मिलिंद थत्ते
ताठा आणि नम्रपणा हे व्यक्तिमत्त्वाचे नव्हे, जीवनपद्धतीचे गुण आहेत.
आम्ही निसर्गाला झुकवू, निसर्गाला संपत्ती म्हणून वापरू हा जीवनपद्धतीचा ताठा आहे.
आपण आपल्या मर्जीचे मालक आहोत या भावनेतून निसर्गावर पैसा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रभुत्व गाजवण्याच्या नादात माणसाचे चक्र निसर्गापेक्षा पूर्ण वेगळे पडत जाते.
ते चक्र वेगाने फिरत असते, तोवर त्याच मजेत माणूस असतो.
पण जेव्हा हे चक्र हुकते, तेव्हा?
मागच्याच आठवडय़ात अवकाळी पाऊस झाला. त्यात एक दिवस नेमका नागडा पाऊस झाला. म्हणजे ऊनही होते आणि पाऊसही. इंद्रधनुष्यही दिसले. त्यालाही ‘अवकाळी’ म्हणणो जिवावर आले. पण असेच अवकाळी इंद्रधनुष्य मागच्याही वर्षी दिसले होते. त्यानंतर ‘उदरी’ उगवली होती. उदरी म्हणजे गवतापेक्षा लहान, बारीक पानांची एक वनस्पती. गावातल्या म्हाता:यांनी सहज म्हटले, ‘उदरी उंगली की तो मारत नाही’. एवढीशी उदरी, पण निसर्ग (किंवा देव) तिला मरू देत नाही असा त्यांना विश्वास होता. आणखी पाणी बरसेल आणि उदरी जगेल. झालेही तसेच. आणखी काही वेळा अवकाळी पाऊस पडला आणि उदरी मेली नाही. पण सध्या भात कापून खळ्यावर पसरलेले आहे, ते मात्र या पावसात भिजते आहे. उडीद कापून शेतात आडवा ठेवलेला आहे, त्याला दोन दिवसाच्या पावसाने शेंगेतच कोंब फुटले आहेत. माणसासाठी अवकाळी असलेल्या या पावसाने निसर्गातल्या इतरांना मात्र ताण दिलेला नाही.
क्लायमेट चेंजवर उडीद आणि उदरीची परिषद भरलेली नाही. त्यांचे त्यांचे चक्र ‘रीसेट’ होऊन पुन्हा फिरते आहे. मग माणसाचे चक्र च का हुकले आहे?
कोकणातल्या आंब्याचे बागायतदार आता ऊस शेतक:यांच्या मार्गावर चालले आहेत. उसाला आळशी शेतक:याचे पीक म्हणतात. जवळपास बारा महिने मोटर चालू करणो आणि मळ्यात बाहेरून खडा मारून ‘डुबूक’ आवाज आला, की मोटर बंद करणो एवढेच काम ऊस शेतक:याला असते - असे म्हणतात. अर्थात उसाकडे लोक वळले ते यासाठी नाही, तर अधिक पैसा मिळेल या अपेक्षेने. काही काळ तसे झालेही. पण पुढे पुढे जमिनीला विश्रंतीच मिळेनाशी झाली. एखादी वनस्पती जमिनीतून काही द्रव्ये घेते, तशीच ती काही द्रव्ये जमिनीला देतही असते. काही पिके जमिनीतला नायट्रोजन वाढवतात, तर काही पिके तो घेतात. असा पिकांचा फेरपालट होत राहिला तर जमिनीचे आरोग्य टिकते. त्यात जमीन एखादा हंगाम मोकळीच ठेवायचीही जुनी रीत आहे. त्यातून जमिनीतले सूक्ष्म जीव वाढून जमीन जिवंत राहते. पण उसाच्या शेतीत हे सारे बंदच झाले. जमिनीचे आरोग्य ढासळत गेले. ज्या जमिनीला वर्षातून काहीच दिवस पाऊस ङोलायची सवय, ती सतत पाण्याखाली राहून गुदमरू लागली, खारपड झाली.
पीक कमी येईल या भीतीने शेतक:याने रासायनिक खताची मात्र वाढवली. पुढे पुढे ही गरज वाढत गेली. पिकातल्या गुंतवणुकीची किंमत वाढत गेली आणि पीक परवडेनासे झाले. आंब्याच्या बागांमध्येही मार्च ते मेचा काळ वगळला तर आराम असतो, असे म्हटले जाते. पण आता हा आराम कमी होऊ लागला आहे. सलग शेकडो आंब्याचीच झाडे असा प्रकार अनेक ठिकाणी आहे. एखादा रोग किंवा तुडतुडे किडे आले, तर एकामागून एक सर्वच झाडांवर रोग पसरत जातो. मग त्यावर अनेक फवारण्या कराव्या लागतात, रोग आटोक्यात ठेवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. ज्या बागांच्या आजूबाजूला जंगल आहे, इतर झाडझाडोरा शिल्लक आहे, तिथे आंब्याची बाग तुलनेने सुरिक्षत राहते, असे काही बागायतदार मित्रंचे निरीक्षण आहे. माणसांची जेव्हा विरळ वस्ती होती, तेव्हा साथीचे रोग नव्हते. दक्षिण अमेरिकेच्या आणि इतरही दक्षिण गोलार्धातल्या देशांच्या इतिहासातली ही एक सामायिक घटना आहे. युरोपियनांनी साथीचे रोग या देशांमध्ये आणले. दाटीची वस्ती आणि नमस्कार करणा:या लोकांमध्ये शेकहँडसारख्या संसर्ग वाढवणा:या पद्धती अशा अनेक गोष्टी युरोपियनांनी आणल्या. सलग मनुष्य वस्ती नव्हती तोवर साथीच्या रोगांना सहज अटकाव होत असे. असेच आता आंब्याच्या बागांचे झाले आहे. आंब्याला ज्या रोगाला तोंड देता येत नाही, त्या रोगाला इतर काही झाडे रोखू शकतात. पण तशी झाडेच मधे नसतील, तर साथीच्या रोगात गावे उठवावीत तशा बागा मोडाव्या लागतील. निसर्गाच्या चक्र ापासून माणसाचे चक्र जितके फारकत घेत जाते, तितका हा धोका वाढत जातो, असे हे चित्र आहे.
क्लायमेट चेंजच्या युगात टिकायचे तर जुने शहाणपण कामी येणार आहे. उदरी जशी टिकते, तसे टिकता येईल. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. नम्रपणा आणि लहानपणा असलेली लव्हाळी टिकतील. ताठा आणि मोठेपणा असलेले महावृक्ष जातील. यातला ताठा आणि नम्रपणा हे व्यक्तिमत्त्वाचे गुण नव्हेत, जीवनपद्धतीचे आहेत.
आम्ही निसर्गाला झुकवू, सगळीकडे कॉँक्र ीट पसरवू, आम्ही कुठेही लाथ मारू, म्हणू तिथून म्हणू तेवढे पाणी काढू आणि वाटेल तसे वापरू, पैसे दिले की झाले, इतरही निसर्गाला संपत्ती म्हणून वापरू. हा जीवनपद्धतीचा ताठा आहे. असे करून जगणारी माणसे व्यक्ती म्हणून नम्र असतीलही, पण निसर्गाच्या लेखी त्यांच्यात लव्हाळ्याचे टिकण्याचे गुण मात्र नसतील.
आताच्या एक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत. त्यांनी मुलांसाठी एक आहारविषयक शिबिर घेतले. (अर्थातच ही उच्च आर्थिक वर्गातली मुले होती.) त्या शिबिरात त्यांनी मुलांना काय खावे आणि काय खाऊ नये याचे सोपे मंत्र सांगितले. पहिला मंत्र होता ‘आजीला विचारा’! आत्ता बाजारात जे चित्रविचित्र खाणो मिळते (याला जंक फूड म्हणजे कचरा अन्न असेही म्हणतात), ते तुमची आजी खात होती का? तसेच आता भलत्याच पदार्थात भलते पदार्थ मिसळून नवनवीन रेसिपी केल्या जातात, जसे दुधात काही पावडरी घालणो इ. हेही आजीने खाल्ले होते का किंवा आईला तिने खायला घातले होते का? असे विचारा. जे जे आजी खात होती, ते सारे अन्न तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आणि ती खात नव्हती ते सारे ‘जंक’. दुसरा मंत्र होता ‘जवळची फळे-भाज्या खा’! जी फळे परदेशातून किंवा खूप लांबच्या राज्यातून येतात, ती एक तर सातशिळी असतात, आणि त्या फळांची आपल्या शरीराला जनुकीय सवय नसते. कुठले तरी किवी आणि प्लम खाण्यापेक्षा आपल्याकडची जांभळे, बोरे, पेरू खा. हे दोन्ही मंत्र किती साधे आहेत! पण तरीही हे शिकवावे लागतात. कारण जीवनपद्धतीतला ताठा आणि मोठेपणा. लव्हाळ्याच्या शैलीत राहिले तर हे दोन्ही मंत्र आपोआपच पाळले जातात.
जगात आकर्षण मोठेपणाचे असते, ताठय़ाचेही असते. त्यामुळे आपणही उच्च आर्थिक वर्गात जावे, ते न जमले तर किमान टीव्हीत दाखवतात तसे आणि तेच अन्न खावे-प्यावे अशी इच्छा निम्न आर्थिक वर्गातल्या लोकांना होत असते. जे अन्नाच्या बाबतीत, तेच इतर सर्व बाबतीत. यातूनच निसर्गापासून वेगळे चक्र चालवण्याची इच्छा प्रबळ होत जाते.
आपण आपल्या मर्जीचे मालक आहोत - या भावनेतून निसर्गावर पैसा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रभुत्व गाजवण्याच्या नादात माणसाचे चक्र पूर्ण वेगळे पडत जाते. चक्र वेगाने फिरत असते, तोवर त्याच मजेत माणूस असतो.
जेव्हा हे चक्र हुकते, तेव्हा कुठे निसटलेल्या सहजीवनाचे साकव शोधायला माणूस बाहेर पडतो.
(लेखक ‘वयम्’ या समावेशक विकासाच्या
चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
milindthatte@gmail.com