गर्दी वाढून दर्दी बाजूला पडले. अध्यात्म हरवले. चमकणे, मिरवणे वाढले.अन्यथा साधुसंतांना कशाला हवी आणि कुणापासून हवी सुरक्षा? पण त्यांनाही बंदूकधारी कमांडोजचे आकर्षण वाटू लागले. काम, क्र ोध, मद, मोह, मत्सरादी षड्रिपुंनी त्यांनाही घेरले. त्यातून धर्म रस्त्यावर आणला गेला. कोण मोठा वा प्रभावशाली याची स्पर्धा सुरू झाली. त्यातूनच दर्शन कमी आणि प्रदर्शन जास्त सुरू झाले. कुंभमेळ्यातील साधुसंतांची शिबिरे पाहिली तर मती गुंग होते. अगदी २/५ लाखांपासून ते चक्क एकेक कोटी रुपयांचा खर्च फक्त स्वागत कमानीवर करण्यात आलेला दिसतो. प्रयागराजच्या कुंभग्राममध्ये अशा अनेक कमानी सहज दिसतात. साधूंच्या आखाड्यातील संत निवास, सभामंडप, भक्तांची निवास व्यवस्था, स्वयंपाकघर, रोजचा भंडारा आदी व्यवस्थेवर होणारा खर्च वेगळा. स्वाभाविकच ज्याची चमक अधिक तो भारी, असा समज बळावण्यास संधी मिळून जाते. घसरण झाली किंवा हेतू हरवत चालला आहे तो या वाढत्या प्रदर्शन वृत्तीतूनच!अर्थात, अलीकडे साधू सांप्रदायात नवीन उच्चविद्याविभूषित संत येऊ लागले आहेत. कर्मकांडापलीकडे जाऊन नवा समाज घडवण्याची त्यांची क्षमता आहे. केवळ अंगाला राख फासून व वेश बदलून संतत्व साधता येत नाही, त्यासाठी विचार- आचारातले परिवर्तन व त्यासाठी शिक्षण गरजेचे असल्याचे ते सांगतात. फक्त अन्नदान भंडारे चालवून व व्यासपीठीय उत्सव भरवून काम भागणार नाही तर शाळा, महाविद्यालये काढावी लागतील, रुग्णालये उभारावी लागतील, तीच खरी सेवा, असेही ते सांगतात. तसा त्यांचा प्रयत्नही दिसतो; पण पारंपरिक पठडीतली व्यवस्था त्यांच्या मार्गातील अडसर ठरू पाहते. कारण आपल्या हातून आहे ते सुटून जाण्याची भीती त्यांच्या मनात असावी. म्हणूनच, भाविकांच्या मनातील अंधश्रद्धांची जळमटं तशीच ठेवण्याकडे आणि विनासायास फलप्राप्तीची अपेक्षा कायम ठेवण्याकडेच जास्त कल दिसतो. अंधविश्वास बाजूला सारून निखळ आनंद, समाजाचं-विचारांचं प्रवाहीपण ही यासा-याची गरज आहे, मात्र केवळ इव्हेण्ट बनत चाललेल्या कुंभपर्वातून ते मंथन घडून येईल का..? शंकाच आहे!आखाड्यात गर्दीचा महापूरप्रयाग अर्धकुंभातली पहिली पर्वणी मकरसंक्रांतीला पार पडली. सुमारे दीड कोटी लोकांनी स्नान केले, अशी सरकारी आकडेवारी सांगते, आता खरी परीक्षा आहे ती ४ फेब्रुवारी रोजी होणाºया दुसºया शाहीस्नानाच्या पर्वणीला. त्यादिवशी असलेल्या मौनी अमावास्येला त्रिवेणी संगमावरील स्नानाचं अधिक महत्त्व धर्मशास्रात सांगितले असल्याने मोठी गर्दी उसळते. त्यादृष्टीने प्रशासन व आखाडेही तयारीला लागले आहेत. अनेक आखाड्यात पहिल्या पर्वणीलाच भक्तांसाठी जागेची कमतरता जाणवली, सुमारे दुपटीपेक्षा अधिक भक्त शिबिरात होते. विशेष म्हणजे ही सर्व जनता साधुसंतांचा देणगीदार वर्ग असतो, म्हणजे तेच त्यांचे खरे आश्रयदाते, त्यामुळे प्रत्येकाला सुविधेची अपेक्षा असते. जागा व साधनाच्या मर्यादा लक्षात घेता सर्वांचे समाधान शक्य नसते, तरी आखाडे व खालश्यांचे दुसºया पर्वणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.सब गंगामाई है!प्रयागला त्रिवेणी संगम. एरव्हीही तिथं देशभरातून लोक येतात. मुख्य म्हणजे अमुक जागीच स्नान करू द्या, असा हट्ट कुणी करत नाही. यहा से वहा तक सब ही गंगामाई है, म्हणत जागा मिळेल तिथे भाविक स्नान करून घेतात, त्यामुळेही एका विशिष्ट भूभागात गर्दीचा ताण पडत नाही.स्नानानंतर आम भाविक जत्रेत आल्यासारखे कुंभग्राममध्ये फिरून घेतात व जिथे भंडारा सुरू असेल तिथे उदर भरण करून परतीलाही लागतात. डोक्यावर श्रद्धेचं गाठोडं व कडेवर हातात भिंगरी आदी खेळणी. ज्येष्ठांचे स्नान व पोराबाळांची जत्रा हेच यातील अध्यात्म म्हणायचे.भाषिक समरसता..कुंभमेळ्यात हरवणं - शोधणं हे काही आजचं नाही. मात्र आता तंत्रज्ञानामुळे कुंभात हरवाहरवी कमी होते आहे. मात्र तरीही हरवल्या-सापडल्याचा पुकारा माइकवरून होतोच. प्रयागमध्ये तो पहिल्या पर्वणीला झालाच ! ‘ऐ लखन के दादू हम यहा झुसी पुलीस थाना मे तोहार इंतजार कर रहत है...’ असा खणखणीत आवाज हिंदीत येतोच मात्र याखेरीज तेलुगू, मल्याळी, गढवाली, पंजाबी, कानडी, भोजपुरी, पश्तुनी आदी अनेक भाषेतील पुकारे ऐकायला मिळाले. देशात एरव्ही न दिसणारी भाषिक समरसता अशी प्रयागला पहायला मिळाली.राजकीय जाहिरातबाजी जोरातप्रयाग कुंभाला लाभलेले सरकारी बळ हेदेखील विशेष ठरावे. आखाड्याच्या प्रवेशद्वारावर तैनात केलेले बंदूकधारी कमांडो, प्रमुख साधुसंतांना पुरवलेली वैयक्तिक पोलीस सुरक्षा यामुळे संबंधितात समाधान दिसते. रस्त्यारस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छबी असलेले सरकारी जाहिरातींचे असंख्य फलक लावून या दोघा नेत्यांनी व त्यांच्या निमित्त त्यांच्या सरकारने धर्मकारणातील आपले अधिकचे स्वारस्य दाखवून दिले आहे. स्नान घाटावरील शेकडो वस्रांतरगृहांवरही तेच आढळून येते. त्यातून त्यांच्या धार्मिक आस्थेचे राजकीय इनकॅशमेण्ट घडून येणे स्वाभाविक ठरावे. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री निरंजना ज्योती यांचा या कुंभात महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक केला गेला तर केंद्रीय मंत्री उमा भारती व स्मृती इराणी यांनीही पहिल्या पर्वणीला स्नान केले.
kiran.agrawal@lokmat.com(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीचेनिवासी संपादक आहेत.)