पुण्यातील तालमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 07:00 AM2019-08-25T07:00:00+5:302019-08-25T07:00:04+5:30
जगात पुण्याची ओळख आहे ती विद्येचे माहेरघर म्हणून; पण पुणे हे मल्लविद्येचेही आगर आहे.
अंकुश काकडे-
पुणे जिल्ह्यातील अनेक कुस्ती क्षेत्रातील नामवंत पुढे लोकप्रतिनीधी झाले. मग त्यात नगरसेवक नाना बराटे, नामदेव शेडगे, आबा निकम तर आमदार म्हणून ज्ञानोबा लांडगे, महेश लांडगे, मामासाहेब मोहोळ, रामभाऊ मोझे तर खासदार म्हणून विदुरा नवले, एवढेच काय तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनंतराव थोपटे हेदेखील नामवंत पैलवान होते.
चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ सर्वांत जुनी तालीम. सध्या जेथे ही तालीम आहे, तेथे भरपूर चिंचेची झाडे होती. मोहनसिंंग छप्परबंद, परदेशी हे पेशव्यांचे जवळचे मित्र होते. त्यांनी तालीम बांधण्याचा मनोदय व्यक्त केला आणि १७८३मध्ये पेशव्यांनी ही तालीम बांधून दिली. रावजीबुवा हे या तालमीचे पहिले वस्ताद होते, ते ब्रह्मचारी होते व ते तालमीतच रहात, त्यांचे निधनही याच तालमीत झाले. रावजीबुवांनी त्या काळात पिलोबा न्हावी, गणपतराव व गंगाराम दामले, असे नामवंत कुस्तीगीर तयार केले. रावजीबुवांनंतर वस्तादकी यशवंत गणेश पंडित यांच्याकडे आली. त्यानंतर शिवकुमार पंडित हे वस्ताद झाले; पण खºया अर्थाने तालमीचा लौकिक वाढला तो १९२०-३०च्या दशकात गणपतराव शिंंदे या झुंजार मल्लाने पुण्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील अनेक नामवंत मल्लांना आस्मान दाखविले. १९३० ते ५०च्या काळात नारायणराव शेडगे, सीताराम मोरे, किसनराव गायकवाड असे अनेक नामवंत कुस्तीगीर या तालमीने दिले. याच तालमीतील मल्ल बारक्या बाबूराव बलकवडे यांची कुस्ती नामदेवराव मते यांच्याबरोबर झाली होती. १९५०-६०च्या कालखंडातदेखील अनेक मल्ल येथे तयार झाले. माजी मंत्री अनंतराव थोपटे याच तालमीतील; पण खºया अर्थाने या तालमीचा गौरव वाढवला तो बुवासाहेब घुमे यांनी. १९६२मध्ये जार्काता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला ताम्रपट मिळवून दिला. सतत ४ वर्षे नॅशनल चॅम्पियन, ७ वर्षे राज्यात प्रथम क्रमांकावर होते. १९६०-७०च्या दशकातही ही तालमीची उज्ज्वल परंपरा अनेकांनी पुढे नेली. ज्यात नागेश्वर गिरमे यांनी राष्ट्रीय राज्य कुस्ती अधिवेशनात सतत ४ वर्षे सुवर्णपदक मिळविले. १९७०-८० मध्ये बुवासाहेब घुमे यांनी वस्ताद म्हणून या तालमीत काम केले.
कुंजीर तालीम कुमठेकर रस्त्यावरील कोर्टकचेरीत गाजलेली तालीम. १८३४मध्ये सरदार कुंजीरांनी ती बांधली. कालांतराने हा वाडा कुंजीरांनी विकला. वाडा घेणाऱ्याने ही तालीमपण माझी, असा दावा केला व पैलवानांना तालमीत येण्यास मज्जाव केला. शेवटी प्रकरण दिवाणी कोर्टात गेले. तेथे मात्र कागदपत्रांच्या आधारे ही तालीम कोर्टाने पंचमंडळीकडे सादर केली. ल. ब. भोपटकर यांनी तालमीची बाजू कोर्टात कुठलीही फी न घेता मांडली, त्या वेळी त्यांना शंकरराव गायकवाड, शंकरराव गुजर, लिमये, आगाशे या मंडळींनी मोलाची मदत केली. १९७६मध्ये पहिले वस्ताद होण्याचा मान शंकरराव गायकवाड यांना मिळाला. शंकररावांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यांच्याकडे २००-२५० म्हशी होत्या. कुस्तीसाठी, तालमीसाठी त्यांचा हात नेहमी सढळ होता. त्यांच्या काळात अनेक नामवंत पैलवान तयार झाले. पुढे वस्ताद म्हणून गणपतराव पायगुडे, लक्ष्मणराव पायगुडे यांनी बराच काळ काम केले. पुढे शाळेसाठी ही जागा महापालिकेने घेतल्यामुळे नवीन जागेत तालीम बांधून दिली. पुढे तालमीत अद्ययावत व्यायामाची साधनेही आली. त्यासाठी गणपतराव नलावडे, निळूभाऊ-हरिभाऊ लिमये, दत्तोबा मानकर यांनी मोलाचे साह्य केले. शिवसेनेचे नेते बबनराव गायकवाड हे या तालमीकडे जातीने लक्ष देत. त्यांनी तेथे सार्वजनिक वाचनालय, गणेशोत्सव सुरू केले. १८८४मध्ये सदाशिव पेठेतील दिसले तालीम वस्ताद दिसले यांनी स्थापन केली. या तालमीचे वैशिष्ट्य सांगितले जाते ते हे, की तालमीत सराव नसेल तेव्हा कॉलेजमधील विद्यार्थी अभ्यासासाठी येत. त्या वेळचे कुस्ती संघाचे अध्यक्ष श्रीराम कोकणे याच तालमीतील मल्ल. नेवाळे, दिसले, दारवटकर, सुतार, साळुंके अशा नामवंत मल्लांनी तालमीचे नाव उंचावले; पण त्यात मोठी भर घातली ती श्रीराम कोकणे यांनी. आंतरविद्यापीठ स्पर्धांत ते सतत ४ वर्षे अजिंंक्य ठरले. १९५५च्या राज्य क्रीडा महोत्सवात त्यांनी सुवर्णपदक पटकावून सतत ३ वर्षे पुणे विद्यापीठ संघाचे कप्तान म्हणून काम केले.
कोथरूडमध्येदेखील धोंडिबा भुजबळ यांनी १८८२मध्ये तालीम सुरू केली. कोथरूड भागातील अनेक नामवंत मल्ल त्यांच्या देखरेखीखाली तयार झाले. त्या काळातील प्रसिद्ध वस्ताद म्हणून धोंडिबांचा नावलौकिक होता. त्यांनी तयार केलेल्या मल्लांची यादीदेखील फार मोठी आहे. याच तालमीतील शंकरराव भेलके या पैलवानाने यात्रेतील सर्व कुस्त्या केल्या व त्या चितपट केल्या; त्यामुळे या तालमीचा नावलौकिक वाढला. धोंडिबांच्या निधनानंतर त्यांचे नाव या तालमीला देण्यात आले व वस्ताद म्हणून हिरामणदादा हे काम पाहू लागले. रामचंद्र मुळूक, धोंडिबा माथवड, सुतार, बच्चू लोढा, लोंढे, भूमकर, कोळी, कोकाटे, पारखी अशी अनेक नामवंत मल्लांची यादी येथे पाहायला मिळते. त्यानंतर वस्ताद झालेले दामोदरपंत भुजबळ त्यांनी स्वत:च्या खर्चाने खुराक देऊन अनेक मल्ल घडविले. त्या काळात महाराष्ट्रात कुस्तीतील त्रिमूर्ती म्हणून ओळखले जात ते म्हणजे विठोबा रामजी ऊर्फ तात्यासाहेब थोरात, वस्ताद दामोदरपंत भुजबळ आणि वस्ताद भागुजीबुवा नांगरे. शिवाजी रस्त्यावर असलेली शेकचंद नाईक तालीम ही अगदी अलीकडे म्हणजे १९००मध्ये सुरू झाली. दानशूर शेकचंद नाईक यांनी ही तालीम बांधून दिली. त्यांना मोलाची साथ दिली ती बाळाभाऊ घाणेकर आणि सावळारामबापू यांनी वस्ताद म्हणूनही काम केले. अनेक नामवंत मल्ल तयार केले, शंकरराव तारू-भालचंद्र क्षीरसागर यांच्या काळातही अनेक मल्लांनी या तालमीचे नाव पुढे नेले. स्वातंत्र्यपूर्व काळात या तालमीने भरवलेला ‘जयजवान मेला’ त्या काळात फार गाजला होता. पुढे वस्ताद कारळे आणि शहाजीराव चव्हाण हेदेखील तालमीचे वस्ताद होेते. त्यांच्याच काळात तालमीचे नूतनीकरण झाले. पूर्वी पेशव्यांच्या काळात शनवारवाड्यासमोर कांदाबटाट्याचा बाजार भरत होता. शेजारी असलेल्या छोट्या मारुतीलादेखील त्यामुळेच ‘बटाट्या मारुती’ असे नाव पडले. तेथील हसबनीस बखळीमध्ये १५-२० दिवसांनी कुस्त्या होत. या मैदानात डोंगरे नावाचे पैलवान कुस्त्या करीत. त्यांची देहयष्टी अशी डोंगराएवढी होती. त्यातूनच त्यांना डोंगरे वस्ताद हे नाव पडले. १८५९मध्ये सुभेदार नावाचे गृहस्थ यांना कुस्तीचा शौक होता. त्यांनी स्वत:ची जागा तालमीसाठी दिली आणि म्हणूनच तिचेच नाव सुभेदार तालीम झाले. डोंगरे आणि सुभेदार दोघेही वस्ताद अगदी सख्ख्या भावाप्रमाणे वागत, त्यांनी सुलेमान आंबेकर, थोरले गणू शिंंदे, कातारी असे अनेक नामवंत पैलवान तयार केले. १९१०मध्ये सुभेदार व डोंगरे या दोघांचे निधन झाल्यावर वस्ताद म्हणून दगडोबा भागुजी भिलारे यांनी जबाबदारी स्वीकारली. गणपतराव गांडले यांनी ७०व्या वर्षापर्यंत वस्ताद म्हणून काम केले. विश्वनाथ चौधरी, शहाजीराव चव्हाण अशी अनेक नामवंत वस्तादांची परंपरा या तालमीला लाभली आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात या तालमीने सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. १९४७-८४ या कालावधीत या तालमीतील मल्लांनी छोट्या मोठ्या अशा ४४० कुस्त्या केल्या होत्या. (क्रमश:)
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
......