लिटिल चॅम्प्स...सुरांच्या जादूनं रसिकांवर मोहिनी घालणा-या अंजली आणि नंदिनी गायकवाडचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 04:00 AM2017-11-05T04:00:00+5:302017-11-05T04:00:00+5:30

अहमदनगरसारखं छोटं शहर. पाठीशी कोणाचा मोठा आधार नाही. कोणा थोरामोठ्याचं मार्गदर्शन नाही, तरी इथल्या अंजली आणि नंदिनी गायकवाड या चिमुकल्या भगिनींनी आपल्या सुरांच्या जादूनं रसिकांवर मोहिनी घातली आणि आपलं आणि आपल्या शहराचं नाव देशपातळीवर उंचावलं. कोण आहेत या मुली? कसा झाला, होतोय त्यांचा संगीत प्रवास?..

 Little Champs ... Anjali and Nandini Gaikwad's Journey to Surprises by Suri | लिटिल चॅम्प्स...सुरांच्या जादूनं रसिकांवर मोहिनी घालणा-या अंजली आणि नंदिनी गायकवाडचा प्रवास

लिटिल चॅम्प्स...सुरांच्या जादूनं रसिकांवर मोहिनी घालणा-या अंजली आणि नंदिनी गायकवाडचा प्रवास

Next

साहेबराव नरसाळे

सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटातील ‘मर्द मराठा’ हे गाणं कोणी गायलंय, माहीत आहे?
- अंजली गायकवाडने़
या वर्षीची लिटिल चॅम्प्स कोण आहे?
- अंजली गायकवाड़
झी युवा वाहिनीचा ‘संगीतसम्राट’ किताब कोणी पटकावलाय?
- नंदिनी आणि अंजली गायकवाड या भगिनींनी़
या दोघी कुठल्या आहेत?
- अहमदनगरच्या!
वाव दॅट्स गे्रट़ खरंच एव्हढ्या भारी आहेत, या पोरी?
- यस्स़़़् अहमदनगरचं नावं देशभर नेलंय या चिमुकल्यांनी़.
अंजली गायकवाडची मिरवणूक नगरमधील ज्या रस्त्याने मार्गस्थ झाली होती, त्याच रस्त्यावरील एका छोटेखानी हॉटेलात रंगलेला हा संवाद़
झी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोचे यंदाचे पर्व गाजवले ते अहमदनगरच्या अंजली गायकवाडने़ तिची बहीण नंदिनी हीदेखील या पर्वात सहभागी झाली होती़ मात्र, तिला चार फेºयांनंतर बाहेर पडावे लागले़ तरीही ज्युरींनी तिचे तोंडभरून कौतुक केले़
या दोघी भगिनींनी संगीतावर इतक्या कमी वयात एवढी पकड मिळविली तरी कशी हे जाणून घ्यायला अंजली व नंदिनीचे वडील अंगद गायकवाड यांना गाठले़
अंगद गायकवाड यांनीही शास्त्रीय गायनात संगीत अलंकार पदवी मिळवली आहे़ त्यांचे गुरु लातूरचे पंडित शांतारामबुवा चिगरी़ ते मूळचे कर्नाटकचे़ पण आता लातूरला स्थायिक झाले आहेत़ अंगद गायकवाड यांनी शास्त्रीय गायनाचे धडे गुरुकुलपद्धतीने शांतारामबुवा यांच्याकडे गिरवले़ अंगद गायकवाड यांनीच अंजली व नंदिनी या दोघींना गायनाचे धडे दिले़ एव्हढेच नव्हे तर अंजली व नंदिनीची आई मनीषा यांनाही त्यांनी शास्त्रीय संगीत शिकवले़ मनीषाताईदेखील संगीताच्या चार परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत़ संपूर्ण गायकवाड घरानेच शास्त्रीय गायनासाठी वाहून घेतले आहे़ ख्याल गायकीत गायकवाड घराणे असे नाव भविष्यात रूढ झाल्यास आश्चर्य वाटायला नको, एव्हढे हे घराणे संगीतावर प्रेम करीत आहे़
अंगद गायकवाड मूळचे लातूरचे़ नोकरीच्या शोधात ते २००४ साली नगरला आले़ एम़एम़ वारे कनिष्ठ महाविद्यालयात संगीत शिक्षक म्हणून रुजूही झाले़ त्यांना दोन मुली़ पहिली नंदिनी आणि दुसरी अंजली़ अंगद गायकवाड संगीताचे क्लास घ्यायचे़ हे क्लासही त्यांच्या घरातच भरायचे़ अंजली, नंदिनी ते पहायच्या, ऐकायच्या़ पेटीसमोर बसून बोबड्या स्वरात गाणेही म्हणायच्या़
नंदिनीने पहिली स्पर्धा गाजविली ती वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी़ गीत होते सुमन कल्याणपूर यांचे़ ‘आकाश पांघरुनी जग शांत झोपले’. या गीतावर बालसंगीत महोत्सवात नंदिनीने पहिला सूर आळवला़ तिचे मोठे कौतुकही झाले़
अंजलीनेही वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा संगीत स्पर्धेत भाग घेतला़ सर्वात कमी वयाची स्पर्धक म्हणून लातूरमध्ये ती सर्वांचे आकर्षण ठरली़ तिचा हा व्हिडीओही यू ट्यूबवर आपल्याला पहायला मिळतो़ विशेष म्हणजे तिने पहिल्याच स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला़ सुरेश वाडकर यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली़
रोज सकाळी ६ वाजता उठायचे़ रियाज करायचा़ पुन्हा शाळेत जायचे़ तेथून आल्यानंतर क्लास करायचा़ पुन्हा सायंकाळी थोडा अभ्यास आणि पुन्हा शास्त्रीय गायनाची प्रॅक्टिस़ असे एकदम बिझी शेड्यूल़ खेळायला म्हणून वेळच नाही. पण मैदानावर जाऊन खेळण्यापेक्षा त्यांना खेळायला आवडते ते सूर आणि स्वरांशी. पेटी आणि तंबोºयाशी दोघीही अगदी छान खेळतात, अंगद गायकवाड सांगतात़ गायन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची अट किमान ८ वर्षे असते़ परंतु नंदिनी सहाव्या वर्षी आणि अंजली पाचव्या वर्षापासूनच स्पर्धेत गायला लागली़ दोघींनीही शास्त्रीय संगीतातील मध्यमा प्रथम परीक्षा उत्तीर्ण केली आहे़
अंगद गायकवाड दोघींनाही घेऊन विविध स्पर्धांना जातात़ पुणे, सातारा, नांदेड, लातूर, परभणी, अहमदनगर येथील अनेक स्पर्धा अंजली व नंदिनीने गाजविल्या आहेत़ महाराष्ट्राबाहेरही त्या पोहोचल्या असून, रायपूर, छत्तीसगढ, अहमदाबाद, लखनऊ येथे झालेल्या देशपातळीवरील स्पर्धांमध्ये आपल्यातले कलागुण त्यांनी दाखवून दिले आहेत. तिथल्या रसिकांकडून दाद मिळवली आहे. लखनऊ येथे झालेली क्लासिकल व्हाईस आॅफ इंडिया ही स्पर्धा जिंकणारी अंजली ही सर्वात कमी वयाची स्पर्धक आहे़ तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते अंजलीचा गौरव करण्यात आला़
तळेगाव दाभाडे येथील स्पर्धेत अंजलीने ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे गीत गायले होते़ त्यावेळी तिचे वय होते अवघे ९ वर्ष़ अंजलीच्या त्या गाण्याचे रेकॉर्डिंग चेन्नई येथील संगीत शिक्षक श्रीनिवास क्रिष्णन यांच्यापर्यंत पोहचले़ त्यांनी अंगद गायकवाड यांचा मोबाइल नंबर मिळविला आणि अंजलीला घेऊन चेन्नईला बोलावले़ क्रिष्णन यांच्याकडे ५०० मुलं संगीताचे शिक्षण घेतात़ त्या मुलांसमोर अंजलीला शास्त्रीय गायन करायचं होतं़ एप्रिलमध्ये अंजली आणि अंगद गायकवाड हे क्रिष्णन यांच्याकडे पोहचले़ तेथे अंजलीने गायन केलं़ त्या गाण्याचं क्रिष्णन यांनी रेकॉर्डिंग करून घेतलं़ तेच रेकॉर्डिंग त्यांनी ए़ आऱ रेहमान यांना ऐकवलं़ त्यांना अंजलीचा आवाज आवडला़ एप्रिलमध्ये पुन्हा क्रिष्णन यांचा अंगद गायकवाड यांना फोन आला आणि सांगितलं मुंबईच्या पवई स्टुडिओमध्ये या़ अंजलीचं रेकॉर्डिंग करायचंय़ अंगद गायकवाड व अंजली पवईच्या स्टुडिओमध्ये पोहचले़ त्यावेळी क्रिष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं की, एका चित्रपटासाठी अंजलीला ए़ आऱ रेहमान यांच्यासोबत गाणं गायचंय़ अंगद गायकवाड यांना हर्षवायू झाला़ ए़आऱ रेहमान यांनी अंजलीची प्रॅक्टिस करून घेतली आणि रेकॉर्ड झालं ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटातील मर्द मराठा हे अंजलीच्या आवाजातलं गाणं़ विशेष म्हणजे हे गाणं मराठी आणि तमीळमध्येही अंजलीनेच गायलं आहे़
झी युवा वाहिनीने ‘संगीत सम्राट’ या रिअ‍ॅलिटी शोसाठी आॅडिशन घेतल्या़ त्या आॅडिशनमधून अंजली व नंदिनीची निवड झाली़ दोघींनी या स्पर्धेतील ‘संगीत सम्राट’ किताब पटकावला़ त्याचवेळी दोघीनींही लिटिल चॅम्प्ससाठी पुण्यात आॅडिशन दिली़ तेथेही त्यांचे सिलेक्शन झाले़ तेथून त्यांना मुंबईला आॅडिशनसाठी बोलावण्यात आले़ मात्र, मुंबईत या दोघीही आॅडिशनमधून बाहेर पडल्या़ त्यामुळे लिटिल चॅम्प्सचा नाद त्यांनी सोडून दिला़ पुन्हा रियाज सुरू झाला़ रियाज सुरू असतानाच एक दिवस फोन आला की, अंजली आणि नंदिनीला वाइल्ड कार्डद्वारे ‘लिटिल चॅम्प्स’मध्ये प्रवेश मिळणार आहे; पण पुन्हा एक आॅडिशन द्यावी लागणार आहे़ आॅडिशन दिली़ सिलेक्शनही झाले आणि नंदिनी व अंजली गायकवाड ‘लिटिल चॅम्प्स’च्या सेटवर दाखल झाल्या़ नंदिनी चार फेºयांनंतर बाहेर पडली; पण अंजलीने ‘लिटिल चॅम्प्स’चे जेतेपद मिळविले़ पश्चिम बंगालच्या श्रेयन भट्टाचार्य व नगरच्या अंजलीला सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या या पर्वाचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आले़


सूर, स्वरांशी संगत..
मुलांना वाढवणं मोठं जिकिरीचं असलं तरी त्यात खूप आनंदही असतो. मुलांचं लहानपण म्हणजे आई-वडिलांसाठी जणू अमृताचा आनंद. मुलांचे बोबडे बोल जणू त्यांना वेदच वाटतात़ त्यांचे बोल कानात साठवून घ्यावेसे वाटतात. मुलाच्या बाललीलांत आपणही सहभागी व्हावंसं, त्यांच्यासोबत खेळावंसं वाटतं आणि यांच्यासोबत खेळताना आपणही लहानपण जगून घ्यावंसं वाटतं. पण गायकवाड घराण्यात थोडे वेगळेच आहे़ नंदिनी आणि अंजली यांना मैदानावर जाऊन खेळण्यापेक्षाही सुरांशी खेळायला आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायला आवडतं, आपल्या वडिलांकडे पाहून मोठं व्हावंसं वाटतं. शास्त्रीय संगीताच्या प्रवाहात डुंबून जावंसं वाटतं. त्यात रोज काहीतरी नवीन कारागिरी आत्मसात करावीशी वाटते. संगीताच्या या वातावरणातच त्यांचं बालपण फुलतंय़

(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title:  Little Champs ... Anjali and Nandini Gaikwad's Journey to Surprises by Suri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.