पक्षी किती राहिले? किती उडाले?
By Admin | Published: December 6, 2015 12:07 PM2015-12-06T12:07:25+5:302015-12-06T12:07:25+5:30
देशात एकूण पक्षी किती? त्यातल्या कुठल्या जाती धोक्यात आहेत? कुठल्या वाढताहेत, याचा नेमका आणि वस्तुनिष्ठ तपशील हाती येणार नसेल, तर पक्षिगणना झाली यातच किती समाधान मानणार?
>गजानन दिवाण
आपल्या देशाची जनगणना होते, अलीकडेच झाली. तशी नुकतीच पक्षिगणनाही झाली. देशात कुठले पक्षी किती आहेत याची मोजदाद झाली. भारताची लोकसंख्या सध्या जवळपास एक अब्ज 30कोटींच्या घरात आहे. यात महाराष्ट्राचा वाटा 11.24 कोटी इतका! म्हणजे लोकसंख्या आणि भूभाग याच्या प्रमाणात पक्षी निरीक्षकांचा काही विचार व्हायला हवा!
पण या अलीकडेच झालेल्या पक्षिगणनेत देशभरातील केवळ 280 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला. यात एकटय़ा महाराष्ट्रातून सर्वाधिक 123 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला.
त्यामुळे या पक्षिगणनेसंदर्भात काही प्रश्नही निर्माण होतात.
एकूण लोकसंख्या, आपले क्षेत्र आणि सहभागी पक्षी निरीक्षक, त्यांनी घेतलेल्या 15 हजार 638 पक्ष्यांच्या नोंदी यांचे प्रमाण ते किती? एवढी अल्पशी माहिती देशाच्या संदर्भात परिपूर्ण कशी समजायची? केवळ मोठय़ा शहरांचा विचार केला तरी प्रत्येक शहरात आजच्या घडीला कितीतरी पक्षी निरीक्षक आढळतील. मात्र त्या सर्वानीच पक्षिगणनेत सहभाग का घेतला नाही? त्यांच्यार्पयत गणनेची माहिती पोहोचली नाही, की त्यांना या गणनेविषयी सहिष्णुता नाही? किमान 15 मिनिटे आणि जास्तीत जास्त एक तास थांबून घेतलेल्या या नोंदी ज्या ठिकाणाहून घेतल्या गेल्या तिथली तरी आकडेवारी खरी कशी समजायची? ज्या वेळेत ही गणना झाली त्याआधी किंवा त्यानंतर त्या-त्या ठिकाणी आलेल्या पक्ष्यांचे काय? असे अनेक प्रश्न या गणनेनंतर कायम आहेत.
अर्थात पक्षिगणनेची हीच पद्धत प्रमाण असल्याचे कोणी सांगेल. ते खरेही आहे. मात्र कधीतरी अशी गणना करायची आणि त्याचे आकडे सांगायचे यातून नेमकी माहिती हातीच येईलच असे मात्र नाही. त्यातही गणना करणा:या प्रत्येकाची गणना वेगळी. बरे त्यांनाही स्वत:च्याच मागच्या आकडेवारीशी देणोघेणो नाही. ‘बीती बात पुरानी’ अशी ही पद्धत. अशी आपल्यासारखी पद्धत कुठलेच प्रगत राष्ट्र अवलंबत नाही. कारण यातून दरवर्षी केवळ आकडेवारी मिळते. त्यामुळे ती गणना करणा:यांचे आणि काही निवडक लोकांचे समाधान होतेही; पण ठोस असे काहीच हाती लागत नाही.
लाँग लाइफ मॉनिटरिंग सिस्टिम नावाची एक पक्षिगणना पद्धत विदेशात आहे. तशी गणना आपल्याकडे होत नाही. बीएनएचएसनेच तब्बल 15 वर्षानंतर ही गणना केली. मोठय़ा ब्रेकनंतर सुरुवात झाली याचा आनंद आहेच; मात्र 15 वर्षाआधी केलेल्या गणनेचे निष्कर्ष, त्याची आत्ताच्या गणनेशी तुलना बीएनएचएसने जाहीर केलेली नाही. मुळात आपल्याकडे जेवढय़ा संघटना तेवढय़ा गणना. त्यांच्यातही ताळमेळ नाही. सर्वानी एकत्र येऊन असे कुठले डेटा कलेक्शन केलेले दिसत नाही. त्यामुळे जगासमोर किंवा आपल्याच देशासमोर ठोस अशी कुठली आकडेवारी आम्ही देऊ शकत नाही.
उदाहरण चिमणी या पक्ष्याचेच पाहा. त्या कमी झाल्या. मोबाइल टॉवरचा मोठा परिणाम त्यांच्या संख्येवर झाला असे सांगणारा पक्षितज्ज्ञांचा एक मोठा गट आपल्या राज्यात आहे. पण संख्या कमी झाली, हे सांगताना तुम्ही एका तरी गावाची आकडेवारी द्याल की नाही? ती ते देत नाहीत. दुसरीकडे चिमण्या कमी झाल्या हे सांगणारा गट ज्या मोठय़ा निसर्ग संस्थेत काम करतो त्याच संस्थेतील काही तज्ज्ञांचे म्हणणो नेमके उलट आहे. ते म्हणतात, चिमण्या आहे तेवढय़ाच आहेत. त्यांनी केवळ राहण्याचे ठिकाण बदलले आहे, आता बोला! इंग्लंडसारखे देश लाँग लाइफ मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे ठोस निष्कर्ष घेऊन समोर येताना दिसतात. आम्ही मात्र अशी एखादी गणना करून समाधान शोधत असतो. ज्यातून ठोस आणि नेमकी आकडेवारी समोर येत नाही.
पक्षितज्ज्ञ आणि निसर्गसंवर्धन संघटनांमध्ये असा ताळमेळ नाही. त्यात सर्वसामान्य माणसं, त्यांना या विषयात फार रस नाही. त्यांना फक्त भौतिक विकास हवा आहे. त्यासाठी कुठलीही किंमत मोजायला ते तयार आहेत.
काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने भारतातील धोक्यात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या 18क् झाल्याची नोंद केली. गेल्यावर्षी ही संख्या 173 होती. धोक्यात असलेल्या प्रजातींची संख्या वाढण्यामागे विकासाच्या नावाखाली पक्ष्यांच्या अधिवासावर चालविला जाणारा नांगर हेच महत्त्वाचे कारण या अहवालातून स्पष्ट झाले आहे. डोंगराळ जमीन असो वा जंगल, पैशांच्या मागे लागलेल्या माणसांची हाव काहीच शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे पक्ष्यांना राहायच्या जागाच उरलेल्या नाहीत. मग पक्षी राहणार कुठे? खाणार काय?
पण त्याची चिंता कुणी करत नाही.
माणसांच्या जगात सध्या आपल्याकडे फार सहिष्णू-असहिष्णुतेचे वाद पेटलेत.
पण निसर्गाप्रती असलेल्या या असहिष्णुतेबद्दल आणि पाखरांच्या जिवावर बेतणा:या वर्तनाबद्दल, त्यातल्या बेदरकार असहिष्णुतेबद्दल कुणी बोलत नाहीत.
पाखरं मोजली गेली म्हणायची, पण त्यांचं जगणं माणसांमुळे धोक्यात येऊ नये म्हणून कुणीच फारसं काही करत नाहीत.
4 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि ‘बर्ड काउंट इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षितज्ज्ञ डॉ. सालीम अली यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात 15 नोव्हेंबर रोजी पक्षिगणना झाली.
4 किमान 15 मिनिटे आणि जास्तीत जास्त एक तास थांबून नजरेच्या टप्प्यात दिसतील त्या पक्ष्यांची निरीक्षणो नोंदविण्यात आली.
4 22 राज्यांतील 28क् पक्षी निरीक्षकांनी गणनेत सहभाग नोंदविला.
4 गणनेच्या 549 याद्या संस्थेकडे सादर झाल्या.
4 त्यातील 383 याद्या उल्लेखनीय स्वरूपाच्या आहेत.
4 या गणनेनुसार देशात पक्ष्यांच्या 514 प्रजाती आढळल्या.
4 या प्रजातींच्या 15 हजार 638 पक्ष्यांच्या नोंदी या गणनेत झाल्या.
संकटातही ‘जगलेले’ काही पक्षी
अतिसंकटग्रस्त यादीत असलेले पांढ:या पाठीचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर) या पक्षी निरीक्षणात आढळले. शिवाय संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत असलेला काळ्या पोटाचा सुरय (ब्लॅक बेल्डी टर्न), पांढरे गिधाड (इजिप्शियन व्हल्चर), मोठा जलरंक (ग्रेट नोट) आणि नेपाळी गरुड (स्टेपी ईगल) या पक्ष्यांच्याही नोंदी झाल्या. आढळलेल्या 514 पैकी 3क् प्रजाती संकटग्रस्त यादीतील आहेत.
ही नक्कीच आनंदाची बाब आहे; पण यातच समाधान मानण्यात काही हशिल नाही.
संपूर्ण देश समजून घेतला तर येणारे चित्र यापेक्षा आणखी चांगले असू शकते किंवा ते यापेक्षाही वाईट असू शकते.
तंत्रज्ञानाच्या या युगात अशा शक्यतांना फारसे महत्त्व नाही. त्यासाठी योग्य गणना, योग्य पद्धत, पुरेशी आकडेवारी आणि ठोस कार्यवाही गरजेची आहे!
(लेखक ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीत
उपवृत्त संपादक आहेत)
gajanan.diwan@lokmat.com