दिलीप दोंदे लिखित ‘द फर्स्ट इंडियन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’. या पुस्तकातून त्यांच्या थरारक अनुभवांचा साक्षीदार होण्याची संधी वाचकांना लाभणार आहे. पुण्यात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या (दि.१९) जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता येथे होणार आहे. त्यानिमित्त दिलीप दोंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद...
सचिन कोरडे-
शिडाच्या बोटीतून एकट्याने जग पादाक्रांत केले. अशी पृथ्वी प्रदक्षिणा करणारे कमांडर म्हणजे दिलीप दोंदे. भारताच्या सागरी इतिहासात अशी कामगिरी करणारे ते एकमेवच. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘तारिणी’ या महिलांचा समावेश असलेल्या नौकावीरांगनांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. त्यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : ‘द फर्स्ट इंडियन’ या पुरस्काचा हा अनुवाद, मग तो मराठी वाचकांच्या हाती लवकर यावा, असे वाटले नाही का?दिलीप दोंदे : निश्चितच वाटले. मी तसा प्रयत्नही केला. परंतु, प्रकाशक मिळत नव्हते. तसेच मी चांगल्या भाषांतरकाराच्या शोधात होतो. अखेर मेहता पब्लिशिंग, पुणे आणि अनुवादक मुक्ता देशपांडे यांच्या संपर्कात आल्याने ते शक्य झाले. मराठीत हे पुस्तक येतेय, ही कल्पना मला खूप सुखकारक वाटत आहे. कारण, माझा आतापर्यंतचा प्रवास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. मी स्वत: बारावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतले आहे. नौदलात गेल्यानंतर थोडा मराठीपासूनचा संपर्क कमी झाला. त्यामुळे मला चांगल्या अनुवादकाची आवश्यकता भासत होती. पृथ्वी प्रदक्षिणा ही खूप आव्हानात्मक आणि साहसी आहे, याबद्दल काय सांगाल?- एखादा मनुष्य जेव्हा विनासाहाय्य एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघतो, तेव्हा त्या मोहिमेच्या नियोजनाची, तयारीची आणि प्रत्यक्ष कामांची धुरा उचलणाºया अनेकांच्या सहभागाशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्याशिवाय खलाशी समुद्रात जाऊच शकत नाही. त्यामुळे हे टीम वर्क आहे, असे मी मानतो. मी जेव्हा ‘सेलिंग अलोन अराउंड द वर्ल्ड’ हे पुस्तक वाचले, तेव्हा या पुस्तकाने मला कित्येक दिवस खिळवून ठेवले होते. समुद्रावर प्रेम करणाºयांसाठी आजही हे कथन खिळवून ठेवणारे आहे. यातून मला प्रेरणा मिळाली. मला समुद्राचे आणि त्याहूनही त्यावर डोलणाºया लहान बोटींचे नेहमीच आकर्षण वाटायचे. सर्वसाधारणपणे भारतीयांच्या मनात समुद्राविषयी विचित्र भीती असते. मी या भीतीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी प्रदक्षिणा एका भारतीयाने करावी यासाठी मी भारतात बरीच खटपट केली. जी गोष्ट साध्य करायची आहे, त्याबद्दल भीती बाळगून उपयोग नाही. मग आव्हानं कितीही मोठी असली तरी ती पेलता येतात. तुम्ही जगभ्रमंती केली. सागरी सुरक्षेबाबत तुम्हाला काय वाटतं?- आपण जसा विचार करतो तसे काहीच नाही. सागरी सुरक्षेबाबत प्रत्येक देश जागरूक आहेत. इतरांचे कशाला भारताबद्दल सांगायचे झाल्यास भारतीय तटरक्षक दल किती सक्षम आहे, याची प्रचिती आणि अनुभव आम्हाला बºयाचदा आलेला आहे. अत्याधुनिक यंत्र आणि यंत्रणा सध्या भारताकडे आहेत. मी माझी शिडाची बोट गोव्याच्या समुद्रात चालवत होतो. ती नवीन असल्याचे तटरक्षक दलाच्या लक्षात आले. काही मिनिटांत पेट्रोलिंग करणाºया टीमने आमच्याशी संपर्क साधला. सांगायचे एवढेच, भारतीय यंत्रणाही सक्षम आहे.‘तारिणी’नंतर समुद्र मोहीम चर्चेत आली. याबद्दल काय सांगणार?- ‘म्हादई’नंतर ‘तारिणी’ ही बोटही गोव्यातच बांधण्यात आली. या बोटीची चाचणी करण्यासाठी दोन महिलांना पाठविण्यात आले होते. ज्यांनी कधी समुद्रही पाहिला नव्हता त्या मुली ही बोट घेऊन गेल्या होत्या. मी नौदलातून निवृत्त झालो होतो. तरीसुद्धा या मोहिमेसाठी मी काम केले. तीनवेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने माझ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मी महिलांना ट्रेनिंग दिलं. सरकारचे सहकार्य आणि मदतीमुळे या महिलांना तारिणी मोहिमेवर पाठवता आलं आणि त्यानंतर त्यांनी इतिहास रचला.