- सुरेश भटेवरा
आपल्या पन्नास वर्षाच्या संन्यस्त जीवनात मधुस्मिताजींनी मातोश्री माताजी म.सा. व ज्येष्ठ साध्वी प्रितीसुधाजींच्या जोडीने सारा भारत पायी पालथा घातला. विलक्षण मधुर आवाजातल्या त्यांच्या स्तवनांनी प्रत्येक ठिकाणी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 1994 सालच्या चातुर्मासात साध्वी प्रितीसुधाजी, मधुस्मिताजी यांना नागपुरात निमंत्रित करण्यात आले होते. विजय दर्डा-ज्योत्स्ना दर्डा यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला हा ‘चातुर्मास’ अनेक संदर्भात संस्मरणीय ठरला. ‘जीवन जगण्याची कला’ शिकवणारी साध्वी प्रितीसुधाजी आणि मधुस्मिताजींची प्रवचने र्शवण करण्यासाठी सर्व वयाचे, सर्व धर्माचे वीस हजारांहून अधिक लोक रोज ‘संस्कार यज्ञ’ मंडपात येत असत. ‘माणूस माणसाला शोधायला निघाला आहे, पण तो स्वत:लाच का सापडत नाही?’ या प्रश्नाची उकल करणारी ही प्रवचने विलक्षण होती. साध्वी मधुस्मिताजींकडून जीवन जगण्याचा हा महामंत्र घेण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव 14 ऑगस्ट 94 रोजी नागपुरात आले होते. साध्वीजींशी त्यांनी तब्बल 3 तास संवाद साधला आणि लगेच दिल्लीला रवाना झाले. या चातुर्मासात आणखी एका क्रांतीकारी परिवर्तनाचा पाया घातला गेला. जैन समाजातील विविध संप्रदायांच्या भिंती दूर सारून विजय दर्डा यांनी साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. आणि साध्वी मधुस्मिताजी म.सा. यांच्या उपस्थितीत ‘सकल जैन समाज’ या नव्या व्यासपीठाची स्थापना केली. त्यानंतर संपूर्ण भारतभरात, गावागावात ‘सकल जैन समाजा’ची स्थापना झाली.जैन समाजातील पूर्वापार परंपरांप्रमाणे साध्वींची तपसाधना अधिक असली, तरी साध्वींचे आसन नेहमीच साधूंच्या आसनापेक्षा खाली असे. नागपूरला झालेल्या या चातुर्मासात प्रथमच आचार्यर्शी राजयश सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत ही परंपरा मोडण्यात आली आणि साध्वींना समान स्तरावरचे आसन प्रदान करण्यात आले. या क्रांतीकारी प्रसंगाच्या साक्षीसाठी व्यासपीठावर अन्य संप्रदायांचे साधू आणि साध्वीही उपस्थित होत्या. प्रितीसुधाजी, मधुस्मिताजी व त्यांच्या सहकारी साध्वींनी कधी स्वतंत्रपणे तर कधी एकत्र असे अनेक संस्मरणीय चातुर्मास प्रतिवर्षी भारतातल्या विविध शहरात संपन्न केले. चिरंतन लक्षात रहावा असा आजही त्यांचा प्रभाव आहे. मधुस्मिताजींच्या प्रेरणेने लासलगाव, पनवेल, खरगपूर सारख्या गावात, चातुर्मासातच निधी उभारला गेला व जुन्या जैन स्थानकांचा जिर्णोध्दार घडला. मधुस्मिताजींचा जीवनक्रम विलक्षण घटनांनी भरलेला आहे. 50 वर्षांच्या प्रवासात, काही कटू तर अनेक गोड अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. जैन श्रमण संघात क्रांतीकारी धाडस दाखवण्याचे श्रेय त्यांना व जयस्मिताजींना द्यावेच लागेल. मधुस्मिताजींचे वास्तव्य सध्या नाशिकजवळ लाम रोड देवळाली परिसरातील कान्ह नगरात आहे. कोरोना महासाथीच्या काळात जनतेला धीराचे बोल ऐकवतांना मधुस्मिताजी म्हणतात : ‘पृथ्वीवरचे जीवन, नैसर्गिक संकटे अन् महासाथीचे नियंत्रण करण्यास निसर्ग सर्मथ आहे. निसर्गाशी वैर करू नका, त्याच्यासोबत रहा’. तीस वर्षांपूर्वी म्हणजे 1990 व 91 साली विख्यात जैन धर्मोपदेशक आचार्य सुशिलमुनी यांच्या मार्गदर्शनानुसार मधुस्मिताजी व जयस्मिताजी यांनी स्थानकवासी जैनांच्या परंपरागत चाकोरीचा चक्रव्युह भेदला. परदेशातल्या भक्तांच्या निमंत्रणानुसार थेट अमेरिका गाठली. श्रमण संघाच्या परंपरेनुसार साधू साध्वींनी नदी अथवा समुद्र ओलांडायचा नसतो. या दोन साध्वींनी तर थेट विमान प्रवास करीत सात समुद्रच ओलांडले. साहजिकच जैन श्रमण संघ व त्यांच्या कट्टरपंथी अनुयायांमधे बरीच खळबळ उडाली. भारतभर तमाम जैन स्थानकांमधे या दोन साध्वींना प्रवेश नाकारण्यात आला. दीक्षा घेउन वैराग्य पत्करलेल्या साध्वींना जणू बहिष्कृतच करण्यात आले. त्यांचा गुन्हा इतकाच की परदेशात जाण्यासाठी त्यांनी विमानाव्दारे समुद्र ओलांडला. बहिष्काराच्या काळातही साध्वींनी धीर सोडला नाही. पहिल्या परदेश प्रवासानंतर सलग दुसर्या वर्षीही साध्वीजींना पुन्हा अमेरिकेत येण्यासाठी भक्तांचे निमंत्रण होतेच. विरोधाची पर्वा न करता दोघी साध्वीचा परदेश प्रवास ठरला. नाशिक शहरातून एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सुधारणावादी जैनच नव्हे तर विविध धर्माचे लोक त्यात मोठया संख्येने सहभागी झाले. मुंबईच्या दिशेने निघतांना, प्रतिकात्मक शोभायात्रेव्दारे पायी विहार करीत दोन्ही साध्वींनी सर्वप्रथम कविवर्य कुसुमाग्रजांचे निवासस्थान गाठले. यानंतर तुडुंब गर्दीने भरलेल्या नाशिकच्या कालिदास कलामंदिरात दोन्ही साध्वींचा भव्य निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात साध्वीजींच्या अतुलनीय धाडसाचे सर्मथन करणारी मान्यवरांची भाषणे झाली. भारतात प्रथमच कट्टरपंथीयांच्या डोळयांत अंजन घालणारा हा सोहळा होता. जैन धर्मात सुधारणावादी चळवळीचा पहिलाच प्रयोग या निमित्ताने संपन्न झाला. मधुस्मिताजी व जयस्मिताजी या क्रांतीच्या अग्रदूत ठरल्या.बहुतांश जैन धर्मीयांमधे खरं तर विलक्षण व्यवहार चातुर्य आहे. बदलत्या काळानुसार कौशल्य संपादन करण्याचे अलौकीक कसब आहे. शिक्षण, व्यापार व उद्योग क्षेत्रात प्रगतीची अनेक शिखरे सर्वांनी काबीज केली आहेत. लक्षावधी लोकांना रोजगारही मिळवून दिलेत. धार्मिक व्यवहारांमधे मात्र साधू-साध्वींनी अतिरेकी त्यागाचा उच्चांक गाठायलाच हवा, अशी त्यांची अपेक्षा असते. जुन्या रूढी व परंपरांचे पालन करीत बहुतांश जैन बांधव त्यामुळे कर्मठच राहिले आहेत.जैन धर्माच्या दैनंदिन व्यवहारात काही किरकोळ स्वरूपाचे बदल झाले मात्र सुधारणावादी चळवळी झाल्या नाहीत, हे वास्तव आहे. जैनांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर आणि बौध्द धर्माचे भगवान बुध्द तसे शतकभरातले समकालिन. दोघेही क्रांतीकारी. दोघांची कर्मभूमी बिहार. प्रवासात भ. महावीरांनी गंडक नदी अनेकदा ओलांडल्याचे दाखले आहेत. (भ. महावीरांबाबतचा हा उल्लेख कर्मठ जैन o्रावकांना साधू साध्वींबाबत मात्र मान्य नाही.) महावीरांच्या कालखंडानंतर 75 वर्षांनी बुध्दांचा कालखंड सुरू झाला. बौध्द धर्माचा प्रसार जगातल्या अनेक देशांमधे झाला. जैन धर्म मात्र भारताच्या सीमांमधेच अडकून राहिला.परंपरेने चालत आलेल्या तत्वज्ञानानुसार, स्थानकवासी o्रमण संघातील साधु साध्वींना, आजही अनेक कडक नियमांचे पालन करावे लागते. आहाराचे सात्विक अन्न घरोघरी जाउन गोळा करायचे. विहार करतांना, वाहनांचा वापर अजिबात न करता सारा प्रवास पायीच करायचा. प्रवचनांसाठी लाउडस्पीकर्सचा वापर निषिध्द, नदी अथवा समुद्र ओलांडायचा नाही. संन्यस्त जीवनाच्या नियमांची यादी तशी बरीच लांबलचक आहे. बदलत्या काळातल्या गरजांनुसार अनेक व्यवहार्य अडचणी आहेत. त्यागाच्या अतिरेकाचे हे कठोर नियम त्यासाठी खरे तर शिथील करायला हवेत, मात्र तसा विचार होतांना दिसत नाही. परदेशात अनेक जैन बांधव रहातात. त्यांच्यापर्यंत जैन तत्वज्ञान जावे, यासाठी मधुस्मिताजींनी परिवर्तनाची पहाट उजळून दाखवली. यापुढे तरूण साधू-साध्वींनी या धाडसाची पुनरावृत्ती केली तर मधुस्मिताजींच्या त्यांना हार्दिक शुभेच्छाच आहेत.
suresh.bhatewara@gmail.com(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)