बदलला दिवाळीचा फराळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 07:00 AM2019-11-17T07:00:00+5:302019-11-17T07:00:15+5:30
गेल्या १०-१५ वर्षांत दिवाळी फराळाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. लाडू, करंजीची जागा मिसळपाव, बटाटेवडा, भजी, मसाला डोसा इ. एवढेच काय परवा कोथरूडला एका कार्यकर्त्याच्या घरी फराळासाठी गेलो, तर तेथे चक्क ऑम्लेट ब्रेड ठेवला होता.
- अंकुश काकडे
दिवाळी सुरू झाली, की ८ दिवस दिवाळी फराळ घरी करण्याची गडबड असे. रोज सर्व मंडळी फराळ करण्यात गुंतलेली असत आणि त्यावेळी फराळाचे जिन्नसही किती असायचे, बुंदीलाडू, रवालाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, अनारसे, मोठी शेव, तिखट शेव, पोह्याचा चिवडा, कडबोळे आणि हे सर्व पदार्थ घरातील महिला करीत. दिवसेंदिवस दिवाळीचे स्वरूपही बदलत गेले. घरातील एकत्र कुटुंबपद्धती कमी होत गेली. घरातील महिलादेखील कामानिमित्त बाहेर जाऊ लागल्या, त्यामुळे रेडिमेड फराळ सुरू झाला. तोदेखील पॅकेटमध्ये, तसेच घरोघरी फराळाला जाणे हेदेखील कमी होत गेले. आता दिवाळी झाल्यानंतर अनेक ठिकाणी सार्वजनिक फराळ ही प्रथा सुरू झाली. अर्थात, त्यात राजकीय नेते, आमदार, खासदार, नगरसेवक हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी, काही प्रमुख नागरिकांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करतात. पण यावर्षी निवडणुका अर्थात होऊन गेल्या होत्या, त्यामुळे ती संख्या कमी होती. आता घरीदेखील नवीन तरुण पिढी पूर्वीसारखे दिवाळीच्या पदार्थांना प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे पूर्वीच्या दिवाळी फराळाच्या पदार्थांची जागा आता मिसळपाव, मटार उसळ, बटाटेवडा-भजी, पाव ढोकळा, मसाला घावन, उत्तप्पा, वडा सांबार, इडली चटणी असे काही दाक्षिणात्य पदार्थदेखील पाहावयास मिळतात. अर्थात, दिवाळीचे पारंपरिक पदार्थदेखील ठेवलेले असतात. अहो एवढेच काय, पण... परवा आमच्या पक्षाच्या कोथरूडमधील एका कार्यकर्त्याने एका गार्डनमध्ये दिवाळी फराळ आयोजिला होता. तेथे फराळासाठी गेलो अन् मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तेथे तर चक्क आॅम्लेट ब्रेड ठेवला होता आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांची गर्दी त्याच ठिकाणी होती. लाडू-करंजी घेताना कोणी दिसत नव्हते. शिवाय रविवार किंवा सुटीचा वार या फराळ कार्यक्रमासाठी निवडला जातो. तसेच एका दिवशी चार, पाच ठिकाणी फराळाचे कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे डॉ. सतीश देसाई यांची आठवण सांगत होते, की फराळाचे आमंत्रण आल्यानंतर ते प्रथम विचारत काय मेनू आहे आणि जेथे वेगळा व चांगला, चमचमीत मेनू असेल तेथेच जातात. मला मात्र सर्व ठिकाणी जाऊन थोडं थोडं घ्यावं लागतं. पण ह्या वर्षी विधानसभा निवडणूक झाली. निकाल लागला त्यामुळे काही ठिकाणी आनंद, तर काहींनी फराळाचे कार्यक्रमच आयोजिले नाहीत. गेल्या रविवारी सदाशिव पेठेतल्या एका माननीयांनी दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते. अर्थात, तो दिवाळी फराळ सदाशिव पेठेतला होता. त्यामुळे तो मर्यादित होता. पण कार्यकर्त्यांची मात्र त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. साहजिकच त्या ठिकाणी असलेले मिसळपाव संपले. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना फराळ मिळाला नाही, ते तेथेच जवळ असलेल्या गोपाळ हायस्कूलमध्ये एका माननीयांनी आयोजिलेल्या फराळाकडे वळले. पण पुण्यातील चित्र मात्र नेहमीप्रमाणे होते. निकाल काहीही लागला तरी सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार या दिवाळी फराळात सहभागी झाल्याचे दिसले.
(लेखक प्रसिद्ध राज