विज्ञानाचं मीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 06:26 PM2018-01-06T18:26:37+5:302018-01-07T12:44:49+5:30
आजवर अनेक चढउतार पाहिले. या देशात विज्ञानाने मोठा टप्पा गाठला जरूर; पण अजून आपलं ‘मागासलेपण’ सरलं नाही. काहीकाही बाबतीत निराशा वाटते; पण प्रसन्न उमेद वाटावी आणि वाढावी, असं पुष्कळ काही घडतं आहे... मी त्या उमेदीचा माग घेत असतो.
- डॉ. जयंत नारळीकर
अधिक-उणे आयुष्य ‘पाहिलेले’ मान्यवर जेव्हा हिशेब मांडतात...
चांगलं पंचपक्वान्न असलेलं जेवण आपल्यासमोर आहे. उत्तम वातावरण आहे. भूकही आहे; पण ख-या अर्थानं जेवणाचा आनंद तेव्हाच येईल जेव्हा त्या जेवणात योग्य प्रमाणात मीठ असेल! हे उदाहरण मला फार महत्त्वाचं वाटतं. जीवनाला चव आणणारं मीठ म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन!
आज आपल्या देशाला खरी गरज आहे ती याची.
...आपलं अवघं जीवनविश्व हे विज्ञान-तंत्रज्ञानानं व्यापलेलं आहे. त्यामुळे त्याला वगळून कसं चालेल? वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर बाकी सारं असूनही व्यर्थ!
आजवरच्या माझ्या संशोधनाच्या वाटचालीमध्ये मी अनेक चढउतार पाहिले. देशानं आज जी प्रगती केलेली आहे त्याविषयी माझ्या मनात नितांत समाधान, आदर, सन्मान आणि अभिमानही आहे. येणाºया काळात आपण अशाच पद्धतीनं आणखी यशशिखरं सर्व क्षेत्रांत पादाक्रांत करत जाऊ याचाही मला पूर्णत: विश्वास आहे. आजूबाजूला घडत असलेल्या प्रगतीचा, विस्तार-विकासाचा, नव्या संधींचा आणि आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत असताना चांगल्या, सकारात्मक ‘अधिक’ गोष्टींचे पारडेच जड भरते.
उत्तम क्षमता असणारी तरुणाई, प्रगतीची दिशा, नवे बदल या साºया गोष्टी अतिशय आश्वासक आणि सकारात्मक वाटतात. येणारा काळ उज्ज्वलच असेल याची ग्वाही देतात...
अर्थात त्याचबरोबर आत्मसंतुष्टता उपयोगी नाही. कारण त्याने माणूस तिथंच थांबतो. नेहमी काळाच्या पुढं पाहायला व त्यादिशेनं पावलं टाकायला शिकायला हवं, तेव्हाच खºया अर्थानं आपण प्रगती करू शकू. जग हे विज्ञानानं व्यापलेलं आहे. आजच्या प्रगतीचं समाधान आहे; परंतु आजच्यापेक्षा प्रगतीचा वेग अधिक हवा, असं मात्र नि:संशयपणे वाटतं.
मला लख्ख आठवतंय.. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सोबतच इतरही काही देश स्वतंत्र झाले. पंडित नेहरूंसारख्या विज्ञानप्रेमी व्यक्तिमत्त्वाच्या हाती देशाची सूत्रं एकवटलेली होती. त्यांनी विज्ञानाच्या संशोधनासाठी आणि प्रगतीसाठी मुक्तपणे संधी दिली. विज्ञानाला प्रतिष्ठा मिळाली आणि तेव्हाच्या शास्त्रज्ञांनी मनापासून अथक संशोधन करून देशाला प्रगतिपथावर नेलं. त्यातुलनेत आपल्याच आजूबाजूचे शेजारी देश पाहिले तर तेदेखील स्वातंत्र्याचे समकालीन भागीदार असताना त्यांनी अपेक्षित प्रगती केल्याचं दिसत नाही. याचं मुख्य कारण त्यांनी तेव्हा विज्ञानाला आपल्याइतकं महत्त्व दिलं नाही. या शेजारी देशांच्या वर्तमान कुचंबणेचं हे एक ठळक कारण आहे.
मात्र आत्मसंतुष्टता धोकादायक. तिथेच थांबून अथवा तेवढ्यावर खूश होऊन चालत नाही. प्रगतीचा, नावीन्याचा ध्यास असेल तरच आपण पुढे जात राहतो. शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत आपली वैज्ञानिक व तंत्रज्ञानातील प्रगती समाधानकारक असली तरीही बदलत्या कालमानाप्रमाणे अधिक महत्त्वाकांक्षा बाळगणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जगातील इतर प्रगत देशांशी आपण स्वत:ची तुलना करायला हवी आणि यापुढील काळातही विज्ञान हे केंद्रस्थानी असायला हवं.
आजमितीला देशातील संशोधन संस्थांची कामगिरी उत्तम आणि उल्लेखनीय आहे हे निर्विवाद. परंतु त्यांना राष्ट्रीय पातळीवर ज्या प्रमाणात संशोधन साह्य मिळायला हवं ते मिळत नाही. देशाच्या जीडीपीच्या तुलनेमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानातील गुंतवणूक किमान २ टक्के असायला हवी. भारतरत्न सीएनआर राव यांनी अनेक चर्चासत्रं, परिसंवादातून हे मत उघडपणे मांडलं आहे. माझ्यासारख्या अनेक शास्त्रज्ञांचं हेच मत आहे. राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान असताना विज्ञान सल्लागार समितीमध्ये मी सदस्य होतो. तेव्हा विज्ञान-तंत्रज्ञानातील गुंतवणूक किमान दोन टक्के असावी, असा आमचा आग्रह होता. राजीव गांधी यांनी या तरतुदीसाठी संमती दर्शवलीदेखील होती. परंतु त्यानंतर दुर्दैवाने तेच राहिले नाहीत. त्यानंतर मात्र एकाचे दोन टक्के होण्याऐवजी ही गुंतवणूक ०.८ टक्क्यांवर खाली आली आणि अजूनही त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. विज्ञानाबद्दल जी एक सार्वत्रिक आवड असायला हवी ती सर्व स्तरांवर दिसून येत नाही याची मला खंत वाटते. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचं महत्त्व आपण मान्य करतो. परंतु ज्या शक्तीचा आपल्यावर प्रभाव आहे त्याची माहिती मात्र आपण नीट करून घेत नाही.
मूलभूत विज्ञान हा तर विज्ञानाचा खरा पाया. ज्याप्रमाणे देशामध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आयआयटीचा विस्तार झाला त्याप्रमाणे आता नव्या दमाच्या तरुण शास्त्रज्ञांसाठी आयसरसारख्या संस्था ठिकठिकाणी उभ्या राहत आहेत हे चांगलं चिन्ह आहे. एनसीएल, आयुका यांसारख्या संस्थादेखील त्यांच्या माध्यमातून भरीव योगदान देत आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन अद्यापही समाजाच्या मनात घर करीत नाही, या जाणिवेनं मी नेहमीच विषण्ण होतो. आज स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षं लोटल्यावरही अंधविश्वास आणि विज्ञान यांच्यातली लढाई आपण संपवू शकलेलो नाही. हे चित्र बदलत नाही, तोवर आपलं सामाजिक मागासलेपण संपणार नाही. तरुण पिढीकडून मला आशा मात्र आहे.
देशाच्या प्रगतीचा दर आर्थिक प्रगतीच्या निकषांबरोबरच विज्ञानाच्या फूटपट्टीवरही मोजला गेला पाहिजे आणि त्या मोजमापाकडं आपलं अविरत लक्ष असलं पाहिजे.
विज्ञानाला सर्व स्तरांवर जेवढी प्रतिष्ठा लाभायला हवी तेवढी अद्याप आपल्या देशात लाभलेली नाही, याची खंत माझ्या मनात आहे. नोकरशाहीमधील अधिकाºयांना मिळणाºया पैशांच्या तुलनेत शास्त्रज्ञांचं वेतन पाहा. शास्त्रज्ञ हा त्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त प्रॉडक्टिव्ह आणि कल्पक असतो. नंतर त्याच्या कामात काहीसं शैथिल्य येत जातं.
देशातल्या तरुण शास्त्रज्ञांना त्यांच्या उमेदीच्या काळात अधिकाधिक प्रोत्साहन, आर्थिक फायदे असे सर्व प्रकारचे दिलासे देशपातळीवर मिळायला हवेत. नव्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे शास्त्रज्ञांमधील संवाद मात्र वाढताना दिसतो, याबद्दल मात्र मी समाधानी आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या सुविधा उपलब्ध झाल्याने शास्त्रज्ञ पूर्वीपेक्षा परस्परांच्या अधिक संपर्कात राहू लागले आहेत. अशा परस्पर-संवादातून या देशातल्या विज्ञानाचं भविष्य खुलून येईल.
काही काही बाबतीत निराशा वाटते, विषण्णपणही येतं; पण प्रसन्न उमेद वाटावी आणि वाढावी, असं पुष्कळ काही घडतं आहे. मी त्या उमेदीचा माग घेत असतो.
विज्ञान गणिताची गंमत
मुलांना कळू तर द्या !
डॉ. रघुनाथ माशेलकरांसारखे शास्त्रज्ञ संशोधन आणि पेटंट मिळवण्याच्या बाबतीत कायम आग्रही असतात; परंतु परदेशाच्या तुलनेत आपण त्याबाबतीत खूप मागे आहोत हे वास्तव मान्य करायलाच हवं. यासाठी शिक्षणपद्धतीत काही आमूलाग्र बदल आवश्यक वाटतात. विज्ञान तंत्रज्ञानाविषयी खरी आवड लहानपणापासून निर्माण होण्यासाठी या विषयातल्या मूलभूत संकल्पना नीट समजल्या आहेत की नाही हे तपासणारी, त्यासाठी प्रयत्न करणारी शिक्षणपद्धती आवश्यक आहे. केवळ घोकंपट्टी करून मुलं पास होतात. प्रयोग पाठ करतात. त्यानं खरी गोडी लागत नाही आणि मग गणित, विज्ञानातली गंमतच न कळल्यानं त्यांना ते विषय क्लिष्ट वाटू लागतात. गणित आणि विज्ञान हे विषय मुलांना रटाळ वाटू द्यायचे नसेल तर त्यातील मनोरंजक भाग मुलांना अनुभवता आला पाहिजे. त्यासाठी शाळांनी, शिक्षकांनी धडपडलं पाहिजे.
(लेखक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आहेत.)
शब्दांकन : पराग पोतदार