जिप्सी
By admin | Published: December 6, 2015 12:05 PM2015-12-06T12:05:00+5:302015-12-06T12:05:00+5:30
मायदेशातल्या धर्मछळाच्या आगीतून परदेशाच्या फुफाटय़ात ङोपावलेली रोमानी पाखरं. ती शतकानुशतकं भिरभिरतच राहिली. वणव्याने त्यांचा पाठलाग केला, मात्र तरीही अवचित उगवणारी, अचानक पसार होणारी, बिना ठावठिकाण्याची, पण जगभर पसरलेली ही माणसं आत्ताआत्तार्पयत जगासाठी रहस्यमयच होती.
Next
>- डॉ. उज्ज्वला दळवी
चारचाकी बंद घोडागाडय़ांत सगळा संसार लादून ते रंगीबेरंगी विक्षिप्त पोशाखातलं कुटुंब नव्या गावात आलं. पुरुषांनी घोडय़ांच्या दाणावैरण-खरा:याचं पाहिलं आणि मग गावात फिरून उमदे घोडे विकणं, भांडीकुंडी, अवजारं विकणं, धातूच्या वस्तूंची डागडुजी करणं वगैरे फिरस्त्या कामांच्या मागे लागले. गाडय़ांच्या आडोशात, पालांतल्या चुलींवर बायकांनी कालवण-भाकरी शिजवली आणि नंतर विणकाम करताकरता भात्याने चुलीला वारा घालून नव:यांच्या धातुकामालाही हातभार लावला. काहीजणींनी गूढगुडुप पालांमधल्या गहि:या प्रकाशात जादूच्या गोलात बघून गावक:यांना भविष्य सांगितलं. सगळ्या कामांत मुलांची उमेदवारी चालूच होती. दिवेलागणीला मजेची नाचगाणी झाली. निजण्यापूर्वी आजीआजोबांनी मुलांना जुन्या गोष्टी सांगितल्या.’
- जिप्सींच्या मुक्कामाचं अशासारखं वर्णन पाश्चिमात्य वा्मयात अनेक ठिकाणी आढळतं. जिप्सींच्या नाचगाण्यांचा युरोपातल्या जॅझ, बोलेरो, फ्लॅमेंको वगैरे नृत्यसंगीतावर प्रभाव आहे. रुमानियन-बल्गेरियन लग्नांत जिप्सी पद्धतीच्या संगीताची चलती आहे. तरी अवचित उगवणारे, अचानक पसार होणारे, बिना ठावठिकाण्याचे ते जगभर पसरलेले जिप्सी आत्ताआत्तापर्यंत रहस्यमयच होते. त्यांचं गूढ उकलायचा अनेकांनी प्रयत्न केला. दोनशे वर्षांपूर्वी, त्यावेळच्या समस्त जिप्सीबोलींचा अभ्यास करून भाषा शास्त्रज्ञांनी आणि मानववंश शास्त्रज्ञांनी जिप्सींचं कूळ आणि मूळ शोधलं. अधिक अभ्यासाने जिप्सींच्या वाटचालीचा मोघम आराखडाही तयार झाला. अलीकडे युरोपभरातल्या जिप्सींच्या जीन्सचा अभ्यास झाला. त्याने त्या आराखडय़ाला पुष्टी मिळाली.
गझनीच्या महमुदाने हिंदुस्तानावर अनेक धाडी घातल्या. त्या धाडींच्या काळात एकाच कनौज शहरातली पण वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतली शेकडो हिंदू घराणी देशोधडीला लागली. ती इस्लामी अंमलाला घाबरून निघाली की महमुदाने बळजबरीने हालवली कोण जाणो! मध्य भारतातून उठवलेला तो जत्था उत्तर हिंदुस्तानात काही शतकं स्थिरावला. दहाव्या शतकापासून त्यांच्यातले लोक गटागटाने हिंदुस्तानाबाहेर उत्तरेला गेले. त्यांच्यातले पुरुष स्वत:ला ‘राम’ ऊर्फ‘रॉम’ म्हणवत आणि म्हणून ते रोमानी झाले. त्या सगळ्यांची मूळ भाषा मध्य-भारतीय धाटणीची होती. तिच्यात काश्मिरीसारख्या उत्तर भारतीय भाषा आणि मग फारसी आणि आर्मेनियन मिसळल्या. बहुतेक गट बाराव्या शतकापर्यंत तुर्कस्तान-रोमानियामार्गे ग्रीसमध्ये पोचले. ग्रीसमध्ये चाललेल्या लढायांत भाग घेत ते तिथे बराच काळ स्थिरावले. त्या अवधीत ग्रीक भाषेचे शब्दच नव्हे तर बरंचसं व्याकरणही त्यांनी उचललं आणि सगळ्या जिप्सींची सामाईक रोमानी भाषा तयार झाली. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्या टोळ्या ग्रीसहून निघाल्या आणि वेगवेगळ्या वाटांनी, वाटेवरच्या भाषांतले शब्द उचलत युरोपभर पसरल्या. ‘युरोपच्या पूर्वेकडून आले त्याअर्थी ते इजिप्तचे असावेत’ अशा गैरसमजामुळे त्यांना ‘एजिप्शियन’ ऊर्फ ‘जिप्सी’ असं नाव पडलं.
शोधी-पारधींप्रमाणो जिप्सींच्याही एका टोळीत चाळीस-पन्नास माणसांचं एक ऐसपैस घराणं असे. नात्यातल्या तशा अनेक घराण्यांचा मिळून एक गट असे. मायदेशाला पारखे झालेले ते पोरके त्या गटालाच ‘राष्ट्र’ म्हणत. ते प्रस्थापितांच्या आधारानेच जगले. त्याबाबतीत ते भटके असूनही शोधीपारधींहून वेगळे होते. पण त्यांच्या स्वच्छतेच्या आणि सोवळ्याओवळ्याच्या कल्पना आश्रयदात्या गावांच्या चालीरितींशी मिळत्याजुळत्या नव्हत्या. दक्षिणांग अपवित्र, पाय लागणं अनुचित, परजातीशी पंक्तिभेद वगैरे जुनी हिंदू विचारसरणी बाळगणा:या जिप्सी जमाती विटाळ, सोवळंओवळं आणि सोयरसुतक कटाक्षाने पाळत. ते न पाळणा:या युरोपियनांना त्यांनी नेहमी तुच्छ लेखलं. त्या सोवळेपणापायी त्यांनी भोवतालच्या प्रस्थापितांमध्ये आपला अलिप्त उपरेपणा हट्टाने टिकवून धरला. म्हणून त्यांना ग्रीक भाषेत ‘अथिंगनी’ म्हणजे अस्पृश्य असंच नाव पडलं. भटकेपणामुळे अशिक्षित राहिलेले जिप्सी गावाशी फटकून वागत. त्यांची मनोवृत्तीही ‘इथे जन्मभर थोडंच राहायचंय! चोरल्या चार कोंबडय़ा तर कुठे बिनसलं?’ अशीच होती. ओसाड वाडे, पडीक बागाईत तर ते ओरबाडून लुटत. जमातीचे न्याय-निवाडे जमात-पंचायतीचं न्यायालय करी. मग गावाचे नियम-कायदे पाळायच्या भानगडीत रोमानी पडत नसत. मनस्वी जिप्सी गावाशी एकजीव झाले नाहीत.
त्याकाळी युरोपात आधी मंगोल आणि मग तुर्की आक्रमणाचं सावट होतं. साशंक युरोपियनांना ते दरिद्री, सावळे भटके लोक हेरच वाटले. गावातले प्रस्थापित त्या उप:यांच्या मूळ गावाबद्दल तर्ककुतर्क करत. ते फ्लॅँडर्सचे असावेतसं वाटलं म्हणून फ्लॅमेन्को, बोहेमियाचे बोहेमियन वगैरे हव्वी ती नावं त्यांना ठेवली गेली. गावातल्या भुरटय़ा चो:या आणि लहानमोठे गुन्हे कानफाटय़ा जिप्सींच्या नावावर खपवले गेले. त्यातले काही गुन्हे तरी खरोखर जिप्सींनीच केलेले असत. त्या गूढ आगंतुकांबद्दल गावक:यांच्या मनांत प्रचंड अढी आणि अदम्य ओढही होती. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या कपोलकल्पित काव्य-कथा-कादंब:यांना ऊत आला. ‘जिप्सी बायका-मुलांना पळवतात, चेटूक करतात’, ‘ती माणसं नव्हेतच’ वगैरे गैरसमज वाढत गेले.
जिप्सींना हाकलणं 145क्पासूनच सुरू झालं. त्यामुळे त्यांनीही पवित्र बदलला.
‘ािस्ती धर्माच्या पालनातल्या आगळीकीचं प्रायश्चित्त म्हणून आम्ही दीर्घकाळ तीर्थयात्र करतो आहोत’ अशी नवीच बतावणी सुरू केली. त्यामुळे नव्या गावात सुरुवातीला त्यांचं आदरातिथ्य होई. कसबी लोहारकाम, घोडय़ांबद्दलचं, झाडपाल्याच्या औषधांचं ज्ञान वगैरेंमुळे त्यांचा गावच्या तालेवारांवरही प्रभाव पडे. त्यांना युरोपियन सरदार-दरकदारांची शिफारसपत्रं मिळत, पण अंदरकी बात कळल्यावर गावकरी त्यांना गावाबाहेर पिटाळत. मग खरी किंवा नकली शिफारसपत्रं पासपोर्टासारखी वापरत जिप्सी नव्या मुक्कामाला जात. डान्यूबच्या खो:यानं मात्र जिप्सी कारागिरांची किंमत जाणली. तिथल्या गावांनी त्यांना हाकललं तर नाहीच उलट गुलाम करून पुढची चार-पाचशे वर्षं वेठीलाच धरलं. तशा स्थिरावलेल्या जिप्सींनी ज्या-त्या गावची भाषा आणि धर्म स्वीकारला. पण मूळ रोमानींचा पीळ आणि सोवळ्याचं खूळ काही सुटलं नाही. त्यामुळे युरोपियनांनी त्यांची छळवणूक केली. त्यांना त्यांची भाषा बोलायला बंदी केली. जर्मनी-नॉर्वेमध्ये त्यांची मुलं सरकारने हिरावून नेली. बोहेमियामध्ये जिप्सी बायकांचे कान कापले, त्यांच्यावर सक्तीचं वंध्यत्व लादलं. अनेक देशांतून जिप्सींची हकालपट्टी झाली. कोलंबसाच्या जहाजातून काही जिप्सींची सक्तीने अमेरिकेत रवानगी झाली. नंतरही जिप्सींना अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात हद्दपार केलं गेलं. दुस:या महायुद्धात तर पृथ्वी ‘निर्जिप्सी’ करायला नाझींनी पंधरा लाख जिप्सींना छळछावण्यांत मारलं! तरीही जिप्सी लोक, त्यांची रोमानी भाषा आणि ‘राष्ट्र’नियम टिकून राहिले. ‘नाक’, ‘कान’, ‘चोर’ वगैरे अनेक भारतीय शब्द अजूनही त्यांच्या भाषेत आहेत. सध्या सुमारे दीड कोटी जिप्सी जगभरात पसरलेले आहेत. भारत सरकारच्या मदतीने लंडनमध्ये 1971 साली त्यांचं पहिलं जागतिक संमेलन भरलं होतं. आता त्यांच्या वेगळेपणाला जागतिक मान्यता मिळते आहे. त्यांचीही मनोवृत्ती बदलते आहे. ते शिकताहेत, स्थानिक भाषाही शिकताहेत. समाजाशी एकजीव होण्यातले फायदे त्यांना समजले आहेत.
मायदेशातल्या धर्मछळाच्या आगीतून परदेशाच्या फुफाटय़ात ङोपावलेली रोमानी पाखरं शतकानुशतकं भिरभिरतच राहिली. वणव्याने त्यांचा पाठलाग केला. तब्बल एका सहस्रकानंतर आणि चाळीस पिढय़ांनंतर त्यांना आता घरटी बांधणं जमतं आहे.
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’
आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’
ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
‘मानवाचा प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा,
संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com