है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं की गालिब का है अंदाज-ऐ-बयाँ और..’’
ही प्रसिद्ध ओळ उर्दू शायरीचे चाहते वाचतात तेव्हा गालिब कळतो, अंदाज-ऐ-बयाँचा अंदाजही आलेला असतो. पण, सुखनवर या शब्दावर येऊन गाडी अडकते अन् मग काही केल्या या ओळींचा अर्थच गवसत नाही. या शब्दाला वगळून अर्थ काढतो म्हटले तर ही शायरीच प्राणहीन होते. कारण, शायरीचा जन्मदाताच सुखनवर आहे. सुखन म्हणजे शायरी आणि सुखनवर म्हणजे शायर. उर्दूच्या अनेक नामवंत शायरांनी स्वत:ला म्हणजे सुखनवरला वाचकांपुढे कसे मांडले ते बघूयात. सुरुवात अल्फाजच्या या शेरपासून..
तेरे दामन ने सारे शहर को सैलाब से रोका
नही तो मेरे ये आसू समंदर हो गये होते
तुम्हे अहले सियासत ने कही का भी नही रखा
हमारे साथ रहते तो सुखनवर हो गये होते
काय जबरदस्त तुलना आहे बघा. कधीकाळी वैभवशाली राज्याचा प्रतीक असलेल्या तुला याच वैभवाने थेट वैराग्य पत्करण्याच्या स्थितीला आणून सोडले आहे. या वैभवाच्या नादी न लागता तू जर आमची सोबत केली असती तर तू शायर झाला असतास अन् शायराच्या महालातील शब्दांच्या श्रीमंतीला कधीच ओहटी लागत नाही. ही झाली सुखनवरची एक ओळख. पण, मुसाहिब नावाचा शायर वेगळंच सांगतोय. तो काय म्हणतो पाहा..
गुल गुलशन में इस कदर खो गये हैं..
खबर इतनी मिली की बेखबर हो गये है..
क्या पाया क्या खोया खबर कुछ नहीं है..
दूर होकर बस तुमसे सुखनवर हो गये है..
म्हणजे, प्रेमात लोकं कवी होतात असे म्हणतात ते काही खोटे नाही. सुखनवर होण्यासाठीचे निकषच प्रेम आहे, असा या शायरीचा अन्वयार्थ. ती दोन क्षणांसाठी विलग झाली अन् तिच्या विरहाच्या अग्नीने याच्या मनात शायरीची ज्योत प्रज्वलित झाली. असे घडतात सुखनवर. पण, सुखनवरचे विश्व असे इश्क आणि हुस्नपुरते मर्यादित राहू नये. बदलत्या काळासोबत त्याने आपला अंदाज-ऐ-बयाँही बदलला पाहिजे, असा विचार करणारेही काही शायर आहेत. मिथिलेश वामनकर त्यातलाच एक.
दौर बदला है, बदल जा, ऐ सुखनवर साथ चल
सोचता है जिस जबां में, उस जबां में लिख गजल
खुद सुखन पैदा करेगी अपना इल्मे-फलसफा
तज्रिबा अपना सुना बस, छोड़ औरों की नकल
मिथिलेशच्या या ओळी अनुभवातून समृद्ध झाल्या आहेत. शायरने काळानुसार बदलले नाही तर काय घडते हीच भावना प्रमिला कशी मांडते बघा..
यही सुखनवर की है कहानी अश्क हैं उसकी आँखों में
हँसकर सारी महफिल चल दी उसका हाल नहीं पूछा.
- शफी पठाण
(लेखक ख्यातनाम शायर आणि ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे
वरिष्ठ उपसंपादक आहेत)