- सुधीर लंके
लंडनहून आलेल्या एका व्यक्तीस सरकारने होम क्वॉरण्टाइन होण्याचा, म्हणजे घरी बसण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आदेश न पाळता ही व्यक्ती बिनधास्तपणे फिरत राहिली. त्यातून मुंबईतील एका ज्येष्ठ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली व त्यांचा बळी गेला. क्वॉरण्टाइनचा आदेश पाळला नाही तर काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. या डॉक्टरांचा बळी हा एकट्या कोरोनाने घेतलेला नाही. आपल्या लोकशाहीत जळीस्थळी मुरलेल्या बेशिस्त समाजवर्तनाचा व बिघडलेल्या नागरिकशास्त्राचाही ते बळी आहेत.कोरोना हा विषाणू भारतात जन्मलेला नाही. हा विषाणू परदेशातून आला. जे भारतीय परदेशात नोकरीसाठी, फिरण्यासाठी गेले होते त्यांनी तो आयात केला. त्यांनीही तो जाणीवपूर्वक आणला नाही. त्यांच्या नकळत त्यांना त्याचा संसर्ग झाला. परदेशात जाणारे बहुतांश लोक शिक्षित असतात. काही शिक्षित नसले तरी जगात काय चालले आहे याचे किमान ज्ञान त्यांना असते. मात्र, असे असतानाही यातील बहुतांश लोकांनी किमान काळजीही घेतली नाही. सगळे जग कोरोनाने भयभीत झालेले असताना व ‘एकमेकांपासून विलग व्हा’ असा टाहो फोडत असताना परदेशातून आलेली कनिका कपूरसारखी सेलिब्रिटी गायिका बिनधास्तपणे पार्टीत सहभागी झाली. एका विद्यापीठाच्या कुलगुरुंनी ते क्वॉरण्टाइन असताना बैठका घेतल्या. विदेशवारी करुन आलेल्या केरळमधील अनुपम मिर्शा या आयएएस अधिकार्याने ‘क्वॉरण्टाइन’ होण्याचा प्रशासनाचा सल्ला धुडकावला. दुबईहून आलेले सांगलीतील चौघे जण घरी जाऊन ‘क्वॉरण्टाइन’ न होता लोकांमध्ये मिसळले. घरी कार्यक्रम साजरा केला.त्यातून एकोणाविस जणांना कोरोनाची बाधा झाली. ठिकठिकाणी दाखविल्या गेलेल्या अशा बेफिकीर वृत्तीमुळे आज सगळा देश लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. यास प्रशासनही जबाबदार आहेच. यात सामान्य नागरिकांचा काहीही दोष नाही. मात्र त्यांची रोजीरोटी बंद होऊन रस्त्यावर पोलिसांचे दंडुके खाण्याची वेळ आज त्यांच्यावर ओढवली आहे. त्यांचे जनजीवन अडकून पडले आहे. सगळा देश लॉकडाऊन झाला म्हणून नगर जिल्ह्यातील आदिवासी भागातील विठ्ठल काठे हा मजूर शंभर किलोमीटरची पायपीट करुन घरी पोहोचला. रस्त्यात त्याला पाणीदेखील सहजासहजी मिळाले नाही. असे अनेक लोक शेकडो किलोमीटर चालताहेत. आंध्रमध्ये काम करणारे मूळ राजस्थानचे असणारे 53 मजूर या लॉकडाऊनमध्ये अडकून पडले. गावाकडे जायचे म्हणून पोलिसांचा डोळा चुकवून ते तीन जीपगाड्यांमधून निघाले. अक्षरश: एखादे बाचके कोंबावे तसे हे मजूर तीन जीपमध्ये बसले होते. त्यांना पोलिसांनी नगरमध्ये पकडले. घरी जाण्यासाठी मुंबईत रेल्वे स्थानकावर परप्रांतीय मजुरांनी केलेली गर्दी व त्यांचे भेदरलेले चेहरे माध्यमांनी दाखवले. बिहार, उत्तरप्रदेशचे कितीतरी लोक घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत आहेत. पुढे त्यांच्या रोजगाराचे काय होणार आहे याची काहीही शाश्वती नाही. कोरोना विषाणू जात, धर्म, गरिबी, र्शीमंती पाहत नाही. त्यामुळे आज सगळेच भेदरले आहेत. मंदीर, मशिद, चर्च ही सगळी प्राथर्नास्थळे बंद झाली. मोठमोठे उद्योगधंदे बंद झाले. पण, यात पुन्हा शोषणाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूसच दिसतो आहे. त्याच्याकडे ना मास्क, ना हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझरची बाटली. रस्त्यावरचा वडापाव देखील तो आज पोटात ढकलू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता घोषणा केली आणि दुकानाचे शटर खाली घ्यावे तितक्या जलदगतीने पुढील चार तासांत देश लॉकडाऊन झाला. बंद झाला. पण, त्या दरम्यान जे घराबाहेर होते त्यांचे काय? देशासाठी सामान्य माणसे हे हालही सहन करत आहेत. उपाशीपोटी निवारा मिळेल तेथे पडून आहेत. मात्र, तरीही इतरांमध्ये गांभीर्य यायला तयार नाही. क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला दिला होता अशा काही नागरिकांनी बारामतीत पोलिसांवरच हल्ला केला. इतर अनेक रिकामटेकडेही अकारण रस्त्यावर फिरताहेत. अनेक लोकांना कधी आपल्या गावांची आठवण येत नव्हती. असे अनेक लोक आता सुरक्षित ठिकाण म्हणून गावांकडे पळाले. त्यामुळे गावेही भेदरली आहेत. भारतात 18 जानेवारीपासून विमानतळावर कोरोनाबाबत आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी सुरु झाली. 23 मार्चपर्यंत 15 लाख प्रवासी भारतात आल्याची सरकारी आकडेवारी आहे. विदेशातून आलेल्या व त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांवर नजर ठेवा अशा केंद्र सरकारच्या सूचना आहेत. सामाजिक शिस्तीचे धडे पाळण्याची व नागरिकशास्त्राचे पालन करण्याची सवयच आपल्याकडे जडलेली नाही. भारतीय समाज र्शद्धा, अंधर्शद्धेपोटी कितीतरी बंधने काटेकोर पाळतो. खेडेगावात एखादा माणूस मृत झाल्यानंतर दहा दिवस सूतक पाळले जाते. त्या काळात लोक घराबाहेर पडत नाहीत. अनेक गावांत अजूनही लहान बाळ जन्मल्यानंतर सव्वा महिना त्याला इतरांच्या सहवासापासून दूर ठेवले जाते. यात र्शद्धा, अंधर्शद्धा, विज्ञान अशा अनेक बाबींचे मिर्शण आहे. हाच समाज आज देशासाठी घरात बसण्याचे बंधन का पाळत नाही? अनेकांना घरात बसणे बहुधा कमीपणाचे वाटत असेल. पण, हीच आज देशभक्ती आहे. रस्त्यावर फिरणे म्हणजे देशाला संकटात ढकलणे आहे. रस्त्यावर फिरणारे लोक उद्या कदाचित देशालाच रस्त्यावर आणतील. हे निर्लज्ज वर्तन थांबायला हवे.
विसंगती आणि वेदना1. एकीकडे विदेशातून आलेल्या व सरकारने होम क्वारंटाईनचा सल्ला दिलेल्यांची नावे गोपनीय ठेवली जात आहेत. 2. त्यांचे प्रतिमाहनन होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. ती घेतलीही पाहिजे. 3. मात्र, दुसरीकडे सामान्य माणसांच्या पाठीत पोलीस रट्टे टाकत असताना त्यांचे व्हिडीओ मात्र माध्यमे व सोशल मीडियावर झळकविण्यास मुभा आहे. 4. या माणसांची काहीही चूक नसताना त्यांचे सार्वजनिक प्रतिमाहनन सुरु आहे. ही विसंगती आणि यातील वेदना भयानक नाहीत का?
.. तर इतरांना का जमत नाही?
‘जनता कफ्यरूला प्रतिसाद देण्यासाठी घरात थांबा. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जे लोक झगडताहेत त्यांना सलाम करण्यासाठी घरातूनच टाळ्या-थाळ्या वाजवा’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देताना शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता घराच्या अंगणात उभा राहून एकटेपणाने शिस्तीत टाळ्या वाजवताना दिसला. त्यांच्या चेहर्यावर त्या दिवशी एकप्रकारची हतबलता व देशासाठी झगडण्याची वृत्तीही दिसत होती. हेच पवार सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत घराबाहेर न पडता घरात मुलीशी, नातीशी बुद्धिबळ खेळताना दिसले. एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेला ऐंशी वर्षाचा हा ज्येष्ठ नेता ही शिस्त पाळतो, तर इतरांना ते का जमत नाही?
sudhir.lanke@lokmat.com(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.)