- किरण अग्रवाल
नव्या वर्षात संवेदना जाग्या ठेवून माणुसकी जपण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. कोरोनाबद्दल खबरदारी हवीच, परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. संकटावर मात करणे आपल्याच हाती असल्याने चांगलेच होईल या आश्वासकतेची नवी उमेद मनात घेऊन नवीन वर्षातील वाटचाल करण्यासाठी तयार राहूया...
पुन्हा एकदा भयाच्या सावटात आपण नवीन वर्षात पाऊल ठेवले आहे. गतवर्षात कोरोनामुळे खूप काही भोगले, सोसले. घरगुती असो की सार्वजनिक; अनेक कामांना वा प्रकल्पांना खीळ बसून गेली. अर्थचक्रही कोलमडले, पण हिंमत न हारता माणूस पुन्हा उठून उभा राहिला. नवीन वर्षाचा प्रारंभ करतानाही या संकटाचे मळभ दाटून आलेले असले तरी, हीच हिम्मत मनी ठेवून वाटचाल करावी लागणार आहे.
वर्ष सरते म्हणजे केवळ कॅलेंडरचे पान बदलते असे नाही, सरत्या वर्षासोबतच्या अनेक क्षण- प्रसंग, आशा- अपेक्षांचे तरंग मनात उमटून जातात. त्यातून आत्मपरीक्षण करायला तर संधी मिळतेच, शिवाय नवीन वाटचालीसाठीचे दिशादर्शनही होऊन जाते. २०२१ ला गुडबाय करून २०२२ मध्ये प्रवेश करताना गत वर्षात अनुभवाव्या लागलेल्या अनेक घटना घडामोडी मनःपटलावर तरळून जाणाऱ्या आहेत. या सर्वांचीच नोंद येथे घेता येणे अशक्य आहे, परंतु त्यातील कोरोनाला टाळता येऊ नये. गतवर्षाच्या प्रारंभातही कोरोनाने जनजीवन विस्कळीत करून ठेवले होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक त्रासदायी व नुकसानदायी ठरली होती. कोरोनामुळे संपूर्ण वऱ्हाड प्रांतात आतापर्यंत सव्वादोन हजारांपेक्षा अधिक मृत्यू झाले असून, पावणेदोन लाख पेक्षा अधिक जणांनी कोरोनाचा सामना केला आहे. वेगाने केल्या गेलेल्या लसीकरणामुळे वर्षाच्या शेवटी अपेक्षिली गेलेली तिसरी लाट थोपवणे काहीसे शक्य झाले, परंतु आता २०२२ मध्ये पुन्हा त्यासंबंधीच्या भयाची स्थिती दाटून आली आहे.
नवे वर्ष, नवे हर्ष असे नेहमी म्हटले जाते, ते खरेही असते. कसलीही नवीनता ही मनुष्याला वेगळी ऊर्जा व आनंदच देऊन जाते, त्यामुळे कोरोनाचे भय असले तरी या नवीन वर्षातही आपण त्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द ठेवूया. कोरोनाचा भाऊ म्हणता येईल असा ओमायक्रॉन सध्या आला आहे. त्याची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन असो की कोरोना, वऱ्हाडातील रुग्णसंख्या अजून आटोक्यात आहे; घाबरण्याचे कारण नाही, परंतु म्हणून गाफील राहता येऊ नये. त्याच्या संसर्गाचा वेग पाहता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ शकतो. अशा स्थितीत स्वतःच स्वतःची काळजी घेऊन आपण सारे मिळून माणुसकी जपण्यासाठी सिद्ध होऊया. पै- पैसा कमावला जाईल व खर्चही होईल, परंतु नवीन वर्षात संवेदना जपून मदतीला धावून जाण्याचीच सर्वाधिक गरज राहणार आहे.
गत वर्षात अमूक झाले नाही, तमूक झाले नाही अशी यादी भलीमोठी देता येईल; परंतु त्याऐवजी थोड्याफार प्रमाणात का होईना जे झाले त्याकडे पाहून पुढील वाटचाल करूया. नवीन वर्षात समृद्धी महामार्ग निश्चित झालेला असेल तसेच अकोला शहरातील उड्डाणपूलही पूर्णत्वास आलेले असतील. पूर्णा ते अकोला ही पॅसेंजर गाडी अकोटपर्यंत धावण्याची अपेक्षा पूर्ण होऊ शकेल. वऱ्हाडातील दळणवळण वाढवून विकासाला चालना देऊ शकणाऱ्या या बाबी आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने लोणार सरोवराचा विकास घडून येण्याची अपेक्षा आहे. काही सार्वजनिक इमारती, प्रकल्प पूर्णत्वास जातील; हे सर्व होईलच पण या भौतिक विकासासोबत मानसिक विकासही होणे अपेक्षित आहे.
स्वतःच्या संकुचित परिघातून बाहेर पडून व ‘मला काय त्याचे’ या मानसिकतेतून बाहेर पडून आपल्याला सोशल व्हावे लागेल. कसल्याही अडचणी व आजारपणात आधार, धीर महत्त्वाचा असतो. तू देण्यासाठी पुढे यावे लागेल. वृद्ध माता-पित्यांना बेवारससारखे सोडून दिल्यामुळे मुलांवर गुन्हा दाखल करण्याची वेळ वाशिम पोलिसांवर नुकतीच आली, तशी दुर्दैवी वेळ कोणावर येऊ नये. आपले संस्कार कमी पडत आहेत का असा प्रश्न यातून निर्माण व्हावा, तेव्हा संवेदना जाग्या ठेवून समाजात वावरुया. नवीन वर्षात ही माणुसकी व संवेदनाच पणास लागणार आहेत, त्याच्याच जपणुकीसाठी सिद्ध होऊया...