डॉ.ओ.पी.कपूर - वैद्यकशास्रातील पितामह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 07:00 AM2019-12-29T07:00:00+5:302019-12-29T07:00:04+5:30
गेल्या साडेसहा दशकापासून वैद्यकीय क्षेत्रातील लाखो विद्याथ्र्याना विनामूल्य ज्ञानदानाचे काम करणार्या डॉ. ओ. पी. कपूर यांच्या व्याख्यानमालेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये झालेली आहे. उद्या 88व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या डॉ. कपूर यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा आढावा.
जमीर काझी
वातानुकूलित हॉलमध्ये सुसज्ज भव्य व्यासपीठावर एक उंच, शिडशिडीत बांधा असलेली गौरवर्णीय व्यक्ती मोठय़ा स्क्रीनवर व्हिडीओ प्रोजेक्टरद्वारे गतीने हावभाव करीत समजावून सांगत असते आणि समोर जागा मिळेल त्या ठिकाणी बसलेले हजारो श्रोते मंत्रमुग्ध होऊन ते एकाग्रतेने ऐकत असतात. या प्रेक्षकांमध्ये 25-30 वर्षे प्रॅक्टिस केलेल्या शल्यविशारदापासून होमिओपॅथी, आयुर्वेदातील दिग्गज डॉक्टर आणि वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणार्या विद्याथ्र्याचा समावेश असतो. सलग सहा-सात तासांच्या या व्याख्यानानंतर प्रत्येकजण काहीतरी नवीन शिकल्याची ऊर्जा घेऊन तेथून बाहेर पडतो. विविध घटना, किस्से सांगत ‘क्लिनिकल मेडिकल’सारखा गहन विषय, वैद्यकीय परिभाषा, त्यातले किचकट शब्द आणि तंत्रांचे ओ.पी. इतक्या सोप्या आणि सहजतेने सादरीकरण करीत असतात की ते ऐकणार्याच्या कायमस्वरूपी स्मरणात साठून राहाते.
सध्या मेडिकल क्लासेसची फी लाखोंच्या घरात असताना हा अवलिया अशा पद्धतीने पूर्णपणे विनामूल्य गेली तब्बल 65 वर्षे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. त्यांच्याकडून ज्ञानार्जन केलेल्या डॉक्टरांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचलेली आहे. देशभरातील 150 प्रमुख महानगरांमध्ये ज्ञानदानाचा हा धबधबा अखंडपणे सुरू आहे.
दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात चर्नी रोड येथील बॉम्बे हॉस्पिटलच्या बिर्ला मातोश्री सभागृहात दर रविवारी सकाळी साडेसात ते दुपारी अडीचर्पयत डॉ. ओ. पी. कपूर यांचे हे ज्ञानसत्र चालते. डॉ. कपूर यांच्या निवृत्तीनंतर गेली 38 वर्षे ही व्याख्यानमाला अखंडितपणे सुरू आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी 375वर व्याख्याने दिली आहेत. त्याशिवाय देशभरातील 160 शहरांमध्ये ‘विकेन्ड रिफ्रेशर’ कोर्स घेतले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधनाबाबत अवगत राहात यांनी 12 पुस्तके विविध भाषेत लिहिलेली आहेत. ‘बॉम्बे हॉस्पिटल जर्नल’चे संपादक म्हणून अनेक वर्षापासून ते विनामूल्य जबाबदारी सांभाळत आहेत.
डॉ. ओ. पी. कपूर यांच्या अध्यायाची सुरुवात 1955 साली झाली. ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करीत असलेल्या पंचविशीतील कपूर यांना तेथील अध्यापनाची पद्धत रुचली नाही. त्यांचे लेक्चरर हे नुकतेच एमडी झालेले असल्याने त्यांना अनुभव कमी असे, त्यांच्यापेक्षा आपण सहजतेने विषय समजावू शकतो, असा त्यांना आत्मविश्वास होता. मात्र त्यासाठी डॉ. कपूर यांना पदव्युत्तर शिक्षणार्पयत प्रतीक्षा करावी लागली. एमडी करीत असताना ते हौसेने ज्युनिअर मुलांचे तास घेऊ लागले. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेर्पयत मोफत व्याख्यानाची ही मालिका नियमितपणे सुरू झाली. 1971साली डॉ. कपूर जसलोक हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्यानंतर त्याला विराम मिळेल, असा अंदाज होता. मात्र जेजेतील 800 विद्याथ्र्याचा आग्रह ते मोडू शकले नाहीत. 1986 साली सेवानिवृत्त होईर्पयत सुट्टीच्या कालावधीत मार्गदर्शन मालिका सुरूच राहिली. त्यानंतर मात्र बिर्ला मातोश्री हॉलमध्ये पुन्हा पावसाळी सत्रात डॉ. कपूर यांची व्याख्यानमाला अखंडितपणे सुरू राहिली आहे.
मेडिसीनमधील द्रोणाचार्य.
ओ.पी. कपूर यांचा जन्म 30 डिसेंबर 1932 रोजी लाहोरमधील एका समृद्ध कुटुंबात झाला. फाळणीनंतर ते मुंबईला स्थायिक झाले. अभ्यासात विलक्षण रुची असलेल्या या तरुणाने डॉक्टर बनण्याचे ध्येय पहिल्यापासून बाळगले होते. खालसा कॉलेजमध्ये सुरुवातीला शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ एडिनबर्गमधून वैद्यकीय पदवी घेतली. ग्राण्ट मेडिकल कॉलेजमधून पीजी केल्यानंतर 1986 र्पयत ते जेजे हॉस्पिटलमध्ये मेडिसीनचे प्रोफेसर आणि ऑनररी फिजिशियन म्हणून कार्यरत राहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी एडिनबर्गसह अमेरिकन कॉलेजची शिष्यवृत्तीही मिळविली होती. त्यांच्या निष्णात उपचारशैलीमुळे लाखो रुग्णांना जीवनदान मिळाले, तर त्यांच्यापासून शिक्षण घेऊन तितकेच डॉक्टर, सर्जन देश-विदेशात सेवा बजावत आहेत. बॉम्बे हॉस्पिटलच्या ‘मेडिकल जर्नल’च्या संपादनामध्ये डॉ. कपूर यांनी अमूल्य कामगिरी बजावली आहे. त्यांनी या पत्रिकेला वैद्यकीय क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. सोप्या सरळ शैलीतील व्याख्यानमालेबरोबरच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासंबंधी अद्ययावत माहिती, तंत्रज्ञानाचा साठा असलेली संशोधनपर तब्बल 13 पुस्तके लिहिलेली आहेत.
मानवाला होणार्या विविध व्याधी, विकार, त्यांची शास्नेक्त कारणे व त्याला प्रतिबंधासाठी आवश्यक औषध व उपचार पद्धती रुग्णांना सोप्या भाषेत समजावे, यासाठी त्यांनी लिहिलेले ‘डॉ. कपूर्स फॅमिली गाइड’ हे त्यांचे वाचकप्रिय पुस्तक! विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पुस्तकाला देशाच्या कानाकोपर्याबरोबरच यमन, सौदी अरेबियातूनही प्रचंड मागणी होती. त्यानंतर 25 वर्षानंतर प्रसिद्ध झालेला या पुस्तकाचा दुसरा भागही तितकाच लोकप्रिय ठरला. या दोन पुस्तकांच्या साहाय्याने प्रत्येकाला आपल्या आजाराची चिकित्सा स्वतर् करून त्यावर उपाययोजना करायला मदत होऊ शकते.
वैद्यकीय क्षेत्रातील अपूर्व कार्याबद्दल डॉ. कपूर यांना डॉ. बी.बी. रॉय पुरस्कार, धन्वंतरी, राज्य शासनाचा जीवन गौरव, मेडिकल अपडेट हेल्थ केअर, बेस्ट टीचर ऑफ द मिलेनिअम अशा अनेक बहुमूल्य पुरस्कार व सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
**************
पद्धतशीर बेतलेला दिनक्रम
सकाळी सहा वाजता नेपियन्सी रोडवरील रजत बिल्डिंगमधील फ्लॅटमधून तयार होऊन डॉ. कपूर बाहेर पडतात ते फोर्टमधील खादी भांडारस्थित इमारतीतील क्लिनिककडे. डायव्हरला पोहोचण्यासाठी थोडा जरी वेळ झाला तरी ते टॅक्सीतून तिकडे पोहोचतात. कारण अपॉइंटमेंट घेऊन भल्या सकाळी पोहोचलेल्या रुग्णांना ते जास्त काळ वाट पहायला लावत नाहीत. त्यानंतर दुपारी 2.45 वाजता त्यांची कार वेलिंग्टन टेनिस क्लबवर पोहोचलेली असते. त्या ठिकाणी एक तास सराव केल्यानंतर तेथून घराकडे परत निघतात.
**********
बॉलिवूडचे लाडके धन्वंतरी
भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह
समजल्या जाणार्या पृथ्वीराज कपूर यांना कर्करोगाची लागण झाल्याचे निदान डॉ. कपूर यांनीच केले. तेव्हापासून चित्रपटसृष्टीतील दिग्गज घराण्याचे ते फॅमिली डॉक्टर बनले. पृथ्वीराज यांच्यानंतर राज कपूरपासून ते रणबीर कपूर, करिश्मा, करिना कपूर यांच्यार्पयत त्यांचे नाते कायम राहिले आहे. कपूर कुटुंबीयांबरोबरच सलमान खानपासून ते काजोल, अजय देवगनर्पयतच्या बॉलिवूड स्टारशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते टिकून आहे.
***
सूरसारथी
नव्वदीच्या उंबरठय़ावर पोहोचलेले डॉ. ओ.पी. कपूर आजही तितकेच उत्साही असण्यामागील कारण त्यांची जीवनशैली आहे. सकाळी व्यायाम, दुपारी टेनिस आणि सायंकाळी गायन ही त्रिसूत्री त्यांनी गेल्या कित्येक वर्षाहून जोपासली आहे. संगीत हे डॉक्टरांचे जीव की प्राण असून, वैद्यकीय क्षेत्राबरोबरच अजरामर संगीत, ख्याल आणि गीतांच्या हजारो कॅसेट्स, स्लाइड्सचा संग्रह त्यांच्या लायब्ररीत आहे. त्यातील अनेक गाणी त्यांनी स्वतर् गायलेली आहेत. डॉ. कपूर यांना संगीताची आवड सुरुवातीपासून होती. मात्र वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर त्यांनी ग्रॅण्ड मेडिकल कॉलेजमधून निवृत्ती घेतली आणि संगीतामध्ये स्वतर्ला झोकून दिले. त्यानंतर त्यांनी व्याख्याने, खासगी प्रॅक्टिस आणि संगीत या तीन बाबींमध्येच स्वतर्चा दिनक्रम निश्चित करून घेतला. डॉ. कपूर यांचे अवघे जीवनच समर्पित आणि अचंबा वाटायला लावील, असेच आहे!
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य प्रतिनिधी आहेत.)