आ
ज फायनल!
टी-ट्वेण्टी विश्वचषकाचा हा हंगाम अनेक कारणांनी गाजला. त्यातलं एक म्हणजे थेट मैदानात उतरलेले बिग बी.
आठवा भारत-पाकिस्तान यांच्यामधली अटीतटीची लढत! विराट कोहली नावाचं वादळ आणि सर्व शक्तीनिशी हातातला तिरंगा फडकवत आपल्या टीमच्या विजयी जल्लोषात सहभागी झालेले अमिताभ बच्चन!
हा सामना संपला, त्या रात्रीच अमिताभ यांनी एक ट्विट केलं!
‘कॉमेण्ट्री करणा:यांविषयी मला आदर आहे, पण इंडियन कॉमेण्टेटर्स आपल्या खेळाडूंपेक्षा दुस:या संघाच्या खेळाडूंविषयीच जास्त बोलतात’ - असा त्या ट्विटचा अर्थ होता. संदर्भ अर्थातच नुक्ता संपलेला ताजा सामना आणि रक्त उसळेल असा देशातला विजयी जल्लोष! अमिताभ यांच्या ट्विटवर त्यांच्या फॉलोअर्सच्या कमेण्टचा पाऊस पडला. त्यांना प्रतिउत्तर देताना अमिताभ यांनी अमुकतमुक नव्हे ढमुकतमुक असं म्हणत विशिष्ट भारतीय समालोचक ‘बायस्ड’ आहेत असं सूचक अंगुलीनिर्देशही केलं.
एका चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी लिहिलं, ‘जब देखो उनकी तारीफ करते रहते है, आउट उनका बॅट्समन और उनके लिए दुख व्यक्त कर रहे है..? अरे; हमारी बॉलिंग!’
वैतागलेल्या अभिताभ यांनीे सोशल मीडियात असा जाहीर संताप व्यक्त केला आणि भारतीय कॉमेण्टेटर्स दुस:या देशाचंच जास्त कौतुक करतात, त्यांच्याच खेळाडूंची बाजू घेतात असा आरोपही केला. त्यांच्या या मताला ट्विटरवरच्या आम जनतेनं उचलून धरलं आणि भारतीय संघाचा कप्तान धोनी यानंही ते ट्विट रिट्विट करत, ‘मी अजून काय बोलणार?’ अशी सूचक टिप्पणी जोडली. हे प्रकरण इथंच संपलं नाही. बच्चन यांनी ज्या कॉमेण्टेटरचा उल्लेख नाव न घेता केला होता, त्या हर्षा भोगले यांनी फेसबुकवर आपलं मत जाहीरपणो मांडलं, आणि आपल्यावरच्या आरोपाला थेट स्वच्छ उत्तर दिलं! (त्यांनी अर्थातच बच्चन यांना ट्विटरवर ‘डीएम’ अर्थात डायरेक्ट मेसेजही पाठवलाच आणि बच्चनसाहेब आपल्याला फॉलो करतात याचा आनंदही व्यक्त केला!)
हर्षा भोगले यांनी लिहिलं.
‘‘कॉमेण्ट्रीविषयीच काही गैरसमज सध्या दिसतात, त्याविषयी मी जरा तपशिलात सांगायला हवं. सध्या भारतीय प्रेक्षकांसाठी दोन प्रकारचे ब्रॉडकास्ट अर्थात सामन्यांचं प्रसारण उपलब्ध आहे. एक आहे ते इंग्रजीत, जे आपल्या देशासह जगभरात जसंच्या तसं दिसतं. म्हणजे तिथं इंग्रजीत जी कॉमेण्ट्री चालते ती बांग्लादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका. जगभरात सगळीकडे ऐकली जाते. त्यामुळे ही कॉमेण्ट्री वस्तुनिष्ठच असायला हवी आणि सामन्याचं एक तटस्थ, संतुलित चित्र त्यातून दिसायला हवं.
जर फक्त भारतीय खेळाडूंचीच बाजू घेऊन ‘भारत केंद्रित’ वर्णन करत कॉमेण्ट्री केली तर बाकीच्या देशातल्या संघांवर आणि तिथल्या खेळाच्या चाहत्यांवर तो अन्याय असेल.
त्या-त्या देशातले प्रेक्षकही आपापल्या संघाचे प्रचंड समर्थक असतात, मग अशावेळी एकाच संघाची बाजू घेऊन कॉमेण्ट्री करणं त्या समर्थकांसाठी अन्यायच आहे.
आता फक्त हिंदी कॉमेण्ट्री असणारं सामन्यांचं प्रसारणही होतं. एका विशिष्ट भागात बोलल्या जाणा:या भाषेतून ही कॉमेण्ट्री होत असलेल्यानं ती भारत केंद्रित (दुजाभाव करणारी नव्हे) असायला काहीच हरकत नाही. कारण पाहणारे भारतीय आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट भारतीय चष्म्यातून पाहिली तर ते स्वीकारार्ह आहेच. मात्र जेव्हा इंग्रजी कॉमेण्ट्री जगभर ऐकली जाणार असते, तेव्हा असे एकाच देशाच्या भोवती केंद्रित होऊन कॉमेण्ट्री करता येत नाही. करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट गांभीर्यानं घ्यायला हवं, कॉमेण्ट्री नव्हे. आम्ही फक्त कथाकार आहोत. मैदानावरचे खेळाडू एक गोष्ट रचत असतात, ती गोष्ट आम्ही फक्त उलगडून सांगत असतो. आमच्या शब्दांचा खेळावर प्रभाव पडत नाही, आम्ही फक्त क्रिकेटच्या जादुई अनपेक्षित कहाणीतले वाटाडे असतो!’’
***
हर्षा भोगलेंच्या या उत्तरानंतर हा वाद मिटला.
मात्र तरीही ही गोष्ट इथं संपत नाही. कारण या गोष्टीच्या निमित्तानं शोधत गेलं तर कॉमेण्ट्रीची अनेक बदलती रूपं दिसतात. त्या रूपांच्या आत कुठंतरी दडलेलं बदलतं क्रिकेट आहे आणि बदलती समाज मानसिकताही. या समाजमनाला आता क्रिकेटच्या खाचाखोचा, नजाकत, तांत्रिक बारकावे समजून घेण्यात फारसा रस नाही. त्याला मॅच एन्जॉय करत, ते ‘पाहणं’ सेलिब्रेट करायचं आहे. आणि त्या सेलिब्रेशनसाठी त्यांना सोबत हवी आहे चुरचुरीत, खमंग, वेगवान कॉमेण्ट्री.
त्या बदलत्या कॉमेण्ट्रीचा वेगवान प्रवास :
काही अलीकडचे वाद
2006 : श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी सामन्यात हाशिम अमलानं एक उत्कृष्ट कॅच घेतला. त्यावर ऑस्ट्रेलियन कॉमेण्टेटर डीन जोन्स यांनी ‘द टेररिस्ट गॉट अनादर विकेट’ अशी टिप्पणी केली. अमला मुस्लीम असल्यानं अशी कमेण्ट डीन जोन्सनं केल्याच्या आरोपावरून निषेधाचं रान उठलं. शेवटी ईएसपीएन चॅनलनं डीन जोन्स यांना नारळ दिला.
2012 : रमीझ राजा यांनी रवि शास्त्री यांच्याबद्दल अत्यंत अप्रस्तुत कमेण्ट कॉमेण्ट्री करताना केली. त्यावर आयसीसीने दंड म्हणून त्यांच्या मानधनातली 10 टक्के रक्कम कापली. आणि राजा यांना माफी मागावी लागली.
तरुणपणी मी जेव्हा रेडिओवर सामन्याची कॉमेण्ट्री ऐकायचो ते दिवस मला अजून आठवतात. परदेशात खेळल्या जाणा:या या मॅचेस रात्रीबेरात्री आम्ही रेडिओवर ‘ऐकल्या’ आहेत. हायलाइट्स पाहायला शेजारच्यांच्या घरी जाऊन तळ ठोकलेला आहे. मात्र ती कॉमेण्ट्री करणारे फक्त त्यांच्याच देशाच्या संघाचं, खेळाडूंचं कौतुक करायचे. तो ओरखडा अजून माङया मनावर कायम आहे. तेव्हाचा हा व्रण भरायला बराच काळ लागला! म्हणून मला वाटतं कॉमेण्ट्री ही संतुलित, वस्तुनिष्ठच असली पाहिजे.
- हर्षा भोगले