तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याल्याला सारसांचा जिल्हा अशी ओळख हळूहळू प्राप्त होत आहे. प्रेम आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन मोहीमेमुळे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात सारसांचे नंदनवन फुलत आहे. त्यामुळे सारस संवर्धनाच्या मोहीमेला चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले असून ती यशस्वी होत आहे. महाराष्ट्रातून नामशेष झालेल्या माळढोक पक्ष्यासारखेच सारस नामशेष होवू नये,यासाठी गोंदिया येथील सेवा संस्था आणि सारस मिंत्राची फौज प्रयत्न करीत आहे. सारसाचा माळढोक होऊ नये आणि सारसांचे नंदनवन फुलावे यासाठी यशस्वी प्रयत्न सुरु आहे.पशु पक्षी आणि मानव यांच्यात नेहमीच नाते राहिले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सुध्दा पशु पक्ष्यांचे फार महत्त्व आहे. पशु पक्ष्यांच्या हालचालीवरुन पाऊस आणि वातावरणातील बदलांचे अंदाज बांधले जातात. त्यामुळे पशु पक्ष्यांचे मानवी जीवनात महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. प्रत्येक पक्ष्याला एक वेगळी ओळख आहे. प्रेमाचे प्रतीक आणि वैभव समजला जाणारा सारस पक्षी हा फार दुर्मिळ समजला जातो. महाराष्ट्रात या पक्ष्यांची सख्या फार कमी असून ती सर्वाधिक गोंदिया जिल्ह्यात आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. मागील चौदा वर्षांपासून जिल्ह्यातील सेवा संस्था आणि सारस मित्रांची धडपड हे होय आहे. गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा असून तलावांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. येथील वातावरण सुध्दा सारस पक्ष्यांसाठी अनुकुल आहे. त्यामुळे या पक्ष्यांचा अधिवास धानाचे शेत, नदी, तलाव या परिसरात अधिक असतो. २००३-०४ मध्ये गोंदिया जिल्ह्यात केवळ ३ सारस पक्ष्यांची नोंद झाली होती. त्यानंतर सेवा संस्थेने प्रेमाचे प्रतीक आणि वैभव असलेल्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनाचा विडा उचलला. त्यामुळे हळूहळू सारसांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली. २०१३-१४ पासून सेवा संस्थेच्या सदस्यांनी सारसांचे अधिवास असलेल्या परिसराचा शोध घेवून त्यांची अंडी आणि त्यांचे संवर्धन करण्यास सुरूवात केली. सारस संवर्धनासाठी सुरू केलेल्या मोहीमेला आज चवळीचे स्वरुप प्राप्त झाले असून या चळवळीचे फलीत झाले आहे. सुरूवातीला ४ असलेली सारस पक्ष्यांची संख्या आज ४२ वर पोहचली आहे. तर लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सुध्दा ही चळवळ पोहचल्याने त्या ठिकाणी सुध्दा ५२ सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने सारसांचे नंदवन फुलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची ओळख तलावांच्या जिल्ह्या सोबतच सारसांचा जिल्हा म्हणून होवू लागली आहे.सेवा संस्था आणि सारस मित्र हे प्रेमाचे प्रतीक आणि वैभव जपण्यासाठी जीवपाड मेहनत घेत असून सारसाचे माळढोक होवू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेत आहे.त्यामुळे तलावांच्या जिल्ह्यात सारसांचे नंदनवन फुलत असून याची पर्यटकांना सुध्दा भूरळ पडत आहे. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला सुध्दा चालना मिळत असून रोजगाराच्या संधी सुध्दा निर्माण होत आहे. सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचे वैभव असून या पक्ष्यांचे संवर्धन करुन भविष्यात जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे हब तयार व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सांगितले.नांदती सारस ज्या शेतात ती शेती नेहमीच खुशहाल...सारस पक्षी आणि शेतकरी हे फार जवळचे मित्र आहे. सारस पक्ष्यांना जैवविविधतेचा मुख्य घटक मानले जाते. सारस पक्ष्यांमुळे तलाव आणि परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होत आहे.धानाच्या शेतीमध्ये सारस पक्ष्यांचा वावर अधिक असल्यास त्यांच्या वावरण्यामुळे धानाला पोषकत्त्व मिळते. त्यामुळे धानाच्या उत्पादनात सुध्दा वाढ होते. त्यामुळेच नांदती सारस ज्या शेतात ती शेती नेहमीच खुशहाल असे म्हटले जाते.प्रशासनाचे मिळेतय पाठबळजिल्ह्यातील सारस संवर्धनाचे महत्त्व ओळखत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांनी सारस संवर्धनासाठी पुढाकार घेतला.तसेच त्यांचे संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना मानधन देण्यास सुरूवात केली. सेवा संस्थेने शेतकऱ्यांना सारस मित्र करुन या पक्ष्यांचे संवर्धन केले. काळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी सारसांची प्रतिकृती उभारण्यात आली. सारस संवर्धनासाठी तेव्हापासूनच प्रशासनाचे पाठबळ मिळण्यास खºया अर्थाने तेव्हापासूनच सुरूवात झाली.
- अंकुश गुंडावार