..गेली पन्नास वर्षे!! - केन झकरमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:02 AM2020-01-26T06:02:00+5:302020-01-26T06:05:13+5:30
पन्नासेक वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या मैफलीत अली अकबर खांसाहेबांच्या मैफलीत बसलो होतो, तेव्हा भारतीय संगीताने वेड लावले.. त्यानंतर गुरुजींनी पोटाशी धरले!! सरोदच्या तारा छेडताना लागणारी एकाग्रता साधणे आता मला जमू लागले आहे आणि रंगमंचावर बसलेला कलाकार अमेरिकेतला गोरा नाही तर या मातीत रंगलेला आहे असे आता रसिकांना वाटू लागले आहे. ..आणखी काय हवे?
- केन झकरमन
1971.
पन्नासेक वर्षांपूर्वीची, अमेरिकेच्या बर्कलीमधील एक थंड सकाळ. संगीताची एकही मैफल न चुकवणार्या माझ्या वडिलांबरोबर छोट्या सभागृहात गेलो तेव्हा मैफल सुरू झाली होती. स्टेजवर तबला आणि तबलजी होते; पण तेही शांतपणे कशाची तरी वाट बघत असावे. समोर कोणताही कागद न ठेवता, मिटलेल्या डोळ्यांनी तो कलाकार वाजवत होता. पाण्याच्या मंद लाटा याव्या तसे त्या वाद्याचे स्वर संथपणे हलकेच र्शोत्यांपर्यंत येत होते. समोर बसलेले 30-40 र्शोते अधून-मधून माना डोलवत होते, मधेच हात उंचावत होते. ते कशासाठी? ही नेमकी कशाची खुण? मला प्रश्न पडला. उत्तरासाठी वडिलांकडे बघितले तेव्हा ते डोळे मिटून इतके शांत बसले होते, मला समजले, माझा स्पर्शसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचला नसता.
- एक नक्की! कोणत्याही ठेक्याविना कानावर येत असलेले ते स्वर जणू आमच्या पाठीवर प्रेमाने थोपटत होते. इतकी शांतता आजवर कोणत्याच मैफलीत मी अनुभवली नव्हती. समोरचे र्शोते, वातावरणातली स्तब्धता आणि गारठा, हाताची घडी घालून उजव्या बाजूला बसलेले तबलजी या सगळ्याचा विसर पडून स्वरांमध्ये खोलवर उतरून फक्त आपल्या वाद्यातील स्वरांबरोबर असलेला तो कलाकार.. यापूर्वी ऐकलेल्या कित्येक मैफलींपेक्षा अगदी वेगळा असा हा अनुभव. काय होते ते वेगळेपण ज्याला मला स्पर्श करता येत नव्हता? उत्तर न देणार्या एखाद्या गूढ वाटेने भूल घालावी तसा या प्रश्नाचा शोध घेत मी निघालो आणि एका मुक्कामी मला भेटले ते माझे संगीताचे गुरु . उस्ताद अली अकबर खाँसाहेब. आजवर नकाशावरसुद्धा कधी भारत नावाचा देश बघितला नव्हता, मग तेथील संगीताची ओळख वगैरे दूरच. तरीही, मला शोधत आले का हे स्वर? रंगाने भारतीय नसलेला; पण भारतीय संगीताशिवाय जगू न शकणारा एक कलाकार म्हणून माझे भविष्य घडवण्यासाठी?
संगीताचे सौंदर्य नेमके असते कशामध्ये याचा शोध घेत निघालेला मी एक तरु ण होतो. जाझ संगीत खूप ऐकले; पण त्यात मन रमेना, मग पाश्चिमात्य शास्रीय संगीताचा अभ्यास सुरू केला; पण इथेही सगळे आधीच रचलेले, कागदावर लिहिलेल्या स्वरांच्या चौकटी ओलांडण्याची मुभा नसलेले. भारतीय संगीत ऐकताना मला प्रथमच जाणवले ते त्यातील स्वातंत्र्य. त्या ओढीनेच मी कॅलिफोर्नियामध्ये गुरु जींनी सुरू केलेल्या अली अकबर म्युझिक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. स्वत: खांसाहेब आमचे गुरु होते. आमचे म्हणजे भारतीय संगीताची ओळख करू घेऊ इच्छिणार्या 10-15 विद्यार्थ्यांचे. आजवर कधीच न ऐकलेले आणि एका वेगळ्या संस्कृतीमधून आलेले संगीत आम्हाला शिकवणे हे त्यांच्यासाठी एक आव्हानच असावे. त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यापुढे आमचे प्रश्नचिन्ह असायचे. आलाप म्हणजे? वादी-संवादी स्वर कसे निवडायचे? बंदिश कशासाठी हवी? रागामधील वज्र्य स्वर कोण ठरवते? हे शिक्षण म्हणजे स्वरांच्या जंगलात हरवून जाण्यासारखे होते. शिकवण्यासाठी गुरु जींनी कधीच हातात वाद्य घेतले नाही, ते स्वत: वर्गात गात असत. कोणत्याही साथीविना ते दोन-दोन तास वर्गात गात होते, गाता-गाता त्या रागाविषयी बोलत होते. ‘गाताना दिसणारे रागाचे रूप फार वेगळे असते ते लक्षपूर्वक ऐका’ हा त्यांचा आग्रह असायचा. गुरु जींचे गाणे ऐकणे हा आमच्या शिक्षणातील सगळ्यात महत्त्वाचा भाग. एकतर गुरु जी गात त्या वेगाशी जमवून घेत त्यातील स्वर ओळखताना आमची कोण धांदल उडत असे, शिवाय रोजचाच यमन; पण कालचा राग आज दिसायचा नाही. एका अर्थाने हे रोज नवा राग ऐकण्यासारखे होते..! प्रत्येक विद्यार्थ्याने एकेकाने गुरु जींसमोर बसून गाणे ही मोठी अवघड परीक्षा असायची.!
एका अशाच परीक्षेत माझ्याकडे गुरुजींचे लक्ष वेधले गेले. मी जे गात होतो तो प्रत्येक आलाप ते लक्षपूर्वक ऐकत होते, गाणे संपले आणि त्यांनी प्रथमच मला माझे नाव विचारले. तोपर्यंत मी त्या 15-20 विद्यार्थ्यांमधील एक बिनचेहेर्याचा विद्यार्थी होतो.
गुरुजी मला म्हणाले, ‘वाद्यांच्या खोलीत जा आणि तुला कोणते वाद्य शिकायचे आहे ते आण!’
बीटल्समध्ये मी सतार ऐकली आणि बघितली होती. मी सरोद उचलली आणि गिटारप्रमाणे वाजवू लागलो. ती वाजेना. मग सतार उचलली. पुढचे वर्षभर मी सतार शिकत होतो; पण आमची मैत्री होत नव्हती!
माझ्या आजवरच्या शिक्षणात एका चमत्कारिक गोष्टीचा मोठा वाटा आहे. मला पडणार्या स्वप्नांचा. एका रात्री गुरु जी स्वप्नात आले आणि म्हणाले,
‘कशाची वाट बघतोयस? वाद्य निवड..!’
- आणि माझ्या हातात सरोद आले.! सतार जाऊन पुन्हा सरोद. सतार की सरोद? का यापेक्षा वेगळे वाद्य? माझे मलाच नेमके उमगत नव्हते पण गुरु जी शांत होते. गुरुजींच्या वडिलांच्या संतापाच्या अनेक कहाण्या आणि गुरु जीच्या वाट्याला आलेली मारहाण याच्या अनेक कथा एव्हाना मला ठाऊक झाल्या होत्या. धाकाची ही करकरीत छडी गुरु जींना अमान्य होती. त्यांचा संयम अफाट होता. प्राथमिक शिक्षणानंतर माझा त्यांच्याबरोबर एकट्याने सराव सुरू झाला तेव्हा हा संयम अनेकदा जाणवला. वाद्य वाजवताना गायचे असते हा त्यांचा सततचा आग्रह. रोजचा सराव म्हणजे दोन तास गायन आणि त्यानंतर दोन तास वादन असाच. गुरु जींकडून जेवढा काळ मला शिक्षण मिळाले त्या काळात कमीत कमी हजारेक बंदिशी मी गायला शिकलो.
भारतीय संगीत किती ‘डिमांडिंग’ आहे हे या सरावाने मला दाखवून दिले. क्षणभर जरी स्वरांवरून लक्ष ढळले तरी पुढची वाट चुकू शकते. सतत नवे काहीतरी मनात स्फुरावे लागते आणि ते चिमटीत पकडावे लागते. ही उत्स्फूर्तता संपली की हे गाणे शिळे होते. आम्हा पाश्चिमात्य कलाकारांसाठी तीच मोठी कोड्यात टाकणारी बाब असते. याचे एक कारण कदाचित आमच्या जीवनशैलीत असावे. आमचे सगळे जगणेच शिस्तीच्या आखलेल्या रेघेवरून चालणारे. आजारी मित्राला भेटायला जातानासुद्धा आम्ही त्याची आधी परवानगी मागणार आणि गप्पांचे फडसुद्धा वेळेच्या चौकटीत संपवणार! पाऊस पडला म्हणून उत्स्फूर्तपणे नाचणार्या मोराचे क्षणभर कौतुक ठीक आहे; पण आमच्या लेखी हा वेडेपणाच. भारतीय संगीत शिकता शिकता, त्यातील बंदिशी, टप्पे, तराणे ऐकता-ऐकता मला जाणवत गेले, या संगीताशी इथल्या जगण्याचे घट्ट नाते आहे. बदलणारे ऋतू, त्यानुसार रंग बदलणारा निसर्ग आणि या निसर्गासोबत बदलत जाणारे इथले अन्न, वेशभूषा, दिनक्र म हे सारे जाणून नाही घेतले तर या गाण्यातील गोडवा, सहजता नाही येणार माझ्या स्वरामध्ये..! त्यासाठी भारतातच जायला हवे.
‘कलाकार म्हणून यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आधी भारतात नाव मिळवावे लागते कारण इथे संगीत वेगळ्या तर्हेने बघणारा र्शोता आहे’, असे मला झाकीरभाई एकदा म्हणाले होते. ते मला भारतात आल्यावर पटले.
1972 साली मी गुरु जींच्या वर्गात दाखल झालो. 37 वर्षं मला त्यांचा सहवास मिळाला. एक स्वतंत्र कलाकार म्हणून माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी आधी मला स्वत:बरोबर त्यांच्या मैफलीत सामावून घेतले. या सहवासाने मला दिलेली एक महत्त्वाची देणगी म्हणजे, संगीताकडे बघण्याची गुरु जींची दृष्टी आणि संगीताच्या माध्यमातूनच जगण्यातील प्रश्न हाताळू बघणारे मन मला जवळून बघायला मिळाले. आयुष्यातील अतिशय खडतर काळ सुरू असताना, अनेक प्रश्नांनी मन व्यथित झाले असताना या वैफल्याला वाट देण्यासाठी एखादा नवीन राग निर्माण करण्याची कल्पना अन्यथा कोणाला सुचू शकेल? गुरु जींनी या काळात गौरी मंजिरी नावाच्या एका नितांत सुंदर रागाची निर्मिती केली! सगळा काळ गुरु जी एक कलाकार म्हणून संगीतमहोत्सव आणि मैफलीमधून वावरत होते; पण त्यांच्या वडिलांनी निर्माण केलेली एक सशक्त परंपरा मैहरच्या बाहेर, केवळ देशात नाही तर या सीमेपलीकडे असलेल्या संगीत परंपरेला जोडू बघत होते. भारतीय संगीत जगाच्या व्यासपीठावर नेऊन ठेवणारे जे पहिल्या पिढीचे कलाकार त्यापैकी गुरु जी एक..!
या सगळ्या प्रवासाचा साक्षीदार होता होता मी मनाने कधी भारतीय झालो ते मला समजलेच नाही.. भारतीय झालो म्हणजे काय, तर सरोदच्या तारा छेडताना लागणारी एकाग्रता साधणे आता मला जमू लागले आहे आणि रंगमंचावर बसलेला कलाकार अमेरिकेतील गोरा नाही तर या मातीत रंगलेला आहे असे आता रसिकांना वाटू लागले आहे. बर्कलीमध्ये अली अकबर खांसाहेब यांच्या मैफलीत र्शोता असलेला एक तरु ण तीन दशकांचा प्रवास करून सवाई गंधर्वच्या बुजुर्ग रंगमंचावर येऊन आपली सेवा देतो, हे माझ्यासाठी आजही रोमांचकारी आहे..
केन झकरमन
केन झकरमन, स्वित्झर्लंड. सरोदवादक उस्ताद अली अकबर खांसाहेब यांचा प्रदीर्घ सहवास आणि तालीम लाभलेला एक प्रतिभावंत कलाकार तसेच जागतिक मान्यता असलेले सरोदवादक. स्वित्झर्लंडमध्ये बासल येथे चालवल्या जाणार्या ‘अली अकबर कॉलेज ऑफ म्युझिक’मध्ये भारतीय संगीताचे शिक्षण देणारे एक गुरु . एक्झॉटिक इस्ट अँण्ड इट्स एक्झॉटिक म्युझिक’ याबद्दल वाटणार्या कमालीच्या उत्सुकतेपोटी या शिक्षणाकडे वळलेला हा प्रयोगशील कलाकार आज महत्त्वाच्या जागतिक संगीत महोत्सवांमध्ये रसिकांची दाद मिळवत आहे.
---------------
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com
---------------
ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.