सोनेरी बेटावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 06:38 AM2018-03-18T06:38:38+5:302018-03-18T06:38:38+5:30
बँकर म्हणून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांवर पाणी सोडून गोगँने पूर्णवेळ पेंटिंगला वाहून घेतले खरे; पण त्याची वास्तववादी, आधुनिक शैलीतली पेंटिंग्ज कोणालाच आवडत नव्हती. कोणीही ती विकत घेत नव्हते. पैसे तर मिळत नव्हतेच, टीका मात्र पदरी पडत होती. घरदार सोडून शेवटी तो कायमचा ताहिती बेटांवर गेला आणि एका प्रतिभावंत चित्रकाराचा ‘पुनर्जन्म’ झाला!
काही वेळा लौकिकदृष्ट्या सगळंच ठीक, उत्तम असतं. पैसा असतो, व्यावसायिक यश असतं, मानमरातब, सुखी कौटुंबिक आयुष्य.. कमी कशाचीच नसते. पण मनाला कलंदराची, अशाश्वततेची ओढ लागते, अस्थिरतेला कवटाळायला मन आसुसलेलं राहतं आणि मग पावलं प्रवासाला निघतात. काय हवं आहे ते माहीत नसताना काहीतरी मिळवण्याकरता केलेला हा प्रवास असतो. त्यातूनच मग एका अद्वितिय प्रतिभेच्या चित्रकाराचा दुसरा जन्म होतो.. जसा पॉल गोगॅचा झाला. उत्तम बँकर म्हणून स्थिरस्थावर असलेला गोगॅँ चित्रं काढण्याच्या, चित्रकलेकरताच सगळा वेळ देण्याच्या ध्यासाने पछाडला होता. मात्र पोस्ट इम्प्रेशनिस्ट शैलीतली त्याची चित्रं त्याला स्वत:लाच फारशी समाधान देत नव्हती. ती चित्रं विकलीही जात नव्हतीच. गोड गुलाबी, दैवी चेहऱ्याच्या तरुणींची दिवाणखान्याला शोभेलशी पेंटिंग्ज करणाºयांच्या आणि ती मोठ्या संख्येनं विकत घेणाºयांची पॅरिसमध्ये चलती होती. गोगॅँ पॅरिसच्या, एकंदरीतच युरोपियन समृद्ध; पण कृत्रिमतेमध्ये जखडलेल्या, चकचकाटी वातावरणाला कंटाळला, शहरी जगण्याचा उबग आला त्याला आणि मग बायको-मुलांना वाऱ्यावर सोडून, घर मोडून तो निघाला मुक्त, आदिम आयुष्याच्या शोधात, फ्रेन्च पोलिनेशियाचा प्रवास करत जाऊन पोचला सोनेरी सूर्यप्रकाशाने भरलेल्या ताहिती बेटांवर. चित्रकार म्हणून गोगॅँचा दुसरा जन्म झाला या प्रवासात..
गोगँचा हा प्रवास, ताहिती बेटांवरचं त्याचं वास्तव्य याबद्दल कलेच्या इतिहासात खूप काही लिहिलं गेलं, त्यावर सिनेमे निघाले, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. गोगँस्वैर, मनमुराद आयुष्य जगला या मुक्त बेटांवर. त्याच्या इथल्या जीवनशैलीवर टीकाही खूप झाली. मात्र एक चित्रकार म्हणून स्वत:ला संपूर्ण नव्याने घडवणे, नव्या रंगछटा, नवे आकार, नवे तत्त्वज्ञान स्वत:त रुजवून घेणे, आपले आधीचे आयुष्य पूर्णपणे पुसून टाकणे त्याला शक्य झाले ते केवळ या प्रवासामुळेच.
अनोख्या, लखलखीत सूर्यप्रकाशात सदैव न्हाऊन निघालेल्या ताहिती बेटांवर राहून पॉल गोगॅँने अक्षरश: असंख्य चित्रं काढली. नजरेला भुरळ घालणारा तिथला निसर्ग, दाट, पाचूसारखी हिरवी अरण्यं, उबदार समुद्र, निळेशार तलाव आणि सुंदर ताहिती स्त्रिया. त्यांच्या त्वचेवरची झळझळती सुवर्णआभा, चेहºयावरचे निरागस भाव त्याच्या पेंटिंग्जमध्ये उमटले. मात्र गोगॅँच्या या पेंटिंग्जमध्ये फक्त एवढेच नव्हते. ताहिती बेटांवरच्या प्राचीन, पोलिनेशियन संस्कृतीच्या अस्तित्वखुणा, तिथल्या माओरी आदिवासींच्या चालीरिती, रिवाज, त्यांच्या देवदेवता, अंधश्रद्धा या साºयाचे चित्रण, इतकेच नव्हे तर कालांतराने एकेकाळच्या इथल्या अस्पर्शित निसर्गावर, निरागस आदिवासींच्या जगण्यावर उमटत गेलेल्या आधुनिक युरोपियन संस्कृतीच्या प्रदूषणाच्या खुणाही गोगॅँच्या पेंटिंग्जमधून स्पष्टपणे उमटल्या. ताहिती बेटावरच्या निसर्गाने गोगॅँमधल्या चित्रकाराला भुरळ पाडली होती आणि त्याचवेळी त्याच्यातल्या संवेदनशील माणुसकीने, बुद्धिवादी विचारसरणीने त्याला अंतर्मुखही केले होते. पॉल गोगँने काढलेली ताहिती तरुणींची पेंटिंग्ज नंतरच्या काळात जितकी गाजली तितकीच त्याने तिथल्या वास्तव्यात लिहिलेली, माओरी संस्कृतीच्या झपाट्याने होत जाणाऱ्या ऱ्हासाचे, युरोपियनांच्या उन्मत्त, बे़फिकीर, स्वैर वागण्याचे डोळस डॉक्युमेन्टेशन करणारी ताहितीयन जर्नल्सही गाजली.
१८९१ मध्ये गोगँता हितीच्या दिशेने निघाला त्यावेळी अस्वस्थता, निर्धनता आणि खचलेला आत्मविश्वास आणि निराश मन:स्थिती याव्यतिरिक्त त्याच्यापाशी काहीच नव्हते. ताहिती त्याच्याकरता एक रम्य, अप्राप्य स्वप्नासारखे ठिकाण होते, जिथे पोहचल्यावर आपल्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होईल, अशी दुर्दम्य इच्छा खोल मनात बाळगून त्याने हा प्रवास सुरू केला. बाह्यत: बेदरकार, उद्धट, स्पष्टवक्ता गोगॅँ मनाने हळवा, संवेदनशील होता. स्वैराचारी म्हणून नंतरच्या काळात शिक्का बसलेला गोगॅँ खरं तर त्याच्या पत्नीवर, मुलांवर जिवापाड प्रेम करणारा होता. मर्चण्ट बॅँकिंगच्या पैसे मिळवून देणाºया क्षेत्राला लाथ मारून त्याने पूर्णवेळ पेंटिंगला वाहून घेतलं होतं खरं; पण त्याची वास्तववादी, आधुनिक शैलीतली पेंटिंग्ज कोणालाही आवडत नव्हती. कोणीही ती विकत घेत नव्हते. पैसे मिळत नव्हतेच शिवाय टीका पदरी पडत होती. श्रीमंतीची सवय असणाºया बायकोने घटस्फोटाची नोटीस दिली होती, मुलांचे हाल होत होते. युरोपमध्ये कुठेच त्याला पेंटिंगच्या जिवावर जगता येईना. शेवटी तो या ‘़फिल्दी युरोप’चा त्याग करून ताहिती बेटांवर कायमचे राहण्याकरता गेला.
पोलिनेशियाच्या या प्रवासाला निघण्याआधी ब्रिटनी, पनामा इथे त्याने आपले नशीब आजमावण्याचे असफल प्रयत्न केले होते. परिश्रम, उपासमार, पैसे जमा करण्याकरता करावे लागलेले उपद्व्याप यामुळे तो शारीरिक, मानसिकरीत्या थकलेला होता. ताहितीला पोहचताच तिथल्या जादुई, लख्ख कोवळ्या सूर्यप्रकाशाने त्याच्या मनावरचे मळभ क्षणात दूर केले. तिथल्या निरागस, अनागरी ताहितीयन स्त्री-पुरुषांनी गोगॅँचे मनापासून स्वागत केले, त्याला आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या चालीरिती, जीवनशैलीमध्ये गोगॅँ मिसळून गेला.
झळाळते, गडद रंग, ठसठशीत, लयदार आकारातल्या आदिम आकृत्यांनी गोगॅँचे कॅनव्हास भरून जायला लागले. गोगँ झपाटून जाऊन रंगवायला लागला त्या मोकळ्या वातावरणात. ताहिती बेटांवरच्या खुलेपणामुळे गोगॅँ झपाटून गेला. आपल्या या नव्या आयुष्यातल्या दिनक्र माच्या त्याने नोंदी केल्या. नोआ नोआ हे ट्रॅव्हल जर्नल त्याच्या चित्रांइतकेच प्रसिद्ध आहे. ताहिती बेटांचे अनाघ्रात सौंदर्य, तिथले रीतिरिवाज, अंधश्रद्धा, निरागस मनाचे तिथले स्त्री-पुरु ष, त्यांनी टाकलेला विश्वास, शहरी बनेलपणाने गोगॅँने उठवलेला त्यांचा फायदा, बदलत गेलेला त्याचा स्वभाव, वागणे, तिथल्या स्त्रियांसोबतचे; त्यात एक अल्पवयीन मुलगीही, प्रेमसंबंध, झालेल्या चुका या सगळ्याबद्दल गोगॅँने यात मोकळेपणाने, सविस्तर लिहिलेले आहे. या बेटांवर असताना त्याने रंगवलेली असंख्य चित्रे त्याच्या या नोंदींची प्रत्यक्षदर्शी साक्षी आहेत. असंख्य पेंटिंग्ज, स्केचेस, शिल्प, वुडकट्स त्याने निर्माण केले. नव्या प्रदेशात मिसळून गेल्यावरही आपल्यातला चित्रकार, मुसाफिर, परदेशी व्यक्तिमत्त्व गोगॅँने पूर्ण पुसून टाकलं नाही. आजूबाजूच्या प्रदेशाकडे, जगण्याकडे तो तटस्थतेनं पाहू शकत होता, कॅनव्हासवर उतरवू शकत होता. त्याचा हा अलिप्तपणा, परकेपणा त्याच्या पूर्वायुष्यातल्या सावध व्यावसायिक वृत्तीच्या नागरी व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक होत्या. युरोपियन वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेतही हे मूळ होतेच. गोगॅँच्या चित्रांमध्ये मात्र हा भेद, दुजाभाव दिसून येत नाही. ताहितींचे विशुद्ध सौंदर्यपूर्ण, गूढ, निरागस जगणे जसेच्या तसे उतरवणे त्याच्यातल्या चित्रकाराला निर्विवादपणे शक्य झाले. आपल्या मनातल्या स्वप्नाचा, कलेतले अपूर्णत्व दूर करण्याचा ध्यास घेऊन केलेला प्रवास कलावंताला किती उंचीवर घेऊन जाऊ शकतो, त्याचे आयुष्य, जगणे किती आमूलाग्र बदलून जाऊ शकते, पूर्णत्वाच्या शिखरावर त्याला घेऊन जाऊ शकतो याचे निदर्शक गोगँचा हा प्रवास आहे. नवे प्रदेश शोधत, अपरिचित जगामध्ये आपल्या कलाविष्काराला पोषक वातावरण धुंडाळत भटकणारे चित्रकार अनेक आहेत. मात्र गोगॅँ त्या सर्वांपेक्षा वेगळा ठरला. पोलिनेशियनचा हा प्रवास गोगँतल्या चित्रकाराला, माणसाला अनेक अर्थांनी समृद्ध करणारा ठरला तरी व्यावसायिकदृष्ट्या त्याला यातून फार आर्थिक फायदा त्याच्या हयातीत झाला नाही हे दुर्दैव. खरं तर हे चित्रकार जमातीचं वैश्विक, सार्वकालिक दुर्दैवच म्हणायला हवं. गोगँ त्याला अपवाद ठरला नाही इतकंच.
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत.)
sharmilaphadke@gmail.com