किम जाँग उन...तिरसट हुकूमशहाची तिरपागडी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 06:37 PM2018-01-06T18:37:14+5:302018-01-07T07:32:28+5:30
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अमेरिकेला धमकी देताना हा माणूस म्हणाला, ‘माझा हात अणुबॉम्बच्या बटणावर आहे..’ या माणसाचं आयुष्य हे एक गूढ रहस्य आहे. तो कधी काय करील याचा दुनियेत कुणालाही भरवसा नाही...
- निळू दामले
नवं वर्ष शुभ असावं, असं माणसं म्हणतात. ते अशुभ असावं असं म्हणणारा जगातला एकमेव माणूस म्हणजे किम जाँग उन. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा अध्यक्ष.
‘माझा हात अणुबॉम्बच्या बटणावर आहे. पूर्ण अमेरिका आता आमच्या मारक्षेत्रात आली आहे’, या शब्दात जाँग उन यांनी अमेरिकेचं आणि जगाचं २०१८च्या नववर्षात स्वागत केलं.
दोन वर्षांपूर्वी २०१६ साली जाँग उन कॅमेºयासमोर बसले होते. हातात पेन आणि टेबलावर कागद. एक फतवा त्यांनी कागदावर लिहिला आणि कॅमेºयासमोर वाचून दाखवला. फतव्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘आपल्या देशानं तयार केलेल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या उत्तम आवाजानं नव्या वर्षाचं स्वागत करूया. आता सारं जग आपल्याकडं लक्ष देणार आहे.’
-पेनानं कागदावर लिहिण्याची त्यांना फार आवड!
सारं जग हादरलेलं आहे. न जाणो खरोखरच यानं अमेरिकेशी वैर पत्करून अमेरिका आणि जपानवर अणुबॉम्ब टाकला तर? या माणसाकडं अणुबॉम्ब आहे, तो बॉम्ब दूरवर टाकणारे अग्निबाणही तयार आहेत. या माणसाचं आयुष्य एक रहस्य आहे.
जाँग उनच्या आजोबापासून कोरियात हुकूमशाही आहे. तिथं बाहेरच्या पत्रकारांना किंवा कोणालाच प्रवेश नाही. सरकार जे काही जाहीर करेल तेवढीच माहिती जगाला मिळते. जाँग उनचा आजोबा किम इल सुंग आणि वडील किम जाँग इल यांच्याबद्दलही काहीच माहिती जगाला नाही.
आजोबाचं जन्मवर्ष १९१२ होतं. त्यामुळं या घराण्याला दोन हा आकडा भाग्यशाली वाटला. जाँग उनच्या वडिलांनी त्यांचं जन्मवर्ष १९४१ वरून १९४२ केलं. तीच गोष्ट जाँग उनची. त्याचं जन्मसाल नेमकं माहीत नाही, १९८३ की १९८४ यावर गोंधळ होता. जाँग उननं ते १९८२ केलं.
जाँग उन सहा-सात वर्षांचा होता तेव्हा एका जपानी बातमीदाराला तो लष्करी गणवेशात दिसला. बातमीदारानं त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला; पण परवानगी मिळाली नाही. येवढंच कळलं की त्याला लष्करी गणवेशाची आवड आहे.
नंतर एकदम १९९८ साल उजाडलं. वडिलांनी त्याला स्वित्झर्लण्डच्या शाळेत शिकायला पाठवलं. तेही गुप्तपणे. एका कोरियन मुत्सद्याचा मुलगा आहे असं सांगून बनावट पासपोर्ट तयार केला. नंतर अचानक न कळलेल्या कारणासाठी २००० साली त्याला कोरियात परत बोलावण्यात आलं. त्यानंतर त्याच्याबद्दल माहिती मिळते ती २०११ सालातली. त्या वेळी त्याचे वडील म्हणजे किम जाँग इल आजारी होते आणि त्यांनी जाँग उनला आपला उत्तराधिकारी नेमलं. जाँग उनच्या वडिलांना चार-पाच बायका. म्हणजे नेमक्या किती तेही माहीत नाही. त्या अधिकृतही नाहीत. पैकी एका पत्नीपासूनचा जाँग उन हा मुलगा. जाँग उनचा सर्वात मोठा भाऊ खरं म्हणजे उत्तराधिकारी व्हायचा. पण एके दिवशी तो बनावट पासपोर्ट घेऊन जुगार खेळायला मकाऊला जाताना पकडला गेला. वडील संतापले. जुगार खेळण्यासाठी परदेशी जायचं ही एक साधी गोष्टही त्याला करता येत नाही असं वाटल्यावरून त्याच्या वडिलांनी त्याला एकदम देशातूनच हद्दपार करून टाकलं. चीननं मग त्याला सांभाळलं. दुसरा भाऊ म्हणे बायल्या होत्या. त्यामुळं उरला तो जाँग उन. तापट. वडिलांना वाटलं की तापट वारसच बरा.
सत्ताधारी पक्ष ही किम घराण्याची मिरासदारी असल्यानं वारस कोण असायला हवा ते घराणं प्रमुखच ठरवत असतो. तिथं लोकांनी चालवलेला पक्ष नाही, लोकांनी निवडलेली लोकसभा नाही. लष्करी कामाचा अनुभव नसलेल्या जाँग उनला एकदम चार तारा जनरल करण्यात आलं. सत्ता हातात आल्यावर देशात, लष्करात, सरकारात धाक निर्माण करणं आणि संभाव्य शत्रू नष्ट करणं हे कोणाही झोटिंगशहाचं वैशिष्ट्य असतं, किम घराणं त्याला अपवाद नाही. जाँग उनचे आजोबा एके काळी चीन आणि रशियाच्या मदतीनं सत्तेवर आले होते. चीन आणि रशिया या दोघांनाही द. कोरिया आपल्या ताटाखालचं मांजर असावं असं वाटत होतं. आजोबानं सत्ता हाती घेतल्यावर काही दिवसात नव्हे काही तासातच शेकडो चिनी आणि रशियन मुत्सद्दी मारून टाकले. सुरुवातीला आजोबा कम्युनिस्ट होते. सत्ता हाती आल्यावर त्यांनी जाहीर करून टाकलं की त्यांचा देश कम्युनिस्ट असणार नाही, तो एक स्वतंत्र कोरिया असेल, कामगारांचा देश असेल, किम यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा देश असेल.
तीच परंपरा जाँग उनच्या वडिलांनी पाळली, जाँग उनही पाळत आहे. उन सत्तेवर आले आणि तेव्हाचा प्रमुख सेनानी अचानक नाहीसा झाला. म्हणजे काय झालं ते आजवर कोणालाही कळलेलं नाही. जाँग उन लष्करप्रमुख झाला. त्यानंतर आजवर किमान सहा तरी वरिष्ठ लष्करी अधिकारी नाहीसे झाले आहेत. सत्तेवर आल्या आल्या लष्कर प्रमुखाबरोबरच १४० सेनानी आणि मुलकी अधिकारी नाहीसे झाले. त्यांचाही आजवर पत्ता नाही. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बार असोसिएशननं द. कोरियातल्या तुरुंगांच्या आणि छावण्यांचा अभ्यास केला. तुरुंग आणि छावण्या छळछावण्या, क्रूर अत्याचाराचे अड्डे आहेत असं असोसिएशननं आपल्या अहवालात म्हटलंय. नाहीसे झालेले लोक तुरुंगात किंवा छळछावण्यात पोहचत असावेत.
जाँग उन सत्तेत पोहचले तेव्हा त्यांच्या वडिलांच्या सोबत असलेले त्यांचे मामा, जँग साँग थेक, दोन नंबरवर होते. आपले नातेवाईक साधारणपणे आपल्याशी एकनिष्ठ राहातात अशी समजूत. मामांची इच्छा असावी की भाचाच्या ऐवजी आपल्या हाती सत्ता यावी. हे जाँग उन यांच्या लक्षात आलं.
एके दिवशी मामा नाहीसे झाले. स्थानिक वर्तमानपत्रात सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं की मामा देशद्रोही असल्यानं त्यांचा निकाल लावण्यात आला आहे. त्यांचा देशद्रोह कोणता आणि निकाल लावला म्हणजे काय झालं हे अधिकृतपणे कळलेलं नाही.
माध्यमांत, चीन आणि हाँगकाँग, दोन बातम्या आल्या. एका बातमीनुसार ओळीनं उभ्या असलेल्या सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून मारलं. दुसरीनुसार ‘जँग साँग यांना त्यांच्या पाच सहकाºयांसह एका पिंजºयात ढकलण्यात आलं. तीन दिवसांपासून उपाशी ठेवलेले १२० मन्चुरियन कुत्रे पिंजºयात सोडण्यात आले. कुत्र्यांनी सर्वांना फाडून खाल्लं. एक तासभर हा प्रकार चालला होता आणि किम उन यांनी तो पाहिला. परवाची म्हणजे २०१७च्या फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट. किम नाम हा किम उनचा सावत्र भाऊ क्वालालंपूरला गेला होता. तिथं दोन स्त्रियांनी त्याच्यावर विषारी रसायनाचा फवारा मारला. किम नाम मेला. या स्त्रिया कोण होत्या, त्यांना कोणी नेमलं होतं याचा पत्ता लागलेला नाही. नामचे वडील ली हॉन यॉन १९८२साली आपल्याला मारलं जाईल या भयानं द. कोरियात निर्वासित झाले होते. तिथं जाऊन त्यांनी किम इल कसा दडपशहा आहे यावर पुस्तक लिहिलं. १९९६ साली त्याचा खून झाला.
उत्तर कोरियामध्ये एक स्वतंत्र जातव्यवस्था किम घराण्यानं चालवलीय. किम घराण्याशी निष्ठा या कसोटीवर समाजात तीन जाती करण्यात आल्या आहेत. एक जात निष्ठांची. म्हणजे किम घराण्यातून जे सांगितलं जाईल ते ऐकून निमूट वागणाºयांची. या जातीतल्या लोकांनाच सरकार, लष्कर यात नोकरी आणि बढती मिळते. राजधानीत याच माणसांची वस्ती असते.
दुसरी जात कुंपणावरच्या लोकांची, त्यांच्या निष्ठेची खात्री देता येत नाही. या माणसांना एका अंतरावर ठेवलं जातं, त्यांच्यावर लक्ष असतं, जेवढी निष्ठा दाखवतील तेवढे फायदे त्यांना दिले जातात. तिसरी जात शत्रूंची, विरोधी लोकांची. ज्यांनी ज्यांनी कधी किम यांच्या विरोधात ब्र काढला आहे, विरोधी कृत्यं केली आहेत, बंड केली आहेत, परदेशांशी संबंध वगैरे ठेवले आहेत अशी माणसं या जातीत मोडतात. ही माणसं गावाबाहेर असतात, वेळोवेळी तुरुंगात जात असतात, कायमची तुरुंगात राहात असतात.
जाँग उन काय करतील याचा भरवसा कोणालाही नसतो. माणसं सतत धास्तावलेली असतात. त्यांचा कल पाहून मतं व्यक्त करतात. त्यामुळं जाँग उन यांना सल्लागार नाहीत. जाँग उन लहरी आहेत. स्वत:ची सत्ता, लष्कराच्या जोरावर ती टिकवणं आणि अणुबॉम्बची भीती घालून जगाला आणि देशातल्या लोकांना गप्प बसवणं ही त्यांची राजनीती आहे.
जेमतेम एक टक्का या वेगानं उ. कोरियाचा विकास होतो. गरिबी आणि विषमता फार आहे. तरीही ना तिथं बंड होतात ना जागतिक समुदाय त्या देशातल्या जनतेला मदत करू शकतो. कारण लहरी किम जाँग उन केव्हा काय करेल याची खात्री कोणालाच वाटत नाही.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. damlenilkanth@gmail.com)