मृत्यूचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 06:39 AM2018-03-18T06:39:32+5:302018-03-18T06:39:32+5:30
‘इच्छामरण’ हे अत्यंत वैयक्तिक, तरीही सामाजिक महत्त्वाचं वास्तव. जन्मणाऱ्या प्रत्येक माणसासोबत खात्रीनं येणारा मृत्यू हे अटळ सत्य. हा विषय दुर्लक्षानं मारण्यापेक्षा विचारानं त्याला पुढ्यात घ्यायला हवं. ‘लोक काय म्हणतील?’ या भुताला खांद्यावर घेऊन हैराण आयुष्य जगण्यापेक्षा जगण्याची आणि मरणाचीही गुणवत्ता सांभाळायला हवी.
- विद्या बाळ
1९४७ सालची गोष्ट. १३ आॅक्टोबरच्या दुपारच्या पुरणपोळीच्या जेवणानंतर माझ्या आजोबांना अस्वस्थ वाटायला लागलं. काही तासांनी जरा बरं वाटल्यावर संध्याकाळ त्यांनी आपल्या अभ्यासिकेत घालवली. पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते बाहेर येऊन अंथरुणावर आडवे झाले. १४ ऑक्टोबरच्या पहाटे त्यांचं निधन झालं! अस्वस्थतेच्या मध्यंतरात त्यांनी एक कविता केली होती.
दिसों लागे मृत्यू, परि न भिववू तो मज शके
तयाच्या भेटीचे असत मजला ज्ञानची निके
प्रवेशे रानी जो घनीनीच शतरुनी निज करी
न भी तो वाघाला, परी हसुनी सुस्वागत करी.
मला जन्मा येता तनुभरण कार्या कणकण
दिले पाचाभूती परत करणे ते निजऋण
तदाधारे सौख्ये सतत जगलो ते मज पुरे
तनुत्यागा ऐसा इतर अनृणा मार्गाचि नुरे
आजोबांच्या मृत्यूनंतरचा चेहरा शांत आणि प्रसन्न होता. भोवती फुलांची सजावट केली होती. मला इतकंच आज आठवतं की, मला तेव्हा खूप रडू आलं होतं; पण त्यांचा मृतदेह बघताना मला भीती वाटली नव्हती!
आजोबांच्या त्या कवितेचा अर्थ कळण्याचं तेव्हा माझं वय नव्हतं. आज लक्षात येतं की, जन्मल्यापासून माणसाची मृत्यूपर्यंतची वाटचाल म्हणजे जगणं. जो जन्मतो तो मरतोच हे साधं, सोपं वास्तव आपण सगळे नाकारत राहतो. जन्म आनंदाचा आणि मृत्यू महाभयानक आणि नकोसा! आजोबा याच्या पल्याड होते. ते गेले तेव्हा त्यांचं वय ७५ होतं. पण त्याआधी त्यांच्या एकसष्टीच्या समारंभातही ते म्हणाले होते (असं मी ऐकलं होतं) की साठीच्या टप्प्यावर प्रत्येकानं आपलं मृत्युपत्र करायला हवं आणि नंतर दरवर्षी त्याचं गरजेनुसार नूतनीकरण करत राहावं! आयुष्याच्या नियोजनात, मृत्यूचंही एक गणित त्यांच्या मनात चालू असे.
पुढे बरीच वर्षे गेली. मी ‘स्त्री’ मासिकाची संपादक होते, तेव्हा सांगलीचे श्री. वि. रा. लिमये यांनी १९८५ मध्ये लिहिलेलं ‘सन्मानाने मरण्याचा हक्क’ या नावाचं पुस्तक माझ्याकडे अवलोकनार्थ म्हणून आलं. मला त्या पुस्तकातला विचार अतिशय पटला. जगणं जगण्याजोगं आणि अर्थपूर्ण असेल तोवर जगण्यात मजा आहे. हा अर्थ आणि हे सौंदर्य संपत चाललं की जगण्यात मजा नाही आणि त्यावेळी मरता आलं पाहिजे. त्यातच मरणाचा म्हणजेच गुणवत्तापूर्ण जगण्याचा सन्मान असेल. त्या पुस्तकातला हा विषय, हा विचार मला नव्यानेच भेटला, आवडलाही आणि म्हणून त्या पुस्तकात दिलेला, ‘सोसायटी फॉर द राइट टू डाय विथ डिग्निटी’ या संस्थेच्या सभासदत्वाचा मी फॉर्म भरला. मिनू मसानी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेची मी आजीव सभासद झाले. तेव्हा मी पन्नाशीही गाठली नव्हती. तरीही हा विचार मला अतिशय महत्त्वाचा आणि जीवनावश्यक वाटला. ते बरंच झालं!
श्री. वि. रा. लिमये सांगलीत राहत असत. ‘समाजस्वास्थ्य’ नियमित वाचणारा, अतिशय विचारपूर्वक जगणारा, पदवीधरही नसलेला, खूप वाचणारा असा हा एकलकोंडा माणूस. ‘मृगजळ’ या स्वत: बांधलेल्या बंगल्यात एकटाच राहत असे. त्यांच्या या पुस्तकामुळे झालेली त्यांची माझी ओळख त्यांच्या मृत्यूपर्यंत (२००७) बऱ्यापैकी वाढली. ‘इच्छामरण’ या विषयावरती त्यांच्याकडे बरीच पुस्तकं होती. इतरही होतीच. त्यांच्या वाचनात आलेली इच्छामरणावरची अनेक कात्रणं, त्यासोबत सविस्तर पत्र लिहून ते मला नेहमी पाठवत असत.
एकदा, ‘जेन्स वे’ हे डेरेक हँफ्रेचं एक पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं. युथनेशिया (इच्छामरण) यावर काम करणारी त्याची ‘हेमलॉक सोसायटी’ ही संस्था होती. हे पुस्तक म्हणजे स्वत: लेखक, त्याची पत्नी जेन आणि तिचा मृत्यू या तिघांना अतूट प्रेमानं बांधणारं एक घटित होतं. एकमेकांवर अतिशय प्रेम करणारं हे जोडपं. जेनला एका टप्प्यावर कॅन्सर गाठतो. त्याच्याशी हे दोघे मिळून निकराने लढतात. पण हार अटळ आहे हे दिसायला लागल्यावर, जेन आपल्या पतीला एक दिवस विचारते, ‘तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? तर मग लवकरच या कॅन्सरमुळे वेदनाग्रस्त झालेल्या मला जीवनाचा निरोप घ्यायला मदत कर.’
परस्परांवर निरतिशय प्रेम असलेल्या या जोडप्यातला हा संवाद विलक्षण आहे. अखेर प्रेमाच्या कसोटीवर उतरण्यासाठी मोठ्या दु:खाने, कष्टाने, निर्धाराने डेरेक आपल्या प्रियतम पत्नीला या जीवघेण्या यातनांतून मुक्त करतो! एकमेकांवर जीव टाकणाºया पतिपत्नींचा एक जगावेगळा जीवनप्रवास या पुस्तकातून पुढे येतो तो मुळातूनच वाचायला हवा. ‘मिळून साºयाजणी’ या माझ्या मासिकाची सुरुवात आॅगस्ट १९८९ मध्ये झाली. त्याच्या पहिल्या अंकात मीच या पुस्तकाची आणि आता म्हणायला हवं की ‘इच्छामरण’ या विषयाची ओळख वाचकांना करून देण्याचा प्रयत्न केला. तसंच वृत्तपत्रात इच्छामरणासंबंधी मी अधूनमधून थोडंफार लेखन केलं. श्री. लिमयांनी पाठवलेली कात्रणं आणि पुस्तकं वाचत राहिले. क्वचित व्याख्यानासाठी हा विषय लोकांना सुचवला आणि संयोजकांना तो आवडला, तेव्हा व्याख्यानाच्या स्वरूपात इच्छामरणाविषयी बोलत राहिले. ‘मिळून साºयाजणीं’च्या माध्यमातूनही, हा विषय फार नेटाने नाही तरी विषय जागता ठेवण्यासाठी लेखन चालू ठेवलं. त्यातल्या एका लेखात, ज्यो रोमन या लेखिकेच्या ‘एक्झिट हाउस’ या पुस्तकाची ओळख वाचकांना करून दिल्याचं आठवलं.
‘एक्झिट हाउस’च्या संकल्पनेचा श्री. लिमयांनी त्यांच्या एका पुस्तकात ‘महानिर्वाणगृह’ असा उल्लेख केला आहे. मला त्याला ‘निरोपघर’ म्हणावंसं वाटतं. ज्यो रोमन ही इच्छामरणाची पुरस्कर्ती होती. आपल्या कुटुंबात आयुर्मर्र्यादा कशी आहे, त्यानुसार आपण किती जगू शकू आणि किती जगायचं हे तिने विचारपूर्वक निश्चित केलं होतं. आपला हा निर्णय मुलं, पती, मित्रमंडळी यांच्या बरोबर बोलून, त्यांना समजावून, त्यांची संमती तिनं मिळवली होती. तिच्या मते इच्छामरण हा वैयक्तिक निर्णय असला तरी त्याच्याकडे एक सामाजिक महत्त्वाचं वास्तव म्हणून बघितलं पाहिजे. यासाठीच ‘एक्झिट हाउस’ या पुस्तकात इच्छामरण स्वीकारू इच्छिणाºयांना साहाय्य करू बघणारी एक संस्था म्हणून निरोपघराची तिने मांडणी केली आहे. त्याची वास्तुरचना आणि व्यवस्थापन याचा सारा तपशील त्यात नोंदवला आहे. ‘निरोपघर’ ही एक देखणी रमणीय वास्तू असेल. निसर्गाचा तिथे भरपूर सहवास असेल. आयुष्याचा निरोप घेऊ इच्छिणाºया व्यक्तीला कशाप्रकारे शेवटचे क्षण साजरे करावेसे वाटतील - उदा. संगीताच्या मैफलीत, नयनरम्य निसर्गासोबत, मित्रांच्या सहवासात, प्रियजनांच्या हातात हात घालून... इ. इ. याची तिथे उत्तम सोय असेल. सर्वप्रथम मरण मागणाºया व्यक्तीने संस्थेकडे एक अर्ज द्यावा. त्या अर्जावर एका तज्ज्ञ समितीत चर्चा होईल. या समितीत डॉक्टर, समुपदेशक, मानस शास्त्रज्ञ, समाजातील लोकांच्या विश्वासाला पात्र असलेल्या मान्यवर व्यक्ती आदींचा समावेश असेल. अर्ज केल्यानंतर काही महिन्यांच्या मुदतीनंतर, अर्जदाराला पुन्हा भेटायला बोलावून, अर्ज मागे घ्यायचा की त्यानुसार पुढे जायचं, याबाबत त्याच्याशी चर्चा केली जाईल. त्याचा विश्वास, निर्णय पक्का असेल तर पुढच्या प्रक्रि येत त्याला हवं तसं मृत्यूला भेटण्याची व्यवस्था केली जाईल. स्वत: गोळी अथवा इंजेक्शन घेऊन किंवा डॉक्टरांच्या मदतीनं!
ज्यो रोमनचा स्वत:चा निर्णय पक्का झाला असताना, तिने ठरवलेल्या तारखेपूर्वीच तिला कॅन्सरने गाठलं. त्यामुळे मरण्यापूर्वी पुस्तकलेखन पूर्ण करण्याच्या ती मागे लागली. पुस्तकलेखन पूर्ण झालं. पूर्वी ठरवलेली निरोपाच्या दिवसाची तारीख अलीकडे आली. दरम्यान, या संकल्पनेबाबत ज्यो सुमारे तीनशे परिचितांशी बोलून संपर्कात राहत होती. त्या साºयांना तिने पत्र पाठवून कळवलं. हे पत्र तुमच्या हाती पडेल तेव्हा मी या जगाचा निरोप घेतलेला असेल. ज्योने स्वत: संशोधन करून, डॉक्टर मंडळींशी चर्चा करून, ‘बार्बाच्युरेट’ या औषधाचा, निश्चित मृत्यू देणारा डोस आधीच मिळवून ठेवला होता. त्याच्या आधारे आपल्या कुटुंबीयांचा आणि जगाचा तिने निरोप घेतला.
इच्छामरणाच्या विषयाबरोबरच्या माझ्या वैचारिक प्रवासातला ‘एक्झिट हाउस’ हा एक विलोभनीय टप्पा आहे. मृत्यूबाबतचं भय नाही, यातना नाहीत, सुखसमाधानाने घेतलेला सगळ्यासगळ्यांचा हा निरोप.. माझ्या माहितीत असं ‘एक्झिट हाउस’ जगाच्या पाठीवर अजून तरी अस्तित्वात आलेलं नाही. पण त्याची मी आतुरतेने वाट बघते आहे.
श्री. वि.रा. लिमये २००७ मध्ये मरण पावले. त्यांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या संग्रहातली या विषयाशी निगडित सारी पुस्तकं त्यांनी माझ्याकडे पोचती केली आहेत. आमच्या ‘अक्षरस्पर्श’ ग्रंथालयात मी ती जमा करून ठेवली आहेत.
‘इच्छामरण’ या विषयासोबत कितीतरी वर्षं मी एकटीच चालत होते. श्री. लिमये होते तोवर थोडी सोबत होती. कधी कधी अधूनमधून समविचारी माणसं भेटलीही, पण या विषयावर काम करणारी संस्था, गट असं काही निर्माण झालं नव्हतं. रोटरी क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ किंवा कुणीकुणी संस्था यांच्या निमंत्रणावरून हा विषय मी व्याख्यानातून बोलत असे. त्यानंतर आवर्जून प्रश्नोत्तरांना वेळ ठेवत असे. यातून हळूहळू या विषयावर बोलायला, ऐकायला माणसं तयार होताहेत हे लक्षात यायला लागलं. ‘जरा वेगळा विषय आहे’, ‘बघू या तरी काय म्हणताहेत’ इतपतच कुतूहल किंवा प्रतिसाद असायचा. मात्र खरोखरीच मृत्यू हा विषय, त्यासंबंधी चर्चा, त्यासाठी गंभीरपणे भेटणं असा फारसा कुणाचा अनुभव नव्हता. उलट व्याख्यानानंतरच्या प्रश्नोत्तरांत अनेकदा व्यक्त होणारे विचार असे असत.. ‘ज्याने जन्म दिला तो मृत्यू देईल, त्याची चर्चा आपण का करायची?’ किंवा, ‘मरणाबिरणाबद्दल नका बुवा बोलू! चांगला सुखातला जीव कशाला दु:खात घालायचा!’, ‘सगळे हसत हसत किंवा रडत रडत जगताहेत, त्यांना कशाला मृत्यूवर बोलून घाबरवता?’, ‘असल्या अभद्र विषयावर बोलण्यात वेळ काय फुकट घालवता?
ज्याला खरंखरं मरायचं असतं ना, तो कसापण मरतो! विष पिऊन, उंचावरून किंवा आगगाडीसमोर उडी मारून!’..
हे सारं ऐकून मला हे समजत होतं की, यांना हा विषयच नको आहे. मृत्यू ही जन्मणाऱ्या प्रत्येक माणसाबाबत खात्रीशीरपणे घडणारी एकमेव घटना आहे, तिचा विषय टाळण्यापेक्षा त्याला विचारानं पुढ्यात घ्यायला हवं, त्याबाबतची अदृश्य; पण मनाच्या तळात रुतून बसलेली भीती घालवायला हवी. त्याबाबत चिडीचूप राहण्यापेक्षा बोलण्याची अधिक गरज आहे वगैरे वगैरे...
या पार्श्वभूमीवर, एकीकडे माझ्या वाचनात काही वेगळी पुस्तकंही येत होतीच. त्यानुसार मी माझी या विषयाची मांडणीही बदलत गेले. सुरुवातीला श्री. लिमयांनी मांडलेला आणि मला पटलेला विचार मी मांडत असे. त्यानुसार वार्धक्याच्या वाटेवरच्या प्रवासात, शरीराच्या एकेक क्षमता नाहीशा किंवा दुर्बल होत चालल्या आणि त्यामुळे आयुष्यात पूर्वीसारखा आनंद वाटेनासा झाला की स्वत:ला स्वत:च शहाण्यासारखं थांबवावं आणि आयुष्याचा निरोप घ्यावा, असा एक दृष्टिकोन मी मांडत असे. पण, असं लक्षात आलं की बहुसंख्यांना असं वाटतं.. ‘छे! असं उगीचच सुखासुखी आयुष्याचा निरोप घेणंबिणं कुणाला वाटत असेल यावर आमचा विश्वास नाही.’ मला मात्र हा विचार हाच मरणाचा सन्मान करणारा आहे असं आजही वाटतं. पण तो स्वीकारायला लोक तयार नसतील तर त्यांच्यासाठी, मृत्यूबद्दल त्यांना विचार करायला लावण्यासाठी दुसरी वाट शोधायला हवी असं मला वाटलं. त्या टप्प्यावर डॉ. अतुल गवांदे यांचं ‘बिइंग मॉर्टल’ हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यातला एक छोटासा भाग मला लोकांसाठी उपयुक्त वाटला. आपल्या घरात किंवा आपल्या परिवारात आजाराच्या आणि आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेल्या माणसांशी वागण्या-बोलण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. याबाबत त्यांनी महत्त्वाचा विचार मांडला आहे. त्यावेळी त्या पेशंटला जे काही बोलावंसं वाटत असेल, जे वातावरण हवंसं वाटत असेल ते उपलब्ध करून देण्याची त्याच्या नातेवाइकांची जबाबदारी असते. प्रसंगी (पेशंट बरा होण्यासाठीचे उपचार परिणामकारक ठरत नसतील तर) त्यासाठी पेशंटला शक्यतो हॉस्पिटलच्या वातावरणात न ठेवता घरी नेण्याचा पर्याय निवडावा इ. इ.. ही मांडणी लोकांना अधिक व्यवहार्य, वास्तवाला धरून वाटत असल्याचा मला अनुभव आला. याच वेळी अनेक ज्येष्ठ नागरिक संघात, मृत्यूऐवजी वार्धक्याला सामोरं जाण्यासाठी आपली मनोवृत्ती कशी ठेवता येईल यासंबंधीही मी मांडणी करत होते.
असे प्रयत्न चालू असतानाच, हळूहळू एकेक करत आम्ही काही समविचारी माणसं भेटत गेलो. याविषयीचा एकत्रितपणे विचार आणि प्रसार करण्याची आम्हाला निकड वाटू लागली. ही गेल्या ४-५ वर्षांतली गोष्ट आहे. या अनौपचारिक गटात डॉ. शिरीष प्रयाग, अॅड. असीम आणि अॅड. रमा सरोदे, शुभदा जोशी, डॉ. रोहिणी पटवर्धन आणि रवींद्र गोरे आहेत. सुरुवातीला डॉ. मंगला आठलेकरही बरोबर होत्या; पण अलीकडे काही कारणामुळे त्या सक्रिय नाहीत. मात्र ‘जगण्याची ही सक्ती आहे’ हे त्यांचं अभ्यासपूर्ण पुस्तक हा मला माझ्यासाठी नेहमीच एक संदर्भग्रंथ वाटतो. आम्ही सगळ्यांनी मिळून या विषयाबाबत लोकांना विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी पुण्यात आणि पुण्याबाहेर काही जाहीर कार्यक्र म केले. त्यातूनच ‘लिव्हिंग विल’ हा विषय पुढे आला. आपलं शरीर ही आपली सर्वात मूलभूत आणि मूल्यवान संपत्ती आहे. म्हणून आपल्या भौतिक संपत्तीप्रमाणेच एक वैद्यकीय इच्छापत्र (लिव्हिंग विल) करण्याबाबतचे विचार लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक सर्वसाधारण मसुदा करून त्याच्या प्रती लोकांसाठी उपलब्ध केल्या. एका टप्प्यावर नागपूर हायकोर्टात लिव्हिंग विलसंदर्भात एक याचिका दाखल केली होती. ती नाकारण्यात आली. एकूणच सारखं मरण, मृत्यू या शब्दांच्या आधाराने बोलत असताना ‘लिव्हिंग विल’ने जनमनात एक कुतूहल निर्माण झाल्याचं जाणवलं. या इच्छापत्रामुळे, आपण अचानक तब्येतीच्या असहाय्य, परावलंबी अवस्थेत गेलो किंवा भयानक आजारांमुळे उपचारांच्या भयानक चक्र ात सापडलो, तर त्यावेळी कोणते उपचार आपल्याला चालतील, कुठले नको वाटतील, याबाबत आपलं म्हणणं मांडण्याची ही एक संधी आहे. याची उपयुक्तता आम्ही मांडत राहिलो त्यामुळे मृत्यूबाबतच्या चर्चांना एक वेगळी दिशा मिळाली. मात्र हे इच्छापत्र कायदेशीर नाही, ते व्हावं यासाठी आमचे प्रयत्न चालू होते. याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचा तो ऐतिहासिक महत्त्वाचा निकाल जाहीर झाला!
केईएम रुग्णालयात ४०-४२ वर्षं खितपत पडलेल्या अरुणा शानबाग या नर्सच्या संदर्भातील पिंकी विराणी यांच्या याचिकेच्या निमित्ताने दिलेल्या निर्णयामुळे इच्छामरण/दयामरण या विषयाकडे न्यायालयाने पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने बघितलं होतं. तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने सन्मानाने जगण्याइतकाच सन्मानाने मरण्याचा माणसाचा हक्क मान्य केला आहे. न्यायालयाची ही संवेदनशीलता अतिशय मोलाची आहे.
मृत्यू हा सर्वसामान्यपणे कुणालाही उच्चारण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी नकोसा वाटणारा विषय आहे. मृत्यू येईल तेव्हा येईल, आपण त्याच्या वाटेला जायचं कारण नाही, असं बहुतेकांना वाटतं. मात्र आजच्या विज्ञान युगात ही वृत्ती बरी नाही. भारतात वृद्धांची संख्या लक्षणीय स्वरूपात वाढली आहे. आपली आयुर्मर्यादाही वाढली आहे. विज्ञानातल्या प्रगतीमुळे औषधोपचारांमध्ये नवनवीन साधनं, औषधं येताहेत. अशावेळी गुणवत्तापूर्ण जगण्याचा विचार आवश्यक आणि हितावह ठरणारा आहे. पैसे आहेत म्हणून उपचार घेत जगण्याचा निर्णय घेताना, त्या जगण्यात आनंद, स्वावलंबन, गुणवत्ता राखता येणार आहे का, हा विचार स्वत:
रु ग्णाने आणि त्याच्या परिवारानेही करण्याची गरज आहे. बाजारात अनेक प्रकारची प्रलोभनं असतात म्हणून ती सगळी विकत घ्यावी का, या प्रश्नासारखा हाही प्रश्न विचारात घ्यायला हवा की नवनवीन उपचार उपलब्ध आहेत आणि पैसाही आहे म्हणून तो खर्च करायचा का? पैसे असून या विचारापायी उपचार नाकारणाºयांना तर लोक म्हणूच शकतात की, ‘बघा काय ही कंजुसी! पैसे आहेत तरी उपचार नको म्हणताहेत!’
‘लोक काय म्हणतील?’ या भुताला खांद्यावर घेऊन हैराण होत आयुष्य जगण्याचा विचार विवेकाने बाजूला करायला हवा. आजारपणातल्या उपचारांच्या संदर्भात तर बहुसंख्यांच्या मनात, आपल्या विचारापेक्षा, लोक काय म्हणतील, याचा अपराधीपणा ठाण मांडून असतो! जगण्याची गुणवत्ता सांभाळली जावी यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याची अर्थपूर्णता आणि प्रतिष्ठा आपणच समजू शकलो नाही तर त्याच्यासारखे करंटे आपणच ठरू शकतो. न्यायालयाच्या या निर्णयाने पेशंटवर उपचार करणाºया डॉक्टरांनाही मोठं अभय दिलं आहे. आजाराच्या वेदनाग्रस्त आणि उपचारांच्या पल्याड अवस्थेतल्या पेशंटला या सगळ्यातून वाचवत, कृत्रिमपणे जगवायचं, की मुक्त करायचं याबाबतचं सत्य आता डॉक्टर निर्धास्तपणे सांगू शकतील आणि त्यानुसार निर्णय घेऊ शकतील. कारण कायद्याने त्यांना अभय दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने, याच्या अंमलबजावणीत गफलत अथवा गैरसमज होऊ नये यासाठीची खबरदारीही घेतली आहे. आता या विषयावर काम करणाºया आमच्या सारख्यांची जबाबदारी वाढली आहे. ‘इच्छामरण’ या विषयाच्या संदर्भात जनजागरण करणं, लोकांचं शंकानिरसन करत या कामाची गती/व्याप आम्ही आता वाढवायला हवा.
मृत्यू नावाच्या माणसाच्या जगण्यासंदर्भातील अटळ सत्यासोबत प्रवास करताना, एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे स्वार्थी स्वामित्व, की प्रेम म्हणजे प्रेमातल्या माणसाच्या सन्मानाचं भानं? मरणाचा सन्मान सांभाळू बघणाºया त्या व्यक्तीवर जर खरं प्रेम असेल तर त्याच्या मरणाचा मार्ग खुला करण्याखेरीज कसलाच पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाने मरणाच्या आणि प्रेमाच्या सन्मानाचा हा मार्ग खुला केला आहे त्याचं स्वागत!
(गेल्या अनेक वर्षांपासून ‘इच्छामरण’ या विषयाची सजग मांडणी करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या संपादक आहेत.)
saryajani@gmail.com