लोककलेचा जगात डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:18 AM2019-02-03T00:18:24+5:302019-02-03T00:18:56+5:30

पिवळ्याधमक भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले. जगातील अनेक राष्टÑांच्या सांस्कृतिक सोहळ््यांची प्रतिष्ठा बनून हे पथक मानाने डोलत आहे.

Dunka in the world of folk art | लोककलेचा जगात डंका

लोककलेचा जगात डंका

Next
ठळक मुद्देज्या कुलदैवतांच्या चरणी या कलेच्या सादरीकरणाचा श्रीगणेशा झाला ते मुरसिद्ध, बिरदेव आणि कुपवाडचे लाडले मशायक बाबा यांच्याप्रतीही तितकाच भक्तिभाव पथकाने जपला आहे.

अविनाश कोळी

पिवळ्याधमक भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले. जगातील अनेक राष्टÑांच्या सांस्कृतिक सोहळ््यांची प्रतिष्ठा बनून हे पथक मानाने डोलत आहे.

आधुनिकतेच्या चाकावर आरूढ होत बदलांचे वारे अंगात भिनवत विविध क्षेत्रांनी कूस बदलली. जगाच्या प्रवाहाच्या दिशेने प्रवाहित होत सुरात सूर मिसळून पुढे जाण्याची कलाही अनेकांनी अवगत केली. मात्र, बदलाच्या वाºयापेक्षा परंपरेने आलेल्या कलेच्या वादळासंगे नाचत आधुनिक जगाच्या व्यासपीठावर आपला डंका वाजविणारे दुर्मीळच. पिवळ््याधमक भंडाºयाच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर आपल्या कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले.

लोककलांचा प्रवास कित्येक वर्षांचा असला तरी आधुनिक काळात त्याच्या जतनाचे काम म्हणजे एक दिव्य वाटू लागले आहे. परंपरागत कलेचा अभिमान, त्याची गोडी, त्याचे महत्त्व अधोरेखित होत असतानाच, अर्थकारणात, लोकप्रियतेत कुठेतरी फसत असल्याची भावनाही व्यक्त होत असते. म्हणून संमेलनांमधून भारतीय लोककलांच्या भवितव्याची चिंताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत असते. कलेच्या क्षेत्रात संभ्रमाचे हे ढग दाटले असतानाच, लोककलेला प्रकाशझोतात आणण्याचे काम कुपवाडच्या मुरसिद्ध वालुग, ओवीकार मंडळाने केले. गेल्या चाळीस वर्षांत या पथकाने जी झेप जागतिक पातळीवर घेतली, ती अन्य लोककला पथकांसाठी दिशादर्शक म्हणावी लागेल. पथकाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब लक्ष्मण मंगसुळे यांनी सातत्याने यासाठी धडपडत राहणे पसंत केले. या कलाकाराने आर्थिक गोष्टींची चिंता न करता लोककला जपण्याचे वेड अंगी बाळगले आणि आता ते जगातील रसिकांना आपल्या कलेने वेड लावत आहेत.

कंबोडिया, इंडोनेशिया, मॉरिशस, थायलंड, भूतान अशा देशांचे केवळ औपचारिक दौरे नव्हे, तर दीर्घकाळ त्याठिकाणच्या सांस्कृतिक पटलावर उमटणारी घट्ट छाप ते सोडून आले आहेत. त्यामुळेच अमेरिकेच्या वर्ल्ड कॉन्स्टिट्युशन अ‍ॅण्ड पार्लमेंट असोसिएशनने मंगसुळे यांना सदस्यत्व बहाल केले. मानाच्या दोन संस्थांनी त्यांना डॉक्टरेटसुद्धा दिली. मुरसिद्ध आणि बिरुदेव या कुलदैवतांसमोर कधीकाळी भंडाºयात न्हाऊन सादर होत असलेली ही लोककला आता जगाच्या कानाकोपºयात फिरत आहे. इतकेच नव्हे, तर २१ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांनी एकाचवेळी १ हजार ३५६ लोकांच्या माध्यमातून ढोलवादन करीत ‘गिनिज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंदही केली.

आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली यांसह देशातील अनेक प्रांतांतही त्यांची ही कला लोकप्रिय झाली. आधुनिक संगीताचा बाज स्वीकारत त्यांच्या तालावर आपली कला नाचविण्यापेक्षा आधुनिक संगीताला लोककलेच्या परंपरागत ठेक्यावर ठेका धरायला लावणे आपल्याला पसंत आहे, असे डॉ. मंगसुळी सांगतात. त्यांनी सांगितले की, धनगर समाजातीलच नव्हे, तर प्रत्येक समाजाकडे असलेली लोककला ही अशाच मार्गाने गेली पाहिजे. आपले संगीत, नृत्य, कलाविष्कार मूळ स्वरूपातच टिकले पाहिजे. काळ आधुनिक आला म्हणून निसर्ग त्याचे मूळ रूप कधी बदलत नाही, तसेच कलांच्याबाबतीत झाले पाहिजे. पथकासाठी आंतरराष्टÑीय व्यासपीठाच्या पायºया उपलब्ध करून देण्याचे काम सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर विभागातील संचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महाराष्टÑाच्या वित्त विभागाचे सचिव वैभव राजेघाडगे, तसेच भारतीय सांस्कृतिक संचालनालयाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचेही तितकेच योगदान आहे. ज्या कुलदैवतांच्या चरणी या कलेच्या सादरीकरणाचा श्रीगणेशा झाला ते मुरसिद्ध, बिरदेव आणि कुपवाडचे लाडले मशायक बाबा यांच्याप्रतीही तितकाच भक्तिभाव पथकाने जपला आहे.


(लेखक ‘लोकमत’ सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Web Title: Dunka in the world of folk art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.