CoronaVirus: कोरोना डायरीज... सिस्टर निर्मलाची गोष्ट मन हेलावून टाकेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:42 AM2020-03-29T11:42:58+5:302020-03-29T11:54:55+5:30

कोरोनाच्या वॉर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा अंगघोळ कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला माहिती होतं.

Coronavirus Lockdown: three stories which inspires everone to think | CoronaVirus: कोरोना डायरीज... सिस्टर निर्मलाची गोष्ट मन हेलावून टाकेल!

CoronaVirus: कोरोना डायरीज... सिस्टर निर्मलाची गोष्ट मन हेलावून टाकेल!

Next

 >> मुकेश माचकर

१.
सिग्नलला गाडी थांबली… एरवीची गर्दीची वेळ असूनही आज चिटपाखरूही नव्हतं रस्त्यावर… तुरळक गाड्या दिसत होत्या… पोलिसाने हटकून विचारलंच… एअरपोर्टवरून आलोय म्हटल्यावर तो मागे हटला आणि म्हणाला, थेट घरीच जा आणि घरीच राहा साहेब.

त्याने मान डोलावली, म्हणाला, मी बेजबाबदार देशातला जबाबदार नागरिक आहे. कारण मी सतत परदेशांत जात-येत असतो. मला नीट माहिती आहे हा भयंकर आजार कसा पसरू शकतो ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे स्वतंत्र खोलीही आहे क्वारंटाइन करून घेण्यासाठी.

पुढच्या सिग्नलला त्याचं लक्ष रस्त्याकडेच्या झोपड्याकडे गेलं… मलूल प्रकाशात त्याहून मलूल चेहऱ्याने बसलेलं कुटुंब पाहून त्याला भडभडून आलं… एरवी त्याला ‘ही गलिच्छ माणसं शहरं विद्रूप करतात,’ असं वाटून शिसारी यायची… आता मात्र त्याच्या मनात कणव दाटून आली… इथून पुढच्या काही दिवसांत लॉकडाऊन घोषित होईल आणि मग यांचं काय होईल? यांना भीक घालायलाही रस्त्यावर कोणी असणार नाही… 

त्याने काच खाली केली, भिकाऱ्यांच्या कुटुंबप्रमुखाला खुणेने बोलावलं… हाताला लागलेली पाचशेची नोट त्याने सरळ त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली… भिकाऱ्याचे डोळे पाण्याने डबडबले… आपल्या गाडीत आज किती दयाळू माणूस बसलेला आहे, या कल्पनेने उबरचालकही सद्गतित झाला…

…थोड्या वेळापूर्वीच परदेशातून आलेला माणूस बंद कारमध्ये शिंकला होता… जबाबदार नागरिक असल्याने त्याने शिंकताना तोंडावर हात धरला होता… मात्र, त्याच हाताने त्याने भिकाऱ्याला पाचशे रुपये दिले होते, त्याच हाताने तो उबरचालकालाही साडे चारशे रुपयांचं बिल झालेलं असताना पाचशे रुपयांची नोट देणार होता… कीप द चेंज असं म्हणणार होता…

…आजवर विमान आकाशातच पाहिलेल्या भिकाऱ्याला आणि उबरचालकाला नेमकी काय भेट मिळाली आहे, हे १४ दिवसांनी कळणार होतं… कुठून मिळाली आहे, हे त्यांना कधीच कळणार नव्हतं… त्यांच्याकडून ती ज्यांना मिळणार होती, त्यांना तरी कुठे कळणार होतं?… 

**

२.

हवालदार जंगमनी घर सोडल्याला ४८ तास उलटून गेले आहेत… अजून किती वेळाने घरी जायला मिळेल याची काही कल्पना नाही… आधी १४४ कलम लागलंय एवढंच माहिती होतं… रस्त्यात बाहेर पडणाऱ्यांना ‘घरात राहा रे बाबांनो’ अशी हात जोडून विनंती करत होते ते. नंतर चक्रं फिरली आणि संचारबंदी जाहीर झाली तशी त्यांना काठी काढावी लागली… खुद्द गृहमंत्र्यांनीच काठीला तेल लावून ती वापरा, असं सांगितल्यावर त्यांचाही नाईलाज होता… पोलिसी नजर होती, खरोखरच कामाला कोण निघालाय, हे त्यांना अंदाजाने कळायचं, निव्वळ टाइमपासला निघालेली पोरंही समजायची आणि मग त्यांच्या दंडुक्याचे रट्टे त्या पोरांच्या पार्श्वभागावर पडायचे…

फारतर दीडेक दिवसांनी घरी जाऊ अशा समजुतीने डयुटीवर आलेल्या जंगमांच्या लक्षात आलं की आता दोनतीन दिवस तरी सुटका नाही… त्यांना नीट चहा मिळत नव्हता, जेवण कुठून मिळणार… त्यात पब्लिक सार्वजनिक सुटी असल्यासारखी बाहेर पडत होती… जीवनावश्यक वस्तू सतत मिळत राहतील हे सांगून मुख्यमंत्री थकले तरी लोक आता कधीच काही मिळणार नसल्यासारखे धावत होते… 

झोपेचा अभाव, जेवण्याखाण्याची आबाळ, कुटुंबापासून दूर राहिल्याची चिडचीड आणि थकवा यांनी कावलेल्या जंगमांना मोटरसायकलवरून घाईघाईने निघालेला माणूस दिसला आणि त्यांच्या कपाळाची शीर तडतडली… त्यांनी मोटरसायकलीला आडवे जात थांबण्याचा इशारा केला, मोटरसायकल कडेला भेलकांडली तेव्हा पुढे होऊन सटासट रट्टे ओढायला सुरुवात केली… तो माणूस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार होता, पण पोलिसी दंडुक्याचा एक रट्टा पडताच त्याची जीभ तोंडातच गोठून गेली… कसाबसा तो उलटा पळाला…

तेवढ्यात जंगमांच्या मागून एक कार आली… ड्रायव्हरच्या मागे नियमाप्रमाणे एक पॅसेंजर बसला होता… रूबाबदार, नीटनेटका… कारवर मेडिकल क्रॉसची खूण होती… जंगमांनी खूण करताच काच खाली करून ड्रायव्हर म्हणाला, डॉक्टरसाहेब अर्जंट ऑपरेशनसाठी निघाले आहेत…

…या भयंकर महामारीच्या काळात डॉक्टरांनी दवाखाने बंद केलेले असताना काही डॉक्टर देवदूतासारखे धावून जातात, हे कळल्याने जंगम सद्गतित झाले… त्यांनी हात वर करून अभिवादन केलं…

…मोटरसायकल सोडून पळालेला डॉक्टर मनोमन स्वत:ला शिव्यांची लाखोली वाहात होता… आरोग्यमंत्र्यांचं आवाहन मनावर घेऊन क्लिनिक उघडायला जाण्याची दुर्बुद्धी आपल्याला कशी झाली, असं त्याला वाटत होतं… दुसरीकडे भरधाव सुटलेल्या मोटारीतल्या ‘डॉक्टर’ने सुटकेचा नि:श्वास सोडला… त्याच्या डिकीत सिगरेट, दारू, मावे, गुटखे अशी परिचितांमध्ये गुपचूप दामदुप्पट भावाने विकण्यासाठीची जीवनावश्यक ‘औषधं’ होती… हवालदाराने तपासलं असतं, तर काही खरं नव्हतं… ड्रायव्हर बनलेल्या मित्राला काचेवर चिकटपट्ट्या लावून डॉक्टरच्या गाडीचा भास निर्माण करण्याची भारी आयडिया सुचली, याचं त्याला फार कौतुक वाटलं…

**

३.

सिस्टर निर्मला थकली होती… तशी तिला थकव्याची सवय होती…

…तिचं कामच तसं होतं… प्रत्येक शिफ्टला तिला अख्ख्या वॉर्डभर फिरायला लागायचं… पेशंट्सना वेळेवर औषधं देणं, त्यांच्या तपासण्या करणं हे तिचं पगाराचं काम होतं… पण, हिंमत हरत चाललेल्या, बंदिस्त राहून वैतागलेल्या पेशंटांना धीर देणं हे कामही ती आनंदाने करायची… ती दिसली की लोकांना बरं वाटू लागायचं… आता आपण बरे होणार, असा विश्वास वाटू लागायचा… हे करताना ती किती थकून जायची, हे कधीच कुणाला कळायचं नाही…

…पण यावेळचा थकवा वेगळा होता… कोरोनाच्या वॉर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा अंगघोळ कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला माहिती होतं, तिच्याबरोबर काम करणाऱ्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही माहिती होतं… पण, हे काम कुणी ना कुणी करणं आवश्यक होतंच… आपण होता होईल तो काळजी घ्यायची… हा रोग आपल्या कोट्यवधींच्या देशात पसरू द्यायचा नाही, यासाठी लढायचं, हे तिने ठरवलं होतं…

…जनता कर्फ्यूच्या संध्याकाळी सगळीकडे लोकांनी टाळ्या-थाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा तर तिला एकदम भरूनच आलं होतं… एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आपल्याविषयी, आपल्या पेशाविषयी इतकी जिव्हाळ्याची, आदराची भावना आहे, तिच्यातून उतराई होण्याचा होता होईल तेवढा प्रयत्न आपण करायचा, हे ठरवून ती दुप्पट जोमाने कामाला लागली होती… दुप्पट थकली होती…

…हॉस्पिटलच्या घरी पोहोचवणाऱ्या गाडीत तिचा कधी डोळा लागला, ते तिला कळलंही नाही…

…तिच्या जुनाट चारमजली इमारतींच्या सोसायटीसमोर गाडी पोहोचली आणि तिला गोंगाटाने जाग आली… 

तिने जे पाहिलं, त्यावर तिचा विश्वास बसेना… तिचं सगळं कुटुंब रस्त्यावर काढण्यात आलं होतं… टाळ्या-थाळ्या वाजवणारे, अडीअडचणीला हक्काने तिला बोलावून नेणारे, डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या नेणारे शेजारी अंतर राखून गोळा झाले होते आणि म्हणत होते, ‘तुमची मुलगी कोरोना वॉर्डमध्ये काम करते… तिच्यापासून तुम्हाला आणि तुमच्यापासून आम्हाला संसर्ग झाला तर जबाबदार कोण?’ 
 

Web Title: Coronavirus Lockdown: three stories which inspires everone to think

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.