सोशल डिस्टन्सिंगच्या काळातील सामाजिक एकोपा... सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 08:29 AM2020-04-26T08:29:00+5:302020-04-26T08:30:07+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सुरक्षित अंतर जपणे अनिवार्य बनले आहे. हे अंतर राखत असंख्य नागरिक आपल्या परीने माणुसकीच्या जाणिवेतून सामाजिक एकोपा जपत आहेत. अडचणीच्या काळात सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या असंख्य नागरिकांच्या प्रयत्नांच्या प्रातिनिधिक उदाहरणांचा हा कोलाज.
- वंदना आर. थोरात
आम्ही रोज सकाळी मंदिरात स्वयंपाक करण्यास मदत करण्यासाठी जातो. गेल्या महिनाभरापासून सगळीकडेच कामधंदे, दुकाने, हॉटेल सगळं बंद आहे. आम्ही घरीच आहोत; परंतु जे लोक घरापासून दूर बाहेर राहतात, या बंदमुळे गावात, रस्त्यावर अडकून पडले, त्यांना भूक लागली तर खायचं काय, असा प्रश्न आहेच. आता इतक्या सगळ्या लोकांना आपण तर काय जेवण देऊ शकत नाही. कारण आपलंच पोट हातावर आहे. आपल्या भाजी-भाकरी इतकं आपण कसंतरी भागवतोय पण नुसतंच तेवढं करून घरी बसून राहण्यापेक्षा लोकांना जेऊ घालण्यासाठी जे स्वयंपाक बनवतात त्यांना तर आपण मदत करू शकतो ना, या विचाराने आमच्या गटातील सात आठ जणी मिळून मंदिराच्या येथे सकाळी स्वयंपाक बनविण्यासाठी आणि तयार केलेले जेवण पॅक करण्यास मदतीसाठी जात आहेत. मंदिरवाले मग ज्या लोकांना गरज आहे त्यांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप करून येतात. या चांगल्या कामात आपला काही तरी लहानसा हातभार लावावा असं वाटतं, अशा शब्दात वेरूळ येथील रेखा आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वेरूळ येथील मंदिर ट्रस्टच्या वतीने रोज शंभर लोकांचा स्वयंपाक केल्या जातो. या बंदच्या काळात गावतल्या, आसपासच्या गरजू लोकांना जेवण देण्यासाठी हा उपक्रम राबविल्या जात असून, तेथे अण्णाभाऊ साठे स्वयंसहायता समूहाच्या गटातील या महिला स्वयंस्फूर्तीने आपल्या सेवाभावी वृत्तीतून विनामोबदला काम करीत आहेत.
आमच्या येथे वाटसरू, घराकडे जायच्या आशेने निघालेले लोक, बाया-माणसं, विद्यार्थी, आजूबाजूचे मजूर, असे अनेक लोक जेवण करून जातात. ते सगळेच वेळेवर दोन घास खायला मिळाल्याचे समाधान व्यक्त करतात. त्यांच्यासारखंच आम्हालाही भुकेल्यांना दोन घास वेळेवर देता येताय, याचं खूप समाधान वाटतं. २ एप्रिलपासून आम्ही शिवभोजन केंद्र चालवायला घेतलं आहे. रोज सकाळी आठ वाजता आम्ही सात आठ जणी आमच्या गटाच्या महिला चपाती, भाजी, वरण, भात असा स्वयंपाक करतो. दुपारी दोनपर्यंत आमच्या येथे ७०-८० लोक जेवण करून जातात. आता तर शासनाने पाच रुपयांतच जेवण द्यायला सांगितले आहे. पण काही लोकांकडे ते पाच रु.पण नसतात, अशा लोकांना आम्हीच पैसे नका देऊ जेऊन घ्या म्हणतो. आमच्या येथे एक खूप गरीब बाई तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत एकेदिवशी जेवण करायला आली होती. ती बिचारी बाहेरगावची असून बस बंद असल्याने पायी चालत आपल्या गावाकडे जाण्याच्या विचाराने निघालेली होती. आम्ही तिला जेवण करा म्हणलो, तेव्हा ती सांगू लागली की, हातावर पोट आहे. रोज काम करून कसंतरी राहत होतो, पण या बंदमध्ये काही कामधंदा करता येणार नाही. रोज खायला कसं मिळणार म्हणून गावाकडे निघालो आम्ही मायलेकी. बघू आता कधी पोहोचतो. पण लहान लेकराला घेऊन त्या बाईने असं चालत जाण आम्हाला काही योग्य वाटलं नाही म्हणून आम्हाला कामात थोडी मदत करत सगळं सुरू होईपर्यंत इथेच थांबण्याचे त्यांना समजून सांगितले. आता त्या दोघी आमच्या परिसरातच थांबल्या असून, रोज शिवभोजन केंद्रावर येतात. त्यांच्यासारख्या अनेकांना आम्हाला वेळेवर दोन घास देता येत आहे, याचं समाधान वाटत असल्याचे शिवभोजन केंद्रचालक सरला शेळके यांनी सांगितले.
ग्रामीण भागात कोरोनामुळे भीतीचं वातावरण, त्यात सगळीकडे बंद, या तणावात ग्रामसंघाची, त्या अंतर्गत येणाºया समूहांची सामाजिक बांधिलकीची भावना सहाय्यक ठरली. दिन्नापूर हे पैठण तालुक्यातील दोनशे ते अडीचशे कुटुंब संख्या असलेले गाव. कोरोना विषाणू संसर्गामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले व गावकºयांनी बाहेरून येणाºया लोकांसाठी गावाच्या सीमा बंद केल्या. गावात अनेक मजूर कुटुंबे राहतात. बºयाच कुटुंबातील व्यक्ती लॉकडाऊनमुळे बाहेरगावी अडकून पडल्या, अशा गंभीर परिस्थितीत आपल्या गावकºयांच्या मदतीला गावातील स्वतंत्र महिला ग्रामसंघ व त्या अंतर्गत येणारे एकूण बारा समूह धावून आले. त्यांनी गावात कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती केली. जनजागृती करणे यावरच न थांबता ग्रामसंघाने गावकºयांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून दिले. सीआरपी मनीषा शिंदे, ग्रामसंघ अध्यक्ष आशा तुळशीराम खाटीक व ग्रामसंघ सचिव मंगल खाटीक यांनी एकत्रितपणे एक नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले. यांनी पुढाकार घेऊन ग्रामसंघामार्फ त कोविड-१९ बद्दल जनजागृती तर केलीच, पण गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य, किराणा व भाजीपाला मोफत वाटण्यासंदर्भात एक आराखडा तयार केला. हे सर्व सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करतात. सीआरपी मनीषा शिंदे, तसेच वैष्णवीदेवी महिला स्वयंसहायता समूह यांनी स्वखर्चातून पन्नास मास्क तयार करून गरजूंना वाटप केले. गावातील एकूण ३५ कुटुंबांना प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, अर्धा किलो दाळ, साबण व भाजीपाला ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव व समूहातील महिला यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कठीणप्रसंगी त्यांनी आपल्या परीने सहकार्याची भावना कृतिशीलपणे जपत इतरांसाठी चांगली प्रेरणा निर्माण केली आहे.
वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील १५ बचत गटांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा हजार शंभर रुपयांची मदत देऊन खारीचा वाटा उचलला आहे. या बचत गटातील महिला रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाºया आहेत. मात्र संकटकाळी आपल्याकडून छोटीशी का होईना मदत करण्याची त्यांची ही संवेदनशीलता वाखाणण्याजोगी आहे.
या सगळ्यांच्या कृतीतून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे, वृत्तीत जर दानत असेल तर भले आपल्याकडे आर्थिक श्रीमंती नसेल तरीही आपल्या परीने समाजाला आपण सहकार्य नक्कीच करू शकतो.