महाराष्ट्र शासनाने आदर्श ग्राम म्हणून नोंदविलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील सेंद्री या गावात २२ फेब्रुवारी १९३६ रोजी सीतारामजी व सरस्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. मिळेल ते काम करण्याची तयारी, जिद्द, मेहनत व अफाट इच्छाशक्तीच्या बळावर एम.ए., एल. एल. बी. सारखे उच्च शिक्षण घेऊन विद्याविभूषित होऊनही नोकरीला लाचारी समजून नोकरीकरिता कुणाचेही उंबरठे न झिजवता त्यांनी वकिली या व्यवसायाद्वारे समाजाचे ऋण फेडण्याचा क्रांतिकारक मार्ग निवडला. विद्यार्थीदशेत असतानाच नागपूर विद्यापीठाच्या सिनेटपदी विराजमान होण्याचा विक्रम करणे, स्वकर्तृत्वाने मॉरेस कॉलेज नागपूरचे अध्यक्षपद भूषविणे, नागपूर विद्यापीठाचे कबड्डी या मैदानी खेळाचे कॅप्टनपद विभूषित करीत असतानाच भारतातून नागपूर विद्यापीठास कबड्डीचे सुवर्णपदक प्राप्त करून दिले.१९७४ ते ८० या कार्यकाळात ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य, महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनलचे सदस्य, महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभाग सदस्य, महाराष्ट्र राज्य भूसुधार कमिटी सदस्य तसेच भारताचे प्रथम कृषिमंत्री, करोडो कृषकांचे कैवारी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख या महामानवाने शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता स्थापन केलेल्या भारत कृषक समाज या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे महाराष्ट्र राज्य कृषक समाज जळगावचे चेअरमन होते.अशा विविध क्षेत्रात कार्यरत असताना भारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी नानासाहेबांना यवतमाळ मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली. दुर्भाग्यवश या निवडणुकीच्या दिवशीच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा खून झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली व नंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. अन्यथा त्यांनी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या मंत्रिमंडळात भारताचे केंद्रीय विधीमंत्रिपद विभूषित केले असते. नानासाहेब हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त.अनेक वर्षापासून ते आषाढी एकादशीच्या दरम्यान पंढरपूरची वारी करीत होते. त्यातच दुर्भाग्यवश नानासाहेबांना कॅन्सर या दुर्धर रोगाने ग्रासले. नानासाहेबांच्या धर्मपत्नी सौ. आशालता नानासाहेबांच्या सुखदु:खात सावलीसारख्या वावरल्या.नानासाहेबांचा शेवटचा काळ तब्येतीच्या दृष्टीने कठीणच गेला. शेवटी जीवनमरणाच्या संघर्षात नानासाहेबांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी शरणागती पत्करली.बहुतांश व्यक्तीचा जन्म हा इतिहासजमा होण्याकरिता होतो. आपला जन्म मात्र इतिहास निर्माण करण्याकरिता झालेला आहे. कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची सेवा करण्याकरिता प्रवृत्त केल्यामुळे मी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची प्राध्यापकाच्या नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन महाराष्ट्र राज्य कृषक समाजाच्या जळगाव येथील प्रांतीक कार्यालयात रुजू झालोय.तेथे प्रशिक्षण व प्रसिद्धी अधिकारी म्हणून नेमणूक केल्यामुळे हातून शेतकरी बांधवांची सेवा घडली. आशाताईंसोबतच आपल्या पूर्ण परिवाराने देहदानाचा निर्णय घेऊन समाजाला एक दिशा दाखविली आहे. काळ जरी कठोर असला तरी काळच हळूहळू दु:ख विसरावयास लावतो.नानासाहेबांच्या सर्व हितचिंतकांनी, मित्रमंडळींनी व आप्तेष्टांनी देहदानाच्या संकल्पनेची लोकजागृती करून अंमलबजावणी करावी, हीच नानासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.
- प्रा. प्रकाश घवघवे