राजकीय रणनीतीकार
प्रशांत किशोर यांची मुलाखत
गोव्यासारख्या छोट्या राज्याच्या विधानसभेत तृणमूल काँग्रेस पक्षाने प्रवेश केला आहे. पक्षाची इतकी शक्ती गोव्यासारख्या राज्यात का खर्च केली जात आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करता येते हे ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये दाखवून दिले. भाजपला नमवता येतच नाही हा काहीजणांचा समज त्यांनी खोटा ठरवला आहे. गोव्यातही तृणमूलच्या या क्षमतेवर पक्षाला शिक्कामोर्तब करायचे आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला यशस्वीपणे टक्कर देतो, त्या मणिपुर, उत्तराखंड वगैरे राज्यांमध्ये आम्ही गेलेलो नाही. गोव्यात विरोधी पक्ष अस्तित्वहीन आहे, म्हणून तृणमूलला यावे लागले.
गोव्याविषयी तुमचा अभ्यास, अंदाज काय आहे?
आम्ही गोव्यात व्यापक सर्वेशन करत आहोत. पश्चिम बंगालमध्येदेखील हीच प्रक्रिया होती.. लोकांचे खरे प्रश्न समजून घेऊन त्या आधारे प्राधान्यक्रम ठरवणे. आम्ही येत्या डिसेंबरमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी तृणमूलचा चेहरा जाहीर करू. मतदारांना नेतृत्वाविषयी स्पष्टता हवी असते. आम्ही मतदारांना संभ्रमात ठेवणार नाही. आमचे संघटनात्मक कामही निवडणुकीपूर्वी उभे राहील.
साधारणत: १२० दिवसांत तृणमूलला गोव्यात सत्तेपर्यंत पोहचता येईल का?
मी यापूर्वी देशातील बड्या नेत्यांसाठी, मुख्यमंत्र्यांसाठी काम केले आहे. नरेंद्र मोदी यांना २०१४ साली भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून जाहीर केले गेले व मग पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ! त्यावेळीही अवघ्या शंभर दिवसांत भारतातील शंभर कोटींहून अधिक लोकांच्या तोंडातून मोदी, मोदी असा नारा गाजू लागला. गोवा तर एकदम छोटे राज्य आहे. आम्हाला १००-१२० दिवस पुरेसे आहेत.
तुमच्या कामाची पद्धत कशी असते?
आमची कामाची पद्धत लष्करासारखी असते. शेकडो माणसे फिल्डवर असतात. आम्ही लष्कराप्रमाणे वर्षाचे साडेतीनशे दिवस युद्धाची पूर्वतयारी करतो व फक्त दहा दिवसच युद्ध करतो. दहा दिवसांत आम्ही सोक्षमोक्ष लावतो. मात्र त्या दहा दिवसांसाठी वर्षभर अत्यंत कठोर परिश्रम घेत पूर्वतयारी केलेली असते. राजकारण हे आता अर्धवेळ करायचे काम राहिलेले नाही. आम्हाला गोव्यात येऊन अवघे काही दिवस झाले, पण गोमंतकियांच्यामध्ये सध्या तृणमूलचीच चर्चा तरी आहे. गोव्यात ५० टक्के नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाईल. ज्यांनी आयुष्यात कधीच निवडणूक लढवली नाही, अशा व्यक्ती तुम्हाला तृणमूलच्या चिन्हावर यावेळी गोव्यात रिंगणात उतरलेल्या दिसतील.
भाजपला पराभूत करता येते हाच संदेश तुम्ही देशभरात देऊ पाहता, पण तुम्ही काँग्रेसची हानी करत आहात; असे वाटत नाही का?
ही काँग्रेसची हानी कशी? जिथे काँग्रेस पक्षाचे काम कमी पडते तिथे आम्ही काम करतो, पण आम्ही भाजपचे मतदार आहेत त्यांनाही लक्ष्य करतो. गोव्यातील तृणमूलमध्ये अनेक हिंदू नेते असतील. अनेक हिंदू पाठीराखे असतील. सर्व जाती-धर्मांचे लोक असतील. गोव्यात ६५ टक्के हिंदू मतदार असले तरी, भाजपला कधीच ३५ टक्क्यांहून अधिक मते मिळत नाहीत. २०१२ साली एकदाच भाजपला ३५ टक्के मते मिळाली होती. एरव्ही त्यांना त्याहून कमी मते मिळतात. याचाच अर्थ असा की, सर्व हिंदू भाजपला मते देत नाहीत. भाजप पराभूत होत नाही असे मुळीच नाही; विरोधक त्यांचा पराभव करण्यात कमी पडतात !
आम्ही गोव्यात कुणाशी युती करणार नाही. स्वबळावर लढणार आहोत. गोव्यातील एक-दोन प्रादेशिक पक्ष जे कधी काँग्रेस किंवा भाजपच्या गोटात गेले नाहीत ते तृणमूलमध्ये विलीन होऊ शकतात. आम्ही गोवा विधानसभेच्या एकूण चाळीसपैकी पस्तीस जागा लढवू. आम्हाला बहुतेक जागा जिंकायच्या आहेत, जेणेकरून आम्ही हे सगळे आमदार एकत्र ठेवू शकू. गोव्यातील राजकीय अस्थिरता आम्हाला संपवायची आहे.
मुलाखत : सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा