- चंद्रमोहन कुलकर्णी
* ‘अक्षर’ध्यास कुठून सुरू झाला?अमुक का सुरू झालं असेल, मला तमुकच का वाटतंय वगैरे खणून काढायची माझी सवय आहे. माझ्या वडिलांना या सगळ्याचं फार वेड होतं. ते पोलिसात होते; पण मनानं खूप कोमल. उंच, मोठय़ा मिश्या असलेला, युनिफॉर्ममधला, रॉ असा तो सणसणीत व संवेदनशील मनुष्य. त्यांचं अक्षर खूप सुंदर होतं. ते त्याला थुंकी लावायचे व पसरवायचे. शीर्षरेघा नागमोडी द्यायचे. ते मला सायकलवरनं कुठं कुठं घेऊन जायचे तेव्हा म्हणायचे, बघ किती चांगलं अक्षर आहे. बघत राहायची ती खोड लागलीच मग. इतकी की आई म्हणायची, अरे नीट चाल रस्त्यानं ! इमेजेसचे लहानपणापासून असे परिणाम झाले की, अक्षराभोवती, त्याच्या चित्नकारीभवती मी वेढला गेलो. कवटाळलं मला यानं. अक्षरं नि चित्नकला हे वेगवेगळे भाग असतील असं मला वाटत नव्हतं. रस्त्यावरचे ऑइलपेंटचे छोटे-मोठे बोर्ड करणार्या पेंटर्स नि कारागिरांकडे मी आकर्षित झालो. तासन्तास, शाळा बुडवून मी तिथं बघत बसायचो. सुरुवातीचे शिक्षक हेच असतात. त्यातून हे वेड इतकं खोल गेलं की कुठला बोर्ड कुठल्या पेंटरने केलाय हे अक्षराच्या वळणावरून मी ओळखू शकायचो. नशाच ती !* आपल्या देशात नसता, देवनागरी वळणाशी निगडित नसता, वेगळ्याच देशांमध्ये असता तर?उलट युरोप आणि बाकीकडे या सगळ्याचं आणखी वेगळं कल्चर आहे. मी जेव्हा इंग्लंड, अमेरिकेला गेलो तेव्हा अक्षरांचं अधिक वेड लागलं. चर्चेस, विविध संस्था, वाचनालयं यांची रोमन, लॅटिन, गॉथिक, सान्स सेरिफ अशा रूपातली अक्षरं आसुसून पाहिली. पुढे आर्ट स्कूलमध्ये याच्या आणखी खोलात गेलो. रेघ तुमच्या मनात असते. ती आयुष्यभर सांभाळून ठेवायची, वाढवायची, हातात, मनात, ब्रशमध्ये, जळीस्थळी, काष्ठी पाषाणी. तीच चित्नकाराची इस्टेट. त्यामुळं तीच बघत, शोधत महाराष्ट्रातली व बाहेरचीही लहान-मोठी गावंशहरं धुंडत गेलो नि खजिना सापडत गेला. * खजिना?सावंतवाडीला ‘र्शीकृष्ण भवन हॉटेला’त मिसळ खायला गेलो तेव्हा तिथलं अक्षर बघून मी खरोखरीच चकित झालो! काचेच्या ओवलवर र्शीकृष्णाचं चित्न काढलेलं होतं नि लाकडात कोरल्यासारखी, लहान बाळासारखी कडेवर घ्यावी वाटावी अशी गोंडस अक्षरं होती. इतकं मन लावून लेटरिंग केलेल्या ठिकाणची मिसळ फक्कडच असणार होती.असाच अचानक उठतो नि प्रवासाला निघतो मी. स्टेशनवर कुठंतरी गाडी लावतो व रिक्षा करून सगळ्या गावात हिंडतो मनसोक्त. गावाचा चेहरा कळतो. नवी-जुनी दुकानं, पेठा, वाडेवस्त्या नि तिथली माणसं भेटतात. बेळगावला ‘विजय निवास’चा फोटो काढताना घरातील गृहस्थ तिथे उभे होते. म्हणाले, फोटो काढा; पण घरी या माझ्या ! त्यांच्या वडिलांचं ते सुंदर घर; पण पुन्हा तिथले प्रश्न वेगळे. बेळगावला हिंडत असताना ‘शंभू आप्पाजी अँण्ड सन्स, फोटो आर्टिस्ट’ असं मन लावून केलेली ब्रिटिशकालीन इंग्रजीचा प्रभाव असणारी भारदस्त अक्षरं दिसली. नाव सहीसारखं व तिच्याखाली देतात तशी जबरी रेघ. अक्षरावरून मी कल्पना केली, टायसूट घालणारा, व्यवसायावर प्रेम करणारा वगैरे. लिहिलं तसं. त्यांच्या नातवाचा फोन आला की तुमचा आजोबांशी संबंध येण्याचं काही कारण नाही; पण वर्णन तंतोतंत केलंत तुम्ही. कसं काय? अक्षरामुळंच की ! हे असं सगळं व्यवसायाच्या प्रेमापोटी, कलेतील जाणकारीमुळे कशाकशातून आकाराला आलं असेल. नातू हेही म्हणाला की, आम्ही इतक्या बारकाव्यातून पाहिलंच नाही या नावाकडे. तुमचं वाचल्यावर ते स्वच्छ केलं, रंगिबंग लावला, नातेवाइकांना बोलावलं, गेट-टूगेदर केलं. तुमच्यामुळं त्यामागची गोष्ट लक्षात आली. - शोध घेत गेल्यावर अनपेक्षितपणे इतकं घडू शकतं ! पुण्यातल्या काही जुन्या भागांमध्ये, पेठांमध्ये निरनिराळ्या वाड्यांना नावं द्यायची पद्धत होती. या नावांना एक नाद आहे. उच्चाराचा. त्याला सुयोग्य वजनाचं नाव घडवलेलं असतं. लेखणी वळणाची अक्षरं दिसतात. ती पद्धत होती. प्रत्येक कलावंताची ढब वेगळी, आकार, उकार, त्यांची घराणी वेगळी. अक्षरांचा जगण्याशी संबंध असतो, तिथवर पोहोचताना गुंतायला होतं.* हे जुनं, पण आता जे दिसतं आजूबाजूला त्यानं अस्वस्थ आहात?नव्या गोष्टींचं मी स्वागत करतो; पण आताशा सगळीकडं मला सारखंच दिसतंय, मॅक्डोनल्डच्या पित्झासारखं. कॉम्प्युटरमुळं ‘रेडी टू यूझ’ तंत्न नि फॉण्ट्स. रूक्ष नि सपाट झाल्यासारखं वाटतं. पुन्हा उदाहरण देतो, एका वाचकानं मला देवगडच्या बाजारपेठेतल्या एका घराचा फोटो पाठवला. ‘लताकुंज’ हे नाव म्हणजे लेटरिंगचा अक्षरश: नमुना होता ! काही अक्षरं गोलाकार नसतात. तिथं तिरक्या आडव्या रेघांनी जणू वेल असावी अशी अक्षरं सिमेंटमध्ये घडवली होती. एखाद्या माणसाची उपस्थिती असण्याला महत्त्व असतं तसंच अनुपस्थितीलाही. त्या चालीत ‘मला इथं गोलाकार घ्यायचा नाही’ हा निर्णय घेऊन अक्षर घडवण्याचं कौतुक वाटलं मला. कलाकार विशिष्ट पद्धतीने शिकला असेल तर तो असे जाणीवपूर्वक निर्णय घेतो; पण तसं नाही. ‘कळणारी’ माणसं निर्णय घेतात.तशीच गोष्ट रंगूबाईंचीही. सोन्या-चांदी-हिर्यांची तज्ज्ञ असणारी, व्यापार्यांना सल्ला देणारी ही बाई ‘रंगूबाई पॅलेस’ असं नाव देते घराला नि ग्रीलभर स्वत:च्या चेहर्याचं कास्टिंग करून घेते ! स्वत:चा आब नि राजसीपणा दुसरा काय असतो?कोल्हापुरातल्या भवानी मंडपातलं ब्रिटिशकालीन भव्य नि देवनागरी आकड्यांचं घड्याळ कुठं आहे दुसरीकडे? रडू कोसळतं हे पाहून मला. आपल्याकडे लोक रूक्ष नाहीत; पण माध्यमांचा स्वस्त, सरधोपट आणि भोंगळ वापर करण्यानं त्नास होतो. देवनागरीचं जुनं प्रासादिक वळण नि एकूणच अक्षरांचा थाट, डौल, सांगणं हे जे मी ऐकतो, त्यातून समृद्ध होतो, ते शेअर करावंसं वाटलं म्हणून हे पुस्तक लिहिलं. माझी जाण तयार होते, ती मी पास ऑन करतो. अशी ‘अक्षरं’ आपलं मोठं संचित आहे. कुणी विद्वान अभ्यासकांनी संस्कृती, तिची बिंब-प्रतिबिंब, अक्षरांसाठी जन्म वेचणारी माणसं, त्यांचं ज्ञान. याचा गंभीर अभ्यास करायला हवाय. मी माणसांचा करतो अभ्यास. ज्यांना त्यांच्यात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक.(मुलाखत आणि शब्दांकन : सोनाली नवांगुळ)