- गौरी पटवर्धन
‘माझ्याकडे एकदम भारी बिझनेस प्लॅन आहे.’ सहावीतली सलोनी शेजारी राहणार्या चौथीतल्या अमोघला सांगत होती. शेजारच्याच खोलीत सलोनीची आजी दुपारची डोळे मिटून पडली होती. तिला झोप लागलेली नव्हती. त्यामुळे त्या दोघांचं सगळं बोलणं तिला ऐकू येत होतं. पण सलोनी आणि अमोघला ते माहितीच नव्हतं. ‘बिझनेस प्लॅन म्हणजे? फॅक्टरी वगैरे काढायची का?’ बिचार्या अमोघने त्याला माहिती असलेला एकमेव बिझनेस सांगितला.‘अरे’. सलोनीने त्याच्याकडे असं बघितलं की ‘किती लहान आणि बावळट आहे हा’. मग समजावून सांगण्याच्या आवाजात ती म्हणाली, ‘बिझनेस म्हणजे काही नुसती फॅक्टरी नसते, इतर पण खूप काय काय बिझनेस असतात. मला माहितीये. आमच्या स्कूलमध्ये शिकवतात ना.’ ‘मीपण तुझ्याच स्कूलमध्ये आहे.’ अमोघ जरा दुखावल्या आवाजात म्हणाला.‘अरे पण तू फोर्थमध्ये आहेस ना. तुम्हाला नाही एवढय़ात शिकवणार. जरा मोठं झालं, सिक्स्थमध्ये गेलं की शिकवतात.’‘पण काय शिकवतात?’‘अँक्च्युअली ना, आम्हाला न्यूजपेपर वाचायला सांगतात. तो मी वाचला. त्यातून मला एक भारी आयडिया सुचली आहे. न्यूजपेपरमध्ये छापलं होतं, की दिल्लीमध्ये ऑक्सिजन बार सुरू झालाय. आणि त्याचे रेट्स काय आहेत माहितीये का? फिफ्टीन मिनिट्ससाठी थ्री हंड्रेड रुपीज. म्हणजे मोठय़ा पिझा हाउसमधल्या पिझापेक्षा पण महाग.’‘पण ऑक्सिजन बार म्हणजे काय?’ अमोघच्या डोळ्यासमोर बहुदा चोकोबार असावा.‘अरे, म्हणजे ते एक शॉप असतं’ सलोनी तिला समजलेली माहिती देत होती, ‘तिथे आपण जायचं, थ्री हंड्रेड रुपीज भरायचे. मग ते लोक आपल्याला फिफ्टीन मिनिट्ससाठी प्युअर ऑक्सिजन देणार.’‘पण तिथे कशाला जायचं? आम्हाला तर शिकवलंय की जगात सगळीकडे ऑक्सिजन असतोच.’‘अरे हो, पण दिल्लीसारख्या शहरांमध्ये खूप पोल्युशन असतं ना, तिथे लोकांना फ्रेश एअर मिळत नाही. त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही; पण माणसांना ऑक्सिजन लागतोच. म्हणून लोक अशा ऑक्सिजन बारमध्ये जाणार आणि तिथे जाऊन फ्रेश ऑक्सिजन घेणार.’‘अच्छा’. आत्ता अमोघला थोडं थोडं लक्षात येत होतं. ‘पण तो ऑक्सिजन बार असतो कसा?’ ‘हे बघ’ सलोनीने पेपरमध्ये छापून आलेला फोटो दाखवला.‘हे तर भारी रेस्टॉरंटसारखं आहे.’‘हो.’आता ऑक्सिजन बार काय आणि कसा असतो ते दिसल्यावर अमोघचा त्याच्यातला इंटरेस्ट संपला. मग तो सलोनीच्या मूळ विषयाकडे वळला. ‘पण तुझा बिझनेस प्लॅन काय आहे?’ त्याने हे विचारल्यावर आतल्या खोलीतून ऐकणार्या आजीला फार बरं वाटलं. तिला केव्हापासून तो प्लॅन ऐकायचा होता. पण आपण विचारलं तर कदाचित सलोनी सांगणार नाही म्हणून ती विचारू शकत नव्हती. ‘अरे तोच प्लॅन आहे.’ सलोनी म्हणाली. ‘तोच म्हणजे?’ ‘म्हणजे आपण पण ऑक्सिजन बार सुरू करायचा.’‘आपण??? पण आपल्या इथे कुठे एवढं पोल्युशन आहे?’‘आत्ता नाहीये. पण आपण मोठे होईपर्यंत होणारच ना? बाबा म्हणतात की या रेटने पोल्युशन वाढत राहिलं तर आपल्याला स्कूल बॅगबरोबर ऑक्सिजन सिलिंडरपण न्यायला लागेल.’‘पण आपण कसा सुरू करणार असा बार?’ अमोघ परत पेपर उचलून त्यातला फोटो बारकाईने बघत म्हणाला, ‘आपल्याकडे दुकान पण नाहीये आणि पैसे पण नाहीयेत.’‘पण माझी आयडिया अशी आहे की आपल्याला दुकान आणि पैसे लागणारच नाहीत!’ सलोनी एक्साइट होऊन म्हणाली. ‘आपण असा बार करणारच नाही. कारण असा बार करणारे लोक ऑक्सिजन कुठून आणतात?’‘कुठून?’ अमोघने असा विचारच केला नव्हता.‘‘अरे ते ऑक्सिजन देणार्या कंपनीतून विकत आणतात. मी आमच्या टीचर्सना विचारलं. त्या म्हणाल्या की काही फॅक्टरीमध्ये ऑक्सिजन तयार करतात आणि सिलिंडरमध्ये भरून तो विकतात.’‘मग तो आणायला आपल्याला पैसे लागतील ना?’‘नाही ना!’ आता सलोनी तिच्या बिझनेस प्लॅनच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आली होती, ‘आपण ऑक्सिजन विकत आणायचा नाही. आपण तो तयार करायचा.’‘फॅक्टरी सुरू करून??’ अमोघ पुन्हा फॅक्टरीचाच विचार करत होता.‘नाही रे, आपण ना भरपूर झाडं लावायची. झाडं ऑक्सिजन तयार करतात. आपण आत्ता झाडं लावायची, म्हणजे आपण कॉलेजला जाऊ तोवर ती मोठी होतील. मग आपण झाडाखाली बसण्याचे पैसे घ्यायचे. म्हणजे झाला आपला ऑक्सिजन बार!’‘भारी आयडिया आहे. त्यात आपण आंब्याचं झाड लावू. म्हणजे आपल्याला आंबेपण मिळतील.’‘आणि पेरूचं’‘आणि जांभळाचं’तिथे कुठली कुठली झाडं लावायची याचं प्लॅनिंग करत दोघं तिथून निघाले. त्यांच्या घराच्या मागे किती जागा आहे आणि त्यात किती झाडं लावता येतील हेही बघायला पाहिजे होतं. ते बाहेर गेल्यावर आजी मनात म्हणाली, ‘बिझनेस म्हणून का असेना, लेकरांना झाडं लावायची बुद्धी होते यातच सगळं पावलं. नाहीतर मोठी माणसं, आहे ती झाडं तोडून ऑक्सिजन बारमध्ये जाण्याचाच विचार करतील. ही मुलं आज झाडं लावतील आणि उद्या ऑक्सिजन बारची गरज नाहीशी होईल एवढीच आशा.’
lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)