वसंत वसंत लिमये यांची विशेष लेखमाला
लेखांक : एक
समोर गढवालचा नकाशा उघडून बसलो होतो. जागेश्वर, बैजनाथ, बुढाकेदार अशी ठिकाणं खुणावत होती. मन नकळत भूतकाळात गेलं. पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी पंढरीची वारी पहायला दिवे घाटात गेलो होतो. आषाढातील जूनच्या अखेरीचे दिवस, आभाळ गच्च करड्या ढगांनी ओथंबून आलेलं. पावसाची झिमझिम सुरू होती. दिवे घाटातील रस्त्याचा साप नागमोडी वळणं घेत पश्चिमेस उतरत वडकी नाल्याकडे गेलेला दिसत होता. तसं पाहिलं तर रस्ता दिसतच नव्हता ! भगव्या निशाणांनी रंगलेला, लाखो लोकांनी फुललेला रस्ता टाळ-मृदंगाच्या साथीनं ‘जय हरी विठ्ठला’च्या नामस्मरणानं दुमदुमला होता. अनवाणी भेगाळलेली पाऊले, गळ्यात तालात वाजणारे टाळ, गुलाल भंडाऱ्यांनी रंगलेला चेहरा आणि मुखी ‘विठुराया’चं नाव. त्यात लहानमोठे सारेच होते. किती चालायचंय, थकवा, तहानभूक या साºयांचं भान हरपलेली तल्लीनता दिसत होती. शुक्ल पक्षातील आषाढी एकादशीला, सुमारे अडीचशे किलोमीटरचं अंतर कापून पंढरपुरी पोहचणं एवढाच ध्यास. ऊनपाऊस, तहानभूक या कशाचीच तमा न बाळगता ब्रह्मानंदात न्हाऊन निघालेली वारी पाहताना माझ्या शहरी, व्यवहारी मनात एकच प्रश्नाचा भुंगा होता - ‘हे सारं कशासाठी?’ आणि त्याचं उत्तर एकच होतं - श्रद्धा !श्रद्धा या शब्दातच जादू आहे. श्रद्धा आणि विश्वास यात गल्लत करून चालणार नाही. विश्वासाला एक व्यवहाराचं परिमाण आहे. विश्वास देवाण-घेवाणीतून जन्माला येतो, विश्वास निर्माण होण्यासाठी काही धोका पत्करावा लागतो. विश्वासात कमीजास्त होऊ शकतं, त्याला तडा जाऊ शकतो. श्रद्धा ही माझ्या मते विश्वासाची पुढची पायरी आहे. श्रद्धेला व्यावहारिक परिमाण नाही, ती ‘का’ या प्रश्नाच्या पार पलीकडे असते. श्रद्धा तयार होण्यासाठी काही विशेष व्यक्ती, घटना, संदर्भ कारणीभूत ठरतात. पण श्रद्धेमागची कारणं प्रामुख्यानं आपल्या संस्कारात असतात. याच श्रद्धेच्या जोरावर माणसं अनंत हालअपेष्टा, दु:खं, अवहेलना आणि अनिश्चितता पेलू शकतात. वारीमध्ये भाग घेणाºया आबालवृद्धांकडे त्या सावळ्या विठोबावरील श्रद्धा तर हिमालयातील तीर्थयात्रेला जाणाºया यात्रेकरूंकडे गिरिशावरील श्रद्धा दिसून येते. फार पूर्वी म्हणे लोक सर्व निरवानिरव करून हरिद्वारपासूनच पायी चारधाम यात्रेला जात असत. आम्हा भारतीयांच्या मनातही विष्णू आणि शिवाची प्रतीकात्मक रूपं कुठेतरी खोलवर सुप्त स्वरूपात दडलेली असतात.मी तसा देव नसलेल्या घरी वाढलो. रूढार्थानं माझा देवावर विश्वास नाही; पण मला मंदिरात जायला आवडतं. अनवट डोंगरवाटांवर अनेक देवळात मी निवारा शोधत मुक्काम केला आहे. धूप दीप यांच्या सान्निध्यात चित्त शांत करणाºया गाभाºयातील गारवा मला नेहमीच मोहात पाडतो. खूप काळापूर्वी ॠषिमुनींचे आश्रम निसर्गाच्या कुशीत वसलेले असत. कुठलंही गाव घ्या, त्याच्या शेजारी एखादी टेकडी असू दे. त्या टेकडीवर एखादं शिवालय नक्की असतं. त्या जटाशंकराला डोंगर, पर्वत भारी प्रिय ! मला गिरीभ्रमणाच्या नादात या प्रतिमा जवळच्या वाटायला लागल्या. दूर वाटेवरील ‘विठूमाउली’ असो वा हिमालयातील बिकट वाटेवरील केदारनाथ असो, वारी किंवा यात्रा ही त्या श्रद्धेच्या रूपकाचा शोध असावा.असं म्हणतात की, आपल्या संभाषणात, आपण साठ टक्क्याहून अधिक रूपकं किंवा उपमा वापरतो. कुठलंही रूपक हे प्रतीकात्मक असून, अर्थगर्भ असतं. कुठल्याही प्रतीकाचे, रूपकाचे अनेकविध अर्थ व्यक्तिसापेक्ष असतात. जीवनाचं वर्णन करताना अनेक रूपकांचा आधार घेतला जातो. जीवन हे नदीप्रमाणे खळाळता वेडावाकडा वेगवान प्रवाह, बेभान प्रपात आणि समतल प्रदेशात आल्यावर सागरात समर्पित होण्याच्या ओढीला संयमानं आवर घालणाºया प्रौढ प्रमदेप्रमाणे भासतं. घनघोर निबिड अरण्यातील श्वापदांचे भीतिदायक आवाज, जमिनीच्या गर्भात अगम्यपणे खोलवर गेलेली मुळं, विविध ढंगी अस्ताव्यस्त वाढलेले वृक्ष, लतावेलींची जाळी आणि ऊनसावलीचा अव्याहत खेळ असाही जीवनाचा एक आविष्कार.वाºयानी रेखलेल्या रेषांची नक्षी मिरवणाºया उंचसखल वाळूच्या टेकड्या, तहानेची शुष्क आर्तता, चोहोबाजूस फिरणाºया नजरेला भोवळ आणणारा अमर्याद, हरवून टाकणारा अफाट वाळवंटाचा विस्तार असंही जीवनाचं एक रूप. अवखळ सिगल्सच्या चित्कारांना साद घालणाºया लपलपणाºया लाटा, घोंघावणाºया वाºयानं उंच उंच लाटांसोबत उफाळणारा दर्या, अनेकविध जीवसृष्टी बाळगणारा, अथांग रत्नाकर अशीही जीवनाला उपमा देता येईल. दुर्गम कडेकपारींनी नटलेला, बेलाग दुर्दम्य हिमाच्छादित गिरीशिखरं आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणाºया नद्या, एकीकडे मानवी पराक्रमाला साद घालणारा तर उत्तुंग उंचीवर असताना आपल्या क्षुद्र अस्तित्वाची जाणीव करून देणारा प्रचंड, अविचल हिमालय, हे मला आवडणारं, मनाला भिडणारं जीवनाचं एक रूपक.लहानपणी, शाळेत असताना मी उनाडक्या करीत असे; पण मी फारसा मैदानी खेळात रस घेणारा नव्हतो. रूईया कॉलेजात ‘हायकिंग’ करणारी मंडळी मोठ्या दिमाखात वावरताना दिसायची, म्हणून केवळ कुतूहलामुळे मी १९७१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात पौर्णिमेच्या रात्री माथेरान जवळील ‘पेब’ किल्ल्यावर म्हणजेच विकटगडावर माझ्या पहिल्या हाइकला गेलो आणि नकळत डोंगरवाटांचा वारकरी झालो. गिरीभ्रमणाची गोडी लागली. ‘बुटल्या’ नाईक मास्तर, राजू फडके असे तेव्हाचे मित्र आठवतात. दोन वर्षं रूईयात काढून मी ‘आयआयटी’त दाखल झालो. आदल्याच वर्षी तेथे ‘माउण्टनियरिंग’ क्लब सुरू झाला होता. एनसीसी आणि एनएसएसला मला उत्तम पर्याय मिळाला आणि मी मनोभावे ‘माउण्टनियरिंग’ क्लबचा सदस्य झालो. गरज म्हणून स्वीकारलेला पर्याय म्हणजेच ‘गिर्यारोहण’ हे माझं पहिलं प्रेमप्रकरण ! आणि ते आजही सुरू आहे. वीकेण्डला शनिवारी आयआयटी क्लबची तर रविवारी रूईया किंवा पोद्दार कॉलेजची हाईक असा नित्यक्रम झाला. कॉलेजच्या हाईकला ‘शायनिंग’ मारायला, विशेषत: मुलींसमोर विशेष मजा येत असे. रॉक क्लायम्बिंग, गिर्यारोहणातील बेसिक आणि अॅडव्हान्स कोर्सेस आणि हिमशिखरावरील एक मोहीम अशी ‘आयआयटी’तून बाहेर पडेपर्यंत बेगमी झाली. करिअरपेक्षा वर्षांत दोन हिमालयातील मोहिमा हा ध्यास होता. मी प्रेमात पडलो नव्हतो तर आकंठ बुडालो होतो!आजवर चाळीस/पन्नास वेळा हिमालयात वाºया केल्या आहेत. दरवेळेस एखादी मोहीम अथवा ट्रेक असे. ‘वर’ जाताना प्रवास संपवून चढाईला सुरुवात करण्याची घाई असे. मोहीम, ट्रेक संपल्यावर ‘घरी’ पोहचण्याची घाई. या प्रकारात छोटी देवालयं, टुमदार गावं, देखणी सरोवरं अशा अनेक छोट्या गोष्टी निसटून गेल्या. पाताळ भुवनेश्वर, त्रियुगी नारायण, नेलाँग अशी नावं आठवू लागली. अशा छोट्या गोष्टींसाठी मुद्दाम जाणं होत नाही. मनाच्या एका कोपºयात या साºया गोष्टी दडून बसल्या होत्या, क्वचित दातात अडकलेल्या कांद्याच्या पातीप्रमाणे त्रास देत असत. सहा - सात महिन्यांपूर्वी असाच बसलो होतो. अचानक एक दृष्टांत झाला की, ‘इथून पुढे आपण तरु ण होत नसून आता थकत जाणार’! ‘ओम गुगलाय नम:’ असं म्हणून मी गढवालचा नकाशा उघडला. राहून गेलेली ठिकाणं जोडता जोडता, एका नव्या कल्पनेनं जन्म घेतला - सिक्कीम ते लदाख असा १२,००० किलोमीटरचा ट्रान्स हिमालयन प्रवास वाहनाने एका सपाट्यात करायचा ! ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी होती!हळूहळू नकाशाचा अभ्यास करून आठ आठवडे असा कालावधी ठरला. हिमालयातील रस्ते आणि लांबचा पल्ला लक्षात घेऊन दणकट गाडी लागेल हे लक्षात आलं. मला गाडी चालवता येत नसल्यानं माझ्या जुन्या विश्वासू ड्रायव्हरला, अमित शेलार याला विचारलं आणि तो टुणकन एका पायावर तयार झाला. या पूर्ण प्रवासात ट्रेकिंग नाही; पण शक्य तिथे कॅम्पिंग करायचं असं ठरलं. प्रवास धमाल, हिमालयासारखा रमणीय आसमंत आणि कॅम्पिंग, सोबत आणखी कोणी असेल तर मजा येईल असं सुचलं. ट्विन केबिन, एसी आणि मागे कॅम्पिंगच्या सामानासाठी हौदा अशा विचाराने फोर व्हील ड्राईव्ह असलेली ‘इसुझू डी-मॅक्स’ अशी गाडी ठरली. सोबतीस येणाºया मंडळींकडे आठ आठवडे सवड निघण्याची शक्यता कमी, म्हणून आठ जोड्या असा निर्णय घेतला. कल्पना भारी असल्यानं, ‘आम्हाला का नाही विचारलं?’ म्हणून नंतर शिव्या खायची तयारी ठेवून हळूहळू ‘हिमयात्री’ ठरले. मृणाल परांजपे (माझी पत्नी), संजय रिसबूड, प्रेम मगदूम, अजित देसवंडीकर, निर्मल खरे, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, सुहिता थत्ते, राणी पाटील, आनंद भावे, प्रशांत जोशी, राजू फडके, जयराज साळगावकर, डॉ. अजित रानडे, मकरंद करकरे, सुबोध पुरोहित आणि डॉ. आनंद नाडकर्णी अशी मस्त यादी आणि त्यांचं वेळापत्रक ठरलं. मार्च अखेरीस गाडी आली आणि तिचं ‘गिरिजा’ असं नामकरण झालं. पानशेत जवळील कादवे खिंडीत ‘गिरिजा’सह तोरण्याच्या साक्षीने मोहिमेचं तोरण बांधलं ! पूर्वीच्या मोहिमांच्या अनुभवामुळे स्वप्नवत वाटावं अशा तºहेने नियोजन पार पडलं. कॅम्पिंगच्या सामानाच्या याद्या, सोबत न्यायच्या खासगी सामानाची जंत्री.. पुणे - मुंबई इथे बैठकी झडू लागल्या. एप्रिल महिन्यात हळूहळू ‘यात्रे’ची झिंग चढू लागली. बागडोगरा येथून प्रयाणाचा दिवस ठरला रविवार, ६ मे २०१८ !उत्तर ही म्हणे अध्यात्माची दिशा आहे ! धकाधकीच्या, चढाओढीच्या धावपळीपासून दूर उत्तरेला हिमालयाच्या कुशीत जाण्याची कल्पनाच तरल आहे. नकळत हलकं वाटतंय. अफाट, आल्हाददायक निसर्ग, तिथे राहणारी साधीसुधी माणसं, आमच्यासारखेच अनेक यात्रेकरू असं सारं काही भेटणार आहे. मी आणि आसमंत हे नातं नव्यानं उलगडता येणार आहे. एका अधीर उत्सुकते सोबत स्वस्थ, निवांत शांतता आहे. येता आठवडा आहे ‘सिक्कीम’, त्यानंतर भेटूच.- वसंत लिमये vasantlimaye@gmail.com