डॉ. यश वेलणकरमाणसाच्या मनात विचार येत असतात. पण सजगता नसेल तर हे विचार माणसाच्या सर्व अस्तित्वाचा ताबा घेतात. मी कमनशिबी आहे असा मनात विचार येतो आणि त्यामुळे मी दुखी होतो. मी अपयशी आहे, मला काहीच जमत नाही, असा विचार मन उदास करतो. असे विचार त्रासदायक भावना निर्माण करतातच; पण तेच माझ्या आयुष्याची दिशा ठरवतात. मी कसे वागायचे याचा निर्णय माझे विचारच करीत असतात. गंमत म्हणजे काहीवेळा हे विचार परस्परविरोधी असतात. एक विचार येतो, लग्न करूया. काही वेळात दुसरा विचार येतो, करायचे की नाही करायचे? हाच प्रश्न संभ्रम निर्माण करतो. माणसाला गोंधळवून टाकतो. मनातील अशा बदलणाऱ्या विचारांमुळे माणसाचे वागणे विक्षिप्त होते.औदासीन्य, चिंतारोग, ओसीडी अशा सर्व आजारांना विचार कारणीभूत असतात. आॅब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर हा एक प्रकारचा चिंतारोग आहे. असा त्रास असणाºया व्यक्तीच्या मनात एखादा त्रासदायक विचार पुन: पुन्हा येत राहतो आणि त्या विचारानुसार कृती होत नाही तोपर्यंत तिला अस्वस्थ वाटत राहते.माइण्डफुलनेस किंवा सजगतेच्या अभ्यासाने हा प्रश्न सुटू शकतो. सजग राहायचे म्हणजे या क्षणात परिसरात, शरीरात आणि मनात काय घडते आहे ते जाणत राहायचे. असे करताना आपण आपल्या मनातील विचार जाणत असतो. माझ्या मनात आत्ता, याक्षणी हा विचार आहे, एवढेच जाणायचे. पण त्या विचाराला आपल्या मनाचा ताबा घेऊ द्यायचा नाही. विचारापासून अंतर ठेवायचे. हे करणे अवघड आहे. विचार खूप सशक्त असतात, मनात विचार येऊ लागतात, त्यावेळी त्यांच्यापासून स्वत:ला स्वतंत्र ठेवणे सहज शक्य होत नाही; पण सजगतेच्या सरावाने हळूहळू ते जमू लागते. त्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. त्यातील एक उपाय म्हणजे जे विचार मनात येत असतील त्यांचा रंग ओळखायचा, त्यांची दिशा ओळखायची. आणि त्याला नाव द्यायचे.एखाद्या वेळी आपला झालेला अपमान आठवतो आणि ते विचार झुंडीने येऊ लागतात. अशावेळी सजगता ठेवून त्यांच्याकडे पहायचे आणि मनात नोंदवायचे, भूतकाळातील विचार, रागाचे विचार. बस इतकेच ओके. हे नोंदवले की त्या विचारात वाहत जायचे नाही. विविध विचार आपल्याला वेडे करीत असतात. पण सजगता असेल तर जाणीवपूर्वक आपले अटेन्शन, आपले लक्ष शरीरावर आणायचे. जोराचा वारा सुटला की समुद्रातील बोटी नांगर टाकून एका जागी स्थिरावतात. तसेच विचारांचे वादळ येईल त्यावेळी ते ओळखायचे, त्याला नाव द्यायचे, सजगतेचा नांगर श्वासाच्या हालाचालीवर किंवा शरीरातील इतर संवेदनांवर टाकायचा आणि वादळ शांत होण्याची वाट पाहायची.विचारापासून अंतर ठेवण्याचा दुसरा उपाय म्हणजे त्या विचाराची चेष्टा करायची, त्याचे महत्त्व कमी करायचे.. माझ्या हाताला जंतू लागले असतील हा विचार मनात पुन: पुन्हा येत असेल, ठाण मांडून बसला असेल, तो चुकीचा आहे हे मनाला पटत असूनदेखील तो जात नसेल, अस्वस्थ करीत असेल तर त्या विचाराला एखाद्या गाण्याची चाल लावायची. ‘वर ढगाला लागली कळ, पाणी थेंबथेंब गळ’ यासारख्या कुठल्याही ओळीची चाल मनातील विचाराला लावायची. ‘माझ्या हाताला लागली घाण’ हे वाक्य ढगाला लागली कळ या चालीत म्हणायचे, पुन्हा पुन्हा म्हणायचे. तुम्हाला हा उपाय गंमतीशीर वाटेल; पण तो खूप परिणामकारक आहे. असे केल्याने आपण त्या विचाराचे गांभीर्य काढून टाकतो. त्यामुळे त्याची शक्ती कमी होते, त्या विचारामुळे येणारी अस्वस्थता कमी होते. आपण स्वतंत्र होतो. मुक्त होतो.मानसशास्त्रात या तंत्राला डी-फ्युजन म्हणतात. विचार आपल्याशी फ्युज झालेला असतो, जोडला गेलेला असतो. ही जोडणी तोडायची. विचाराला नाकारायचे नाही, त्याला बदलण्याचाही प्रयत्न करायचा नाही. कारण असे प्रयत्न फारसे यशस्वी होत नाहीत. आपण कितीही प्रयत्न केला तरी असा एखादा विचार मनात पुन: पुन्हा येतो. आता कुठल्याच विचाराला महत्त्व द्यायचे नाही. वेगवेगळे विचार येतील आणि जातील. ते कसे बदलत आहेत हे तटस्थपणे पाहायचे.बाराव्या शतकातील सुफी संत रुमी यांची एक कविता आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, धर्मशाळेत जसे वेगवेगळे प्रवासी येतात आणि जातात. काही लगेच जातात, काही अधिक काल थांबतात; पण धर्मशाळेत कायमचे कुणीच राहत नाही. माझ्या मनाच्या धर्मशाळेत असेच विचार येतात आणि जातात. मी त्यांना पाहत राहतो, मी स्वतंत्र आहे, मुक्त आहे. रुमी यांच्यासारखा अनुभव आपण सजगतेने घेऊ लागलो तर आपणही म्हणू शकतो, की मी विचारांना पाहतो; पण त्यांना माझा ताबा घेऊ देत नाही. मी स्वतंत्र आहे, मुक्त आहे.(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
स्वतंत्र मुक्त स्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:29 AM