वटवृक्षाला पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:00 AM2020-10-04T06:00:00+5:302020-10-04T06:00:06+5:30

अनेक वर्षे वादळ वार्‍यात उभ्या असलेल्या, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झालेल्या; पण अचानक कोसळून पडलेल्या वटवृक्षाला लोकांनीच नवसंजीवनी दिली, त्याची गोष्ट..

Revival of the old banyan tree by the people of Goa | वटवृक्षाला पुनरुज्जीवन

वटवृक्षाला पुनरुज्जीवन

Next
ठळक मुद्देहरमलच्या सागरकिनार्‍यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर गिरकर वाड्यावरचा हा वटवृक्ष भाषा, संस्कृती परिचयाने भिन्न असलेल्या जगाच्या विभिन्न प्रदेशांतून आलेल्या पर्यटकांना एकात्मतेच्या अनुबंधात बांधण्यास कारणीभूत ठरला होता.

- राजेंद्र पां. केरकर

भारतीय संस्कृतीने वटवृक्षाला पवित्र मानल्याचा वारसा सिंधू संस्कृतीतल्या उत्खननात सापडलेल्या संचितांद्वारे प्रकाशात आलेला आहे. शतकोत्तर आयुर्र्मयादा लाभल्याने त्याला अक्षयवट म्हटले जाते. संस्कृतात खाली खाली वाढणार्‍या आणि आडव्या फांद्यांपासून पारंब्या फुटून त्या जमिनीत शिरून, वृक्षाचा विस्तार करत असल्याने त्याला ‘न्यग्रोध’ म्हटलेले आहे. 
फेसाळणार्‍या निळ्याशार लाटा आणि रुपेरी सागरकिनार्‍यांसाठी ख्यात असलेल्या गोव्यात शेकडो वर्षांची परंपरा मिरवणारे वड, पिंपळ, गोरखचिंच यांसारख्या वृक्षांचे वैभव पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे पर्यटकांचा स्वर्ग म्हणून लौकिक असलेल्या गोव्याचा हरित वारसा अनुभवायला मिळतो. 
उत्तर गोव्यातला महाराष्ट्राशी सीमा भिडलेला पेडणेतला हरमल गाव सागरी पर्यटनामुळे जागतिक नकाशावर पोहोचलेला आहे. देश-विदेशातून येणार्‍या पर्यटकांना सागरकिनार्‍याबरोबर इथल्या वटवृक्षांचीही भुरळ पडलेली आहे. 
असाच जवळपास नव्वदी ओलांडलेला वटवृक्ष हरमलातल्या गिरकर वाड्यावर ऊन-पावसात पर्यटकांना शीतल छाया आणि मातृवत्सल मायेचे छत्र देत उभा होता.
हरमलच्या सागरकिनार्‍यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर गिरकर वाड्यावरचा हा वटवृक्ष भाषा, संस्कृती परिचयाने भिन्न असलेल्या जगाच्या विभिन्न प्रदेशांतून आलेल्या पर्यटकांना एकात्मतेच्या अनुबंधात बांधण्यास कारणीभूत ठरला होता. 
त्यांच्या सुख-दु:खाच्या क्षणांचा तो साक्षीदार होता. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीचादेखील तो त्यांचा योग, ध्यानधारणा, नृत्याच्या पदन्यासासाठी आधारवड ठरला होता. जगाच्या पाठीवरून आलेल्या पर्यटकांचा तो प्रेरणास्रोत ठरला होता. परंतु 5 ऑगस्ट 2020 रोजी धुवाधार पर्जन्यवृष्टी आणि वादळी वार्‍याच्या तडाख्यात हा वृक्ष उन्मळून पडला. त्याच्याशी ऋणानुबंध जुळलेले नखशिखांत हादरून गेले होते. आपला एखादा जिवाभावाचा दोस्त इहलोकीच्या यात्रेला गेल्यासारखी वेदना त्यांना झाली होती. 
नैराश्याने ग्रासलेले असताना त्यांच्या मनातला आशादीप प्रकाशित झाला. उन्मळून कोसळलेल्या, पारंब्या तुटून पडलेल्या या वृक्षाला पुन्हा उभे करण्याचे स्वप्न त्यांनी मनी घेतले. 
फिनलॅँड देशातील सांतेरी साहको यांनी उन्मळून पडलेल्या वटवृक्षाची जमिनीत रुतून असलेली काही पाळेमुळे पाहिली आणि त्यांच्या मनात वृक्षाला नवसंजीवनी देण्याच्या इच्छेने घर केले. त्यांनी आणि त्यांच्या समविचारी मंडळीने या वटवृक्षाला उभे करण्यासाठी आर्थिक साहाय्य ऑनलाइन मोहिमेद्वारे गोळा करण्यास प्रारंभ केला आणि हा हा म्हणता, या कार्यासाठी दोन लाखांचा निधी गोळा करण्यात यश आले.
वेळोवेळी उन्मळून पडलेल्या किंवा रस्ता अथवा अन्य प्रकल्पांसाठी वृक्ष तोडण्याऐवजी त्यांच्या पुनर्वसनास आणि पुनर्जन्म देण्यासाठी धडपडणार्‍या वट फाउण्डेशनचे उदय कृष्ण यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. 
वेगवेगळ्या अडचणींवर मात करून हा कोसळलेला वटवृक्ष उभा करण्याची बाब सोपी नव्हती. देश-विदेशांतून त्याचप्रमाणे गोव्यातून या सत्कार्याला आर्थिक मदत देण्यासाठी जसे हात पुढे सरसावले तसेच या वटवृक्षाला आपला संजीवक सखा समजणार्‍या सुहृदांनी कोरोना विषाणूच्या संकटकाळातही गिरकर वाड्यावर धाव घेतली. 
उन्मळून पडल्यामुळे, पारंब्यांना दोरखंडांनी बांधून आणि त्यांची सांगड जेसीबीशी घालून वटवृक्षाला मोठय़ा शिताफीने उभा केला. त्यात काही वजनदार फांद्या छाटाव्या लागल्या. परंतु असे असताना गोवा ग्रीन ब्रिगेडचे संयोजक आवेर्तिनो मिरांडा, लिव्हिंग हेरिटेजचे मार्क फ्रान्सिस अशा ध्येयवेड्यांनी अशक्यप्राय समजली जाणारी बाब वटवृक्षाला नवी उभारी देऊन शक्य करून दाखवली. 
वृक्षाला उभा करण्यासाठी खड्डे खणण्यापासून ते त्याला पुन्हा सशक्तपणे उभा करण्यात ध्येयवेडे यशस्वी ठरले. जमवलेल्या दोन लाख रुपयांच्या निधीतले जे पैसे शिल्लक  राहिले त्यातून वर्तमान आणि आगामी काळात या वृक्षाची देखभाल व्हावी आणि वटवृक्षाची स्मृती लोकमानसात कायम राहावी म्हणून त्याच्या नव्या रोपांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. 
गोव्यात उन्मळून पडलेल्या एका महाकाय वटवृक्षाला नवी उभारी, नवे जीवन देण्याची ही अद्वितीय घटना सामूहिक आणि नियोजनबद्ध प्रयत्नांनी सफल झाली.
आज विकासकामांच्या नावाखाली निर्दयीपणे वृक्ष तोडले जातात, त्या कालखंडात एका वयोवृद्ध वटवृक्षाला नवसंजीवनी देण्याचे हरमलच्या पवित्र भूमीतले हे प्रयत्न प्रेरणादायी असेच आहेत.

rajendrakerkar15@gmail.com
(लेखक पर्यावरण कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Revival of the old banyan tree by the people of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.