डॉ. यश वेलणकरमाणसाला चिंता असायलाच हवी. ती असेल तरच माणूस त्या चिंतेच्या निवारणार्थ सक्रि य होतो, कृती करू लागतो. माणसाला कार्यप्रवृत्त करणारी चिंता निरोगी चिंता असते; पण ज्यावेळी तिचा माणसाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो त्यावेळी तीच चिंता रोग ठरते. चिंतेला रोग म्हटले जाते त्यावेळी मनातील चिंतेचा परिणाम माणसाच्या वर्तनावर दिसू लागतो. चिंतेमुळे त्याच्या मनात उलटसुलट विचार येत राहतात आणि त्या विचारांच्या भोवऱ्यात भंजाळून गेल्याने माणूस कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, कृती करीत नाही. सतत अस्वस्थ राहतो. रोजचे काम करणेदेखील त्याला अशक्य होते.मानसरोगात आरोग्य आणि आजार यांची सीमारेषा खूप अंधुक असते. प्रत्येक माणसाला कसली तरी भीती असू शकते. चिंता, नैराश्य या भावनादेखील सर्वांनाच असतात. एकाचवेळी परस्परविरोधी विचार सर्वांच्याच मनात येत असतात, कधीना कधी काही भास सर्वांनाच होतात; पण या भावनांचा दुष्परिणाम त्या माणसाच्या वर्तनावर होऊ लागतो, त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते, त्याच्या विकासामध्ये अडथळा येऊ लागतो, त्यावेळी उपचारांची आवश्यकता भासते.उदाहरणार्थ एखाद्याला लिफ्टसारख्या बंदिस्त जागेची भीती वाटत असेल आणि त्याचे आॅफिस दहाव्या मजल्यावर असेल. लिफ्टच्या फोबियामुळे तो माणूस आॅफिसमध्ये जायचे टाळू लागला तर त्याने या फोबियावर उपचार करून घ्यायला हवेत. एअरहोस्टेसला उंच जागेची भीती वाटत असेल तर ती तिचे कामच करू शकणार नाही.फोबियामध्ये ज्या स्थितीची किंवा कृतीची भीती असते तिची केवळ कल्पना केली तरी छातीत धडधडू लागते, अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे विमानात बसायचे या कल्पनेनेच ती अस्वस्थ राहू लागली तर ती भीती तिने काढून टाकायला हवी, उपचारांनी ते शक्य आहे.कल्पनादर्शन आणि सजगता यांनी असे उपचार करता येतात. एखाद्याला बंद जागेची भीती वाटते. ही भीती घालवायची असेल तर प्रथम निर्धार करायचा की ही भीती कमी करायची आहे. नंतर आपण लिफ्टमध्ये आहोत अशी कल्पना करायची. सुरुवातीला केवळ कल्पनेनेदेखील भीती वाटू लागेल, छातीत धडधडू लागेल; पण प्रतिक्रि या न करता त्या संवेदना पहायच्या. धडधड खूपच त्रासदायक असेल तर दीर्घ श्वसन सुरू करायचे. पुन्हा शरीरात काय होते आहे ते जाणायचे आणि त्याचा स्वीकार करायचा. असे रोज केले की हळूहळू कल्पना करूनदेखील भीती वाटणार नाही. मग प्रत्यक्ष लिफ्टमध्ये जायचे आणि सजगतेने लक्ष शरीरावर ठेवायचे, शरीरात जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार करायचा. असे केल्याने फोबिया दूर होतो.चिंतारोगसदृश आणखी तीन प्रकारच्या विकृती आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे मंत्रचळ किंवा शास्त्रीय भाषेत ओसीडी म्हणजे आॅब्सेसिव कम्पलसिव्ह डिसआॅर्डर.दुसरा प्रकार पीटीएसडी, म्हणजे आघातोत्तर तणाव आणि तिसरा प्रकार क्र ोनिक फटिग सिंड्रोम म्हणजे दीर्घकालीन थकवा. आपल्या येथे हे आजार असलेले अनेक रुग्ण असतात, पण त्यांचे योग्य निदान होत नाही. या सर्व मानसिक विकृतींमध्ये त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. चिंता अणि औदासीन्याशी संबंधित एक आजार परदेशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आपल्या देशातही हा आजार आहे; पण त्याचे रुग्ण या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरत राहतात आणि वेदनाशामक किंवा शक्तिवर्धक औषधे वर्षानुवर्षे घेत राहतात. पण या आजाराचे मूळ औदासीन्यामध्ये असते. अॅण्टी डिप्रेसण्ट औषधांनी या रु ग्णाला काहीकाळ बरे वाटते. या आजाराला क्र ोनिक फटिग सिंड्रोम किंवा फायब्रोमायाल्जिया असे म्हणतात.खरे म्हणजे हे दोन वेगवेगळे आजार आहेत, पण त्यांची लक्षणे सारखीच आहेत. सर्व शरीरात स्नायुदुखी आणि खूप काळापासून जाणवणारा थकवा, ही दोन प्रमुख लक्षणे त्यामध्ये असतात. म्हणूनच आपल्या येथे त्यांच्यावर वेदनाशामक औषधे आणि टॉनिक्स यांचा भडिमार केला जातो. त्यांच्या पॅथॉलॉजिकल टेस्टमध्ये मात्र कोणतीही विकृती आढळत नाही, म्हणजे हिमोग्लोबीन वगैरेचे प्रमाण योग्य असते. दोन्ही आजारांच्या इतिहासात मात्र फरक असतो. फायब्रोमायाल्जियाची सुरु वात कोणत्यातरी भावनिक किंवा शारीरिक आघाताने झालेली असते तर ेक्रोनिक फटिग सिंड्रोम एखाद्या व्हायरल इन्फेक्शन म्हणजे फ्लू किंवा चिकुन गुन्यानंतर सुरू होतो.या दोन्ही आजारांचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा चार पटींनी जास्त दिसून येते. दोन्हीमध्ये शांत झोप लागत नाही आणि अस्वस्थता, चिडचिड, नैराश्य अशी मानसिक लक्षणे दिसत असतात. या दोन्हीपैकी एका आजाराचे निदान झालेले आहे अशा पन्नास स्त्री रुग्णांवर सजगता ध्यानाचा परिणाम काय होतो याचे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. त्यानुसार दहा आठवड्यांच्या कोर्सनंतर ध्यान न करणाºया रुग्णांच्या तुलनेत या स्त्रियांचा त्रास कमी झालेला दिसून आला. याचे कारण या आजाराचे मूळ कारण रुग्णांच्या मेंदूतील पेन थ्रेशोल्डमध्ये असते.सजगता ध्यानाने वेदनांना दिली जाणारी प्रतिक्रि याच बदलली जात असते. त्यामुळे वेदना आणि थकवा यामुळे येणारे दु:ख सजगता ध्यानाने कमी होते.कोणत्या चिंता तुम्हाला छळतात?1 पॅनिक अटॅक : यामध्ये अचानक भीती वाटू लागते, त्यामुळे काहीवेळ छातीत धडधडते, अतिशय अस्वस्थ वाटते, आपल्याला हार्ट अटॅक आला आणि आता आपण मरणार अशी तीव्र भीती वाटते. अशावेळी हृदयाची तपासणी केली, ईसीजी काढला तर तो नॉर्मल असतो; पण भीती मात्र पटकन जात नाही.2 फोबिया : यात भीतीचा अचानक अटॅक येतो. फोबियामध्ये कोणत्या गोष्टीची किंवा कृतीची भीती वाटते हे तो माणूस सांगू शकतो. काहीजणांना गर्दीची भीती वाटते, काहींना एकटेपणाची वाटते, काहीजणांना उंच जागी जाण्याची, तर काहीजणांना लिफ्टसारख्या लहान, बंदिस्त जागी जाण्याची भीती वाटते. कशाची भीती वाटते त्यानुसार त्या फोबियाला नाव दिले जाते. क्लस्ट्रोफोबिया म्हणजे बंदिस्त जागेची भीती, आगारोफोबिया म्हणजे उंच ठिकाणी जाण्याची भीती, सोशल फोबिया म्हणजे अनोळखी माणसांची भीती.3 जनरल अँक्झायटी डिसआॅर्डर : या प्रकारामध्ये मनात सतत चिंतेचे विचार येत राहतात, आणि त्यांचा परिणाम माणसाच्या वर्तनावर दिसू लागतो. त्याची कार्यक्षमता कमी होते, तो एकटा राहू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही. सतत अस्वस्थ, घाबरलेला किंवा चिडचिड करीत राहतो. मानसोपचार आणि माइण्डफुलनेस थेरपी यांनी ही अस्वस्थता कमी होते.(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)manthan@lokmat.com
चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 6:03 AM
अनेकजण म्हणतात, आम्हाला खूप चिंता, काळजी आहे. खरं तर ही चिंताच आपल्याला कार्यप्रवृत्त करीत असते. पण या काळजीचा जर आपल्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असेल तर तिचे आजारात रूपांतर होते!
ठळक मुद्देमानसरोगात आरोग्य आणि आजार यांची सीमारेषा खूप अंधुक असते.