सुरसुंदरी मनात भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:05 AM2020-04-26T10:05:56+5:302020-04-26T10:10:02+5:30
देवदर्शनासाठी देवळात जाणाऱ्यांनी समोरच्या देवावर मातेसमान विश्वास ठेवून दृढनिश्चयाने परमेश्वर भक्ती केली तरच इच्छापूर्ती होते - हेच या रूपवतीला सूचवायचे असते. कारण, देवसुद्धा भक्तवत्सलच असतो ना !
पद्मिनी
पद्महस्तेच नृत्याङी पट्टे पद्मंच पद्मिनी।
- म्हणजे, एका हातात कमलपुष्प घेऊन अन्य हाताने नृत्यमुद्रा साधून नृत्य करणारी यौवनिका होय. या रूपातील सुरसुंदरी रहिमाबाद (जि. औरंगाबाद) येथील प्राचीन मंदिरावर आहे.
गूढशब्दा
१ - हिचे देहरूप - अभयदा शिशुयुक्ता पद्मनेत्रा साउच्यते । - म्हणजे, एका हाताने अभयमुद्रा साकारून लहान मुलाला शेजारी घेणारी युवती होय - असे आढळते.
२ - पानगावच्या (जि. लातूर) विठ्ठल मंदिरावरील एका शिल्पात गूढशब्दा त्रिभंगात उभी असून, तिच्या डाव्या कमरेवरील स्तनपानोत्सुक बाळाने डावा हात तिच्या डाव्या स्तनावर ठेवला असून, ती उजव्या बाजूच्या उभ्या गोंडस बालकाच्या डाव्या हाताचे बोट पकडून कुठे तरी जाण्याच्या स्थितीत दिसते.
३ - उजव्या खांद्यावर गोल बुचड्यात केलेली आकर्षक केशरचना रुळविणारी ही धष्टपुष्ट अवयवाची मनमोहिनी अलंकृत असून, मदनज्वराने देहसौष्ठवाच्या तुलनेत तिची बारीक झालेली कंबर पाहून आपल्याला -
वाढे वयाच्यासह भार ज्यांचा
तो नित्य वाहून जणूं स्तनांचा ।
थकोनिया याकमलेक्षणेची
होईकटी ही कृश फार साची ।। - असे मनोमन वाटते.
तिच्या सिंहकटीमुळेच तिची मादकता अधिक आकर्षक झाली आहे. गूढ शब्दांच्या दोन सुंदर प्रतिमा खिद्रापूरच्या (जि. कोल्हापूर) कोपेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात.
चित्रिणी
१ - नृत्यांगना प्रकारातील कमनीय अंगकांतीची ही आकर्षक मदालसा असून, तिचे रूप -
कपाले वामहस्ताच नृत्यभावाच चित्रिणी । - म्हणजे, जी नर्तकी स्वत:चा डावा हात मस्तकावर ठेवून, उजवा हात खाली टोंगळा किंवा मांडीला स्पर्शून स्वत:च्या बेमालूम अंगिकाभिनयाकरणाने नृत्योपासकाच्या हृदयाचा ताबा न कळत घेते, अशी यौवना होय.
२ - मंदिर स्थापत्यातील इतर सुरसुंदरीबरोबर हिची ओळख तिच्या उपरोल्लेखित विशेष अंगविक्षेपावरूनच करायची असते.
पुत्रवल्लभा - (भाग-१)
३ - ‘तू माझी माऊली। मी तुझे लेकरू । नको दुरी धरू। विठाबाई - या संत नामदेवांच्या अभंगाप्रमाणे देव आणि भक्त यांच्यातील घनिष्ठ नाते आई व मुलासारखे प्रेमळ व विश्वासाचे असते. त्याच भावविश्वाचे निदर्शक म्हणजे - पुत्रवल्लभा होय.
४ - देवदर्शनासाठी देवळात जाणाऱ्यांनी समोरच्या देवावर मातेसमान विश्वास ठेवून दृढनिश्चयाने परमेश्वर भक्ती केली तरच इच्छापूर्ती होते - हेच या रूपवतीला सूचवायचे असते. कारण, देवसुद्धा भक्तवत्सलच असतो ना !
५ - हाच सुरेख भावार्थ स्पष्ट करणाऱ्या या सुरसुंदरीचे रूपवर्णन - ‘चित्ररूपा स पुत्रांगी’ - म्हणजे, जिणे स्वत:च्या कमरेवर मूल घेतले आहे, असे वर्णिले असून, तिचा उल्लेख ‘शिल्प प्रकाश’ ग्रंथात मातृमूर्ती म्हणून - ‘एषामातृसमामूर्ति: बालकादिसुशोभिता ।।’ - असा आढळतो.
६ - वरील आशय स्पष्ट करणाऱ्या प्रमाणबद्ध आकारातील पुत्रवल्लभाच्या दोन मूर्ती मार्कण्डीच्या (जि. गडचिरोली) मार्कण्डादेव मंदिरावर असून, एका प्रतिमेत तिने बालकाला डाव्या कमरेवर डाव्या हाताने घट्ट पकडले असून, त्याचा डावा पाय उजव्या हाताने पकडून ते बाळ खाली पडणार नाही याची काळजी घेतलीय. त्या बाळानेही आईच्या गळाहाराला डाव्या हाताने धरले आहे. मातृवात्सल्याचा यापेक्षा अधिक चांगला पुरावा कोणता असू शकतो? भगवंतही वात्सल्याची शाल मातेप्रमाणे भक्तावर निश्चितच पांघरतो, हे खरे.