निर्भय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:02 AM2020-10-04T06:02:00+5:302020-10-04T06:05:03+5:30
पुष्पाबाई भावे यांनी अनेक क्षेत्रात काम केलं. त्यांचा विचार काळाच्या ओघात, कामं करत असताना, लोकांच्या सोबत राहून विकसित होत गेला. वैचारिक पठडीत त्या अडकल्या नाहीत. स्वातंत्र्य, समता या मूल्यांसाठी त्यांनी स्वत:ला निर्भयपणे झोकून दिलं.
- निळू दामले
पुष्पाबाई भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. त्यातला एक प्रभावी पैलू राजकारण आणि समाजकारण.
पुष्पाबाईंवर लहानपणी गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. गांधीजी मानत की आपण समाजाचं काही देणं लागतो. जगत असताना स्वत:चं टिकणं ठीक; पण आपण काही दिलं पाहिजे हा विचार पुष्पाबाईंच्या विचारात अजाणतेपणीच रुजला आणि त्या विचारांवर त्यांचं राजकीय, सामाजिक जीवन उभं राहिलं.
पुष्पाबाई प्राध्यापक, समीक्षक असल्या, तरी त्यांचा एक पाय नेहमी समाजकारणात, राजकारणात राहिला. निर्मला पुरंदरे विद्यार्थी सहायक निधीच्या वतीनं त्या खेड्यात जात, मुलींना आत्मविश्वास देणारी शिबिरं आयोजित करत. निर्मलाताईंच्या कार्यक्रमात राजकारण नव्हतं, एक निखळ सामाजिक दृष्टिकोन होता. पुष्पाबाई त्यांच्यासोबत खेड्यातल्या शिबिरात असत.
मुंबईत मृणालताई गोरे यांच्या कार्यक्रमांत, चळवळीत पुष्पाबाई पूर्ण बुडाल्या होत्या. ‘पाणीवाल्या मृणालताई’ स्रियांच्या सुखासाठी आणि हक्कासाठी लढत. पुष्पाबाई मृणालताईंशी एकरूप झाल्या.
मृणालताई समाजवादी कार्यकर्त्या होत्या. आणीबाणीविरोधी लढय़ात मृणालताई आघाडीवर होत्या, भूमीगत होत्या. पुष्पाबाईंनी आणीबाणीविरोधी लढय़ात भाग घेतला आणि त्या समाजवादी पक्षात ओढल्या गेल्या. मृणालताई, पन्नालाल सुराणा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तो प्रभाव होता. पुष्पाबाईंना नोकरीची, तुरुंगवासाची भीती वाटली नाही.
आणीबाणी आटोपल्यावर जनता पार्टीची स्थापना झाली. समाजवादी मित्रांच्या आग्रहाखातर, मैत्रीखातर, कदाचित त्यांना दुखवायचं नसल्यानं पुष्पाबाई जनता दलाच्या राजकारणात सक्रिय झाल्या; पण तिथं त्या टिकल्या नाहीत. जनता पार्टी जनसंघाच्या नादी लागली हे त्याना रुचलं नाही.
जनता पार्टी स्थापन होईपर्यंत मृणालताई, एसेएम, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव ही चळवळी, समाजिक कामाची कळकळ असणारी माणसं होती. जनता पार्टी स्थापन झाल्यावर ती माणसं एका राजकीय पक्षाचा, सत्तेचे डाव खेळणार्या राजकीय पक्षाचा भाग झाली. व्यक्तिश: ती माणसं सत्तेच्या राजकारणात गेली नाहीत; पण ती माणसं ज्या राजकारणात गुंतली होती ते राजकारण पुष्पाबाईंना रुचलं नाही.
पुष्पाबाई जनता दलापासून आणि नंतर राजकारणापासूनच दूर झाल्या. 1970 ते 1980 ही 10 वर्षे पुष्पाबाई राजकारणात भरपूर सक्रिय होत्या. पुष्पाबाई राजकारणाकडं गेल्या त्या सामाजिक विचारांमुळं आणि आपण समाजाला काही दिलं पाहिजे या विचारानं. त्या गोष्टी राजकारणात साधता येत नाहीत असं लक्षात आल्यावर नंतर त्या दूर झाल्या; त्यांची वृत्ती, विचार, व्यक्तिमत्त्व, राजकारणातल्या तडजोडींशी जुळणारं नव्हतं.
राजकारणातून त्या दूर झाल्या; पण मृणालताई, बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, नरेंद्र दाभोलकर यांच्याशी जुळलेले सामाजिक कार्याचे अनुबंध घट्ट होते. मृणालताईंच्या सामाजिक संघर्षात त्या सामील होत्या, बाबा आढाव यांच्या सामाजिक कृतज्ञता निधीत त्यांचा हातभार होता.
पुष्पाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचं बरोब्बर दर्शन घडलं ते शीला किणी यांचे पती रमेश किणी यांच्या खून प्रकरणात. शीला किणी पुष्पाबाईंच्या समोरच्या इमारतीत राहत. पुष्पाबाई त्यांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. या प्रकरणात राज ठाकरे गुंतलेले असले तरी प्रकरण राजकीय नव्हतं. बिल्डर आणि राजकारणी कसे जनतेला लुटतात ते या प्रकरणातून उघड झालं होतं. शीला किणी एकट्या पडल्या होत्या. पुष्पाबाई त्यांच्याबरोबर लढय़ात उतरल्या. पुष्पाबाईंच्या जिवाला धोका होता हे जगाला कळत होतं, पण पुष्पाबाईंच्या ते गावीही नव्हतं.
बिल्डर लोकांनी छळ केला होता अशी अनेक माणसं पुष्पाबाईंकडं पोहोचली, आमचा प्रश्न सोडवा असं म्हणत. खरं म्हणजे यातून ट्रेड युनियनसारखी संघटना उभी राहू शकत होती, पुष्पाबाई एक गब्बर आणि मातब्बर असामी होऊ शकत होत्या; पण तसा विचारही पुष्पाबाईंना सुचला नाही.
पुष्पाबाई नागरी निवारा कार्यक्रमात होत्या. केशव गोरे स्मारक ट्रस्ट या मृणालताईंच्या संस्थेत मृणालताईंसोबत आणि त्यांच्या निधनानंतरही पुष्पाबाई सक्रिय होत्या. माधव साठे डॉक्युमेंटेशन सेंटर, आगरकर केंद्र, य. दि. फडके संशोधन केंद्र या संस्थांच्या कामात पुष्पाबाईंचा सक्रिय सहभाग होता.
मृणालताईंच्या मृत्यूनंतर पुष्पाबाईंच्या पुढाकारानं मृणालताईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ दक्षिण आशिया केंद्र निर्माण करण्यात आलं. पुरुषसत्ताक पद्धत आणि विचार याबाबत स्रियांना जागरूक आणि प्रबळ करणारे कार्यक्रम हे केंद्र आयोजित करत असत. या कार्यक्रमात अफगाणिस्तान, पाकिस्तान इत्यादी ठिकाणांहून कार्यकर्त्या येत असतात.
वय झाल्यामुळं, मधुमेहासारख्या व्याधीमुळं, पुष्पाबाई थकल्या, बेजार झाल्या. त्यांचा वावर र्मयादित झाला; पण विचारानं त्या थकल्या नव्हत्या, लिहित होत्या. हॉस्पिटलातही त्या कधी स्वस्थ पडून राहिल्या नाहीत, डॉक्टर प्रेमानं दम देत असत; पण त्याकडंही दुर्लक्ष करून पुष्पाबाई लिहित राहिल्या. शेवटल्या दिवसात त्यांनी गांधीजींचा विचार खास पुष्पाबाई शैलीत अगदी स्पष्ट आणि परखडपणे लिहिला, त्यावर भाषणंही केली.
पुष्पाबाईंचा विचार काळाच्या ओघात, कामं करत असताना, लोकांच्या सोबत राहून विकसित होत गेला. त्या कधी काळी कम्युनिस्ट, गांधीवादी, समाजवादी विचारांच्या वतरुळात होत्या. पण तिथंही तिथली माणसं आणि त्यांनी केलेली कामं त्यांना प्रभावित करत राहिली. वैचारिक पठडीत त्या अडकल्या नाहीत. स्वातंत्र्य, समता या मूल्यांसाठी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. पुष्पाबाई निर्भय होत्या त्या त्यांच्या या मूल्यांच्या बळावर.
damlenilkanth@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)