विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, मुंबई
नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत पोलंडची इगा स्वियातेक विजेती ठरली. तिच्याविषयी...
गेल्या रविवारी राफेल नडालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकत लाल मातीचा बादशहा हे बिरुद सार्थ ठरवले. मात्र, त्याच्या आदल्याच दिवशी पोलंडच्या इगा स्वियातेकने महिलांच्या एकेरी स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफला हरवत सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनची लाल माती ललाटी लावली.पोलंडच्या वॉर्सा या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अशा या शहरात जन्मलेली आणि वाढलेली इगा तशी पक्की व्यावहारिक. वडिलांकडूनच तिला हे बाळकडू मिळाले आहे.
इगाकडे नेहमीच ‘प्लॅन बी’ तयार असतो. पोलंडचा टेनिसमधील इतिहास पाहता या खेळात आपण कितपत तग धरू आणि कुठपर्यंत मजल मारू, याचा काही अंदाज नसल्याने मी कायमच ‘प्लॅन बी’ तयार ठेवते, असा इगाचा त्यावर खुलासा. ज्युनिअर लेव्हलपासूनच इगा टेनिसमध्ये चमक दाखवू लागली. परंतु तरीही तिने आपले शालेय शिक्षण सुरूच ठेवले. टेनिस आणि शालेय शिक्षण या दोन्ही गोष्टी मी पार पाडत होते. कारण टेनिस मला कितपत साथ देईल, याची शाश्वती नसल्याने मी शिक्षणाला उजवे माप दिल्याचे इगा सांगते.
आताही फ्रेंच ओपन टेनिसचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळाले म्हणून इगा हुरळलेली नाही. विजेतेपद मिळाल्यानंतर मी आता काही दिवस तरी टेनिस कोर्टापासून दूर राहणार असल्याचे ती आवर्जून सांगते. इगा आता पुढील वर्षी सलग तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्याच्या मानसिकतेत आहे. ऑस्ट्रेलियन टेनिस स्टार ॲश्ले बार्टी इगाची ‘रोल मॉडेल’ आहे. मात्र, ॲश्लेने टेनिसमधून अचानक निवृत्ती घेतल्याने तिच्याविरुद्ध दोन हात करता येणार नाही, ही इगाची खंत आहे.