एखादी आई इतकी भयंकर कसे काय वागू शकते? यामागची कारणं मन हेलावून टाकणारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:37 AM2022-06-12T07:37:06+5:302022-06-12T07:55:21+5:30

आई हा ममतेचा हिमालय असे वर्णन केले जाते. मात्र, काही जणी आपल्याच मुलांना ठार मारण्याइतपत क्रूर होतात, की ते पाहून धक्का बसतो.

How could a mother do such a horrible thing The reason behind this is heartbreaking | एखादी आई इतकी भयंकर कसे काय वागू शकते? यामागची कारणं मन हेलावून टाकणारी...

एखादी आई इतकी भयंकर कसे काय वागू शकते? यामागची कारणं मन हेलावून टाकणारी...

Next

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक, मुंबई

आई हा ममतेचा हिमालय असे वर्णन केले जाते. मात्र, काही जणी आपल्याच मुलांना ठार मारण्याइतपत क्रूर होतात, की ते पाहून धक्का बसतो.

आई म्हणजे ममतेचा हिमालय असे वर्णन केले जाते. त्यातील काही जणी आपल्याच मुलांशी इतक्या क्रूरपणे वागतात की ते पाहून धक्का बसतो. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एका ३० वर्षीय महिलेने पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले व स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्व मुलांचा जीव गेला. आईचा जीव वाचला. अमेरिकेमध्ये अँड्रीया येट्स या महिलेने आपल्या सहा महिने ते सात वर्षे वयोगटातील पाच मुलांना बाथटबमध्ये बुडवून ठार मारले.

एकीचा नवरा दारुडा, दुसरीचा सद्वर्तनी
दोन वेगवेगळ्या देशांतील घटना. महाडच्या घटनेतील महिलेचा नवरा सारखा दारु पिऊन यायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. अमेरिकेतील अँड्रीय ही नर्स होती. नवरा सद्वर्तनी होता. मात्र आपण मुलांचे उत्तम संगोपन करू शकत नाही असे तिच्या मनात होते. 

दोनपेक्षा अधिक मुले ही समस्या
एखादी आई इतकी भयंकर कसे काय वागू शकते या प्रश्नाबाबत अमेरिकेत एक पाहणी करण्यात आली. त्या देशात दर एक लाखांमागे आठ मुलांची हत्या होते. त्यातही आईने मुलांची हत्या करण्याच्या घटनांत सावत्र आईपेक्षा सख्ख्या आईकडून अशी कृत्ये अधिक घडतात असे आढळून आले. जग आधुनिकतेकडे चालले असले तरी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी लागणारा पैसा कित्येकदा अपुरा पडतो. नवरा-बायको दोघेही कमवत असले तरी गरजा वाढलेल्या असतात. काही वेळेस दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घातली जातात. त्यांच्या खर्चाचा प्रचंड ताण त्या कुटुंबावर येतो. त्यातच जर नवरा दारुडा असेल, मारहाण करत असेल तर त्याच्या पत्नीने ते सोसायचे तरी किती? कधी कधी एखाद्या महिलेचे विवाहबाह्य संबंध असतात. त्यातूनही असे गुन्हे घडतात.

आपल्यामागे मुलांचे हाल नकोत हा विचार
एखादी बाई अगदी श्रीमंत घरातील असेल पण तिचा नवरा तिचा छळत असेल, दुसऱ्या प्रेमप्रकरणात अडकून संसाराचा बट्याबोळ करायला निघाला असेल, सासरची मंडळी खूप त्रास देत असतील तर अशा स्थितीतही एखादी आई क्रूर वागू शकते. गरिबी, श्रीमंती हे विषय अशावेळी दुय्यम ठरतात. मानसशास्त्रज्ञांचे मत असे आहे की, आपण जे हाल भोगतोय ते आपण मेल्यानंतर मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून एखादी महिला आधी आपल्या पोटच्या पोरांना ठार मारते व मग स्वत: आत्महत्या करते.

पुरुषांचे वाईट वर्तन
सावत्र आई आपल्या मुलांचा छळ करते असे ढोबळमानाने मानले जाते. या गोष्टीला अनेक जणी अपवाद आहेत. मात्र सावत्र आईने आपल्या मुलांना संपविले अशी उदाहरणे कमी आढळतात हेही तितकेच खरे. नवरा जर दारुडा, व्यसनी, बेजबाबदार, बाहेरख्याली असेल व दोनापेक्षा जास्त मुले जन्माला घातली असतील तर त्या संसाराचा बट्ट्याबोळ ठरलेला असतो. अनेक श्रीमंत घरातले नवरेही नादान असतात. पुरुषाच्या अशा बदवर्तनातून निर्माण झालेल्या वाईट स्थितीचा कडेलोट झाला की, त्याची पत्नी भयंकर हिंसक कृत्य करू शकते असे सिद्ध झाले आहे.

मानसिक आरोग्य जपायला हवे
आपल्या मुलांना ठार मारणारी आई ही कायद्याच्या दृष्टीने खूनीच असते. पण समाजामध्ये असे प्रकार घडू नयेत म्हणून नवरा, बायको यांचे समुपदेशन करणे, आईच्या शारिरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय योजना राबविणे अशा उपाययोजना करता येतील. अशा काही योजना युरोप, अमेरिकेमध्ये आहेत. कोणताही माणूस गुन्हा करण्यास एकदम प्रवृत्त होत नाही. त्याच्या भोवतालची परिस्थिती साचून त्यातून मग हे कृत्य घडते. आई क्रूर का होते याचा विचार करताना तिच्या भवतालची परिस्थिती अधिक सुसह्य झाली तर अशा प्रकारचे गुन्हे कमी होतील. महाड व अमेरिकेतील घटनांचा हाच धडा आहे.
 

Web Title: How could a mother do such a horrible thing The reason behind this is heartbreaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.