- मेघना ढोके
कॉमेण्ट्रीशिवाय क्रिकेट?
- कल्पना तरी कुणी करेल का?
नुस्ती मॅच पाहून आणि क्रिकेटमधल्या तांत्रिक गोष्टींचं वर्णन ऐकून खेळातल्या टोकाच्या जोषाची आणि प्रसंगी अत्यानंदाची उत्कट पातळी कशी गाठली जाणार?
त्यासाठी चमचमीत, रसभरी, उत्साही, आक्रमक आणि जोषिली कॉमेण्ट्रीही हवी! पाच दिवस चालणा:या कसोटीपासून क्रिकेटचं रूप बदलत बदलत जेमतेम तीन तासात उरकणा:या सामन्यांर्पयत पोहचलं पण या प्रवासात कॉमेण्ट्रीचं बोट काही सुटलं नाही. उलट क्रिकेट जितकं वेगवान होत गेलं, त्याच वेगानं कॉमेण्ट्रीही वेगवान झाली. मुळातली ‘रनिंग कॉमेण्ट्री’ आधुनिक क्रिकेटनं ‘सुपरफास्ट’ करून टाकली.
जिवाचे कान करून रेडिओवर खरखरीतून शोधून शोधून इंग्रजी कॉमेण्ट्री ऐकली जात असे. मग ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीच्या जमान्यातही ती होती. रंगीत ‘लाइव्ह’ डे-नाइटच्या पन्नास षटकांत होती आणि आता तर टी-ट्वेण्टीच्या, आयपीएलच्या सुपर ओव्हरवाल्या काळातही ती आहेच!
पण या रनिंग कॉमेण्ट्रीने बदलत्या क्रिकेटसह स्वत:लाही बदलवलं. आणि सोबतच कॉमेण्ट्री ऐकत मॅच पाहणारे प्रेक्षकही बदलले.
कॉमेण्ट्री म्हणजे खेळ समजावून सांगणारं, वाईड-नो बॉल-नी रनआउट आहे की नाही हे सांगणारं शांत एकसुरी वर्णन या प्रेक्षकांना नको झालं!
आता त्यांना एक्सपर्टची लाइव्ह कमेण्ट तर हवीच आहे; सोबत काही मसालेदार गपशप, स्टायलिश अंदाजात केलेलं एकेका शॉटचं आणि बॉलचं वर्णनही हवं आहे! कॉमेण्ट्री ऐकताना क्रिकेट चढत जातं, असं ज्यांना वाटतं त्या प्रेक्षकांसाठी ही कॉमेण्ट्री सुपरफास्ट वेगानं धावती झाली! इंग्रजीचा ‘एलिट’ हात सोडून ‘देसी’ होत भारतात तर हिंदीतून ‘दौडायला’ लागली!!
खेळातल्या तंत्रची, त्या तंत्रतल्या आनंददायी नजाकतीची माहिती आणि आक्रमक पण रसरशीत भाषेतली धडधडती वेगवान वर्णनं यांचा मेळ ज्यांना उत्तम जमला किंवा ज्यांनी तो जमवला ते या बदलत्या काळातही क्रिकेट कॉमेण्ट्रीचे लिजण्ड ठरले.
पण बाकीचे?
त्यातले काही ‘मोटर माऊथ’ म्हणून फेमस झाले! त्यांच्या ना शेंडाबुडखा कॉमेण्ट्रीपुढे कुणी अवाक्षर काढू शकलं नाही. काही ब्रिटिशटाईप, निव्वळ सिनिक, सतत मैदानावरच्या खेळाडूंना कमी लेखणारे, तर काही फक्त टीव्हीवर चमको कॉमेण्ट्रीकार! ज्यांच्या स्वत:च्या नावावर जेमतेम धावा आहेत असेही टीव्हीवर ‘एक्सपर्ट’ म्हणून झळकू लागले! आणि क्रिकेट सोडून बरंच काही बडबडू लागले!
क्रिकेटमध्ये मसाला आला. कॉमेण्ट्री बॉक्समध्ये सिद्धू पाजी आला.
- कोणो एकेकाळी जिवाचा कान करून ऐकली जाणारी कॉमेण्ट्री बदलली.
त्या प्रवासातले हे काही टप्पे.
शांत, संयमी, साहेबी क्रिकेटने
कात टाकली, तशी मीतभाषी अभिजनांच्या तोंडून निसटून गेलेली ‘एक्सपर्ट’ कॉमेण्ट्रीही
कळ काढत, भांडत, चुगल्या लावत, गॉसिप्स चघळत धूमधडक्का
हिंदीत बेभान धावू लागली.
या ‘ताली ठोको’ स्थित्यंतराचा
एक टी-20 वेध..
बेनॉ-चॅपल-बायकॉट-ग्रेग
साधारण घरोघर रंगीत टीव्ही पोहचला तोवर क्रिकेट आम लोकांचा खेळ झाला होता. दोन दशकांपूर्वी तर भारतीय उपखंडात क्रिकेट नावाचा धर्मच उदयास आला. आणि पूजा बांधावी त्या भक्तिभावानं क्रिकेटचे सामने पाहायला लहानथोर घरोघर टीव्हीसमोर बसू लागले.
सामन्यांची संख्याही आजच्या तुलनेत बरीच कमी होती. त्यातही वनडेला उधाण आलेलं. फक्त खेळाला वाहिलेली स्पोर्ट्स चॅनल या वनडे लाइव्ह दाखवू लागली.
या काळात कॉमेण्ट्रीला असायचे काही परिचित आवाज. रिची बेनॉ, जेफरी बायकॉट, इअॅन चॅपल आणि टोनी ग्रेग. या चार आवाजांशिवाय शास्त्रशुद्ध क्रिकेट ‘ऐकणं’, त्यातले बारकावे समजून घेणं अशक्य वाटावं इतक्या तंत्रशुद्ध शांत कॉमेण्ट्रीचे दिवस होते हे. जेफरी बायकॉट गांगुलीला पाहून ‘प्रिन्स ऑफ कलकत्ता’ असं खास क्वीन्स इंग्रजीत म्हणत असे, तेव्हा त्याच्या आवाजातलं गांगुलीविषयीचं प्रेम जाणवायला लागलं, ते हे दिवस!
या चौघांच्या कॉमेण्ट्रीचे भक्त बनले होते लोक, तो हा काळ!
अत्यंत तंत्रशुद्ध, मोजक्या शब्दांतली, पण क्रिकेटचे ज्ञानकोश असावेत हाताशी अशी भारदस्त कॉमेण्ट्री.
समोर चाललेला खेळ सोडून दुस:या कशावरही कमेण्ट न करण्याची अतीव सभ्य रीत.
एलिट, इंग्लिश जटलमन्स क्रिकेट असलेल्या ‘सायबी’ थाटाच्या क्रिकेटची खानदानी आदबवाली कॉमेण्ट्री.
गावस्कर-शास्त्री-हर्षा भोगले
मध्यमवर्गीय महत्त्वाकांक्षांचा अत्युच्च बिंदू म्हणून उदयास आलेल्या सचिन तेंडुलकर नामक एका आश्चर्याच्या उदयाचा हा काळ! मध्यमवर्गीयांना याच काळात क्रिकेट पाहण्यापेक्षा खेळण्यात जास्त रस निर्माण झाला होता. त्यात ज्याला अक्षरश: पुजलं तो लिटल मास्टर गावस्कर रिटायर्ड होऊन तोवर कॉमेण्ट्री बॉक्समध्ये दाखल झाला होता. पोरी ज्याच्यावर (उघड उघड) मरत असा ‘ऑडीफेम’ रवि शास्त्रीही कॉमेण्ट्री पॅनलचा भाग बनला. आणि ज्याने कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं नाही, पण ज्याचं क्रिकेटचं ज्ञान, पॅशन आणि प्रेम या सा:याला तोड नव्हती असा हर्षा भोगले. हे तिघे भारतीय कॉमेण्ट्रीचे चेहरे बनले आणि एलिट इंग्रजी कॉमेण्ट्री क्लबमध्ये दाखलही झाले.
एक्सपर्ट कमेण्ट. एकदम स्ट्रेट. रोखठोक. पण संयत.
व्यक्तिगत टीका नाही.
तटस्थ, दूरस्थ असावी अशी सगळी तांत्रिक माहिती देणारी, पण तरीही ओघवत्या, हस:या शैलीत जुन्या मर्यादा ‘थोडय़ा’ ओलांडणारी कॉमेण्ट्री.
‘डॉलरमिया’ गोज ग्लोबल
जगमोहन दालमियांनी आयसीसीची पकड घेतली तो काळाचा टप्पा महत्त्वाचा होता. दालमिया हे ‘डॉलरमिया’ म्हणून प्रसिद्ध झाले इतका पैसा आणि ग्लॅमर त्यांनी भारतीय क्रिकेटकडे खेचून आणलं. त्याच काळात क्रिकेट जगभर पसरायला लागलं आणि ङिाम्बाब्वे, केनिया, बांगलादेश यांसारख्या पूर्वाश्रमीच्या वसाहतीही क्रिकेटच्या परिघात आल्या. आयसीसीत भारतीय क्रिकेटचा शब्द चालू लागला. दुसरीकडे भारतीय उपखंडातली क्रिकेटची बाजारपेठ वाढली आणि क्रिकेट ग्लोबल होता होता देशी होऊ लागलं. भारतीयच नव्हे, तर पाकिस्तानी हिंदी/उर्दू भाषिक कॉमेण्ट्रीला चांगले दिवस येऊ लागले.
अरुण लाल, अजय जडेजा, नवज्योतसिंग सिद्धू, रमीझ राजा, वसिम अक्रम, वकार युनूस, इंझमाम उल हक ही सारी नावं हिंदी आणि उर्दूत कॉमेण्ट्री करू लागली.
आपला मीतभाषी एलिट क्लास सोडून कॉमेण्ट्री देशी आणि बडबडी होऊ लागली.
शारजा, दुबईपासून भुवनेश्वर, कटकर्पयत मॅचेस खेळवल्या जाऊ लागताच कॉमेण्ट्रीनेही ‘सायबा’चा हात सोडला.
एक्स्ट्रॉ इनिंग्ज विथ मंदिरा बेदी
क्रिकेटच्या जाणकार चाहत्यांना मागे टाकून क्रिकेटची ‘फॅन्स’ नावाची जमात भसाभस वाढली. त्या वेडय़ा ‘फॅन्स’ना आपल्याकडे खेचून आपल्याच पडद्याला चिकटवून ठेवण्यासाठी चतुर चॅनल्सनी क्रिकेटला ग्लॅमरची सणसणीत ‘सेक्सी’ फोडणी देण्याचे बेत आखले. 2क्क्3 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला गेलेला वर्ल्डकप आठवतो? त्यातले सामने नाही आठवणार कदाचित, पण मंदिरा बेदीची एक्स्ट्रॉ इनिंग कशी विसराल तुम्ही? मंदिरा काही क्रिकेट एक्सपर्ट नव्हती. तिला क्रिकेटमधलं काहीही न कळणं हाच तर तिचा यूएसपी होता! चारू शर्मासह मंदिरा बेदी अॅँकर म्हणून दाखल झाल्यावर सुरुवातीला जुन्याजाणत्यांनी नाकं मुरडली. पण नंतर प्रत्यक्ष मॅचपेक्षा एक्स्ट्रॉ इनिंगचा टीआरपी वाढू लागला.
मंदिरा बेदीच्या न्यूडल स्ट्रॅप्ड, बॅकलेस ब्लाऊजेस, ङिारङिारीत साडय़ा हा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर रोशनी चोप्रा, मयंती लेंजर यांनी हा ग्लॅमरस कॉमेण्ट्रीवजा अॅँकरिंगचा वारसा सांभाळला.
कॉमेण्ट्रीऐवजी ‘कॉमेंट’ करण्यासाठी क्रिकेट एक्सपर्टच असण्याची गरज उरली नाही.
सामन्याचं गंभीर, बेतशुद्ध विश्लेषण करणारी कॉमेण्ट्री रूप बदलून चटपटीत झाली.
शक्कली लढवत मसाला अॅँकर्स पुढे सरसावले.
कॉमेण्ट्री बॉक्समध्ये जुगलबंदी
गांगुली, द्रविड, कुंबळे, नासिर हुसेन, शेन वॉर्न, शोएब अख्तर यांसारखे अनेक लोकप्रिय, नामांकित लिजण्ड्स सेकंड इनिंग्ज खेळायला कॉमेण्ट्री बॉक्समध्ये दाखल झाले. कारण तोपर्यंत क्रिकेटचा हंगाम वर्षभर चालवला जाऊ लागला होता. वन डे, टी-ट्वेण्टी, आयपीएल अशी चक्रच अखंड फिरू लागली.
आणि या हुशार, जाणत्या, उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणा:या माजी खेळाडूंना कॉमेण्ट्रीसह चॅनल्सवर मानाचं पान मिळालं.
पण नुस्ती कॉमेण्ट्री करणं काही त्यांना जमेना!
* परस्परांना चिमटे काढणं, प्रसंगी खोचक बोलणं, टीका करणं, एकमेकांना दुषणं देणं हे याच काळात कॉमेण्ट्री बॉक्समध्ये सुरू झालं. त्यातून चॅनल्सना टीआरपी मिळू लागला आणि गॉसिपछाप खाद्यही!
* स्वच्छ, तटस्थ कॉमेण्ट्री जवळपास संपलीच.
* कॉमेण्ट्री बॉक्समध्ये जुगलबंद्या रंगू लागल्या.
मसाला क्रिकेट तडका कॉमेण्ट्री
वीस-वीस ओव्हर्सचं क्रिकेट असावं की नाही याविषयी तुफान वाद झाला. पण टीकाकारांच्या नाकावर टिच्चून टी-ट्वेण्टी क्रिकेट आलं. ते जास्त थरारक आणि जास्त वेगवानही झालं. सोबत चिअर गल्र्स आल्या, त्यानंतरच्या पाटर्य़ा आल्या.
कार्पोरेट क्रिकेट जन्माला आलं होतं. हे नवं ‘प्रॉडक्ट’ विकण्यासाठी नवीन युथफूल, चिअरफूल, वेगवान कॉमेण्ट्री याच टप्प्यावर जन्माला आली.
* ठोकोताली छाप नवज्योतसिंग सिद्धू, विनोद कांबळीसारखे मेलोड्रॅमॅटिक खेळाडू लोकप्रिय कॉमेण्टेटर्स बनले.
* भारतात आयपीएलचा हंगाम सुरू झाल्यावर ही चुरचुरीत कॉमेण्ट्री आणखी चटपटीत झाली.
* कॉमेण्ट्री खेळाच्या अभ्यासक-जाणकारांसाठी नसून ‘एण्टरटेन्मेण्ट’साठीच असते, हे रुळलं.
देसी बल्ला, धूमधडक्का बोली
कॉमेण्ट्रीनं क्लासचा आणि एलिट्सचा हात सोडला. सायबाची इंग्रजी भाषा सोडून देसी बोलीभाषांचा हात धरला, कारण खेडय़ापाडय़ात पसरलेला मोठा प्रेक्षक आणि मोठी बाजारपेठ! म्हणून तर वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, शोएब अख्तर, हर्षा भोगले, वसिम अक्रम या सा:यांची हिंदी कॉमेण्ट्री इंग्रजी कॉमेण्ट्रीपेक्षा जास्त लोकप्रिय होऊ लागली.
सध्या तर हिंदीचा टीआरपी हा इंग्रजीपेक्षा जास्त आहे. क्रिकेटकडे दिलतोड मनोरंजन म्हणूनच पाहत सामने ‘एंजॉय’ करणा:यांना इंग्रजी, तांत्रिक, संथ समालोचनापेक्षा धूमधडक्का हिंदी, पंजाबी, हरयाणवीत जास्त मज्ज वाटते.
* सेहवाग तर उघडच म्हणतो, ‘‘मैदानपे जो चल रहा है वो कहनेसे जरुरी है, मन में जो आए वो भी कहना.!’’
* ही ‘मन की बात’ नव्या कॉमेण्ट्रीची परिभाषा आहे.
* उत्तम हिंदी भाषक कॉमेण्टेटर्समुळे हिंदी कॉमेण्ट्री मात्र सिद्धूछाप ताली ठोको न होता, सुदैवानं अत्यंत श्रवणीय आणि रंजक होते आहे, हे त्यातल्या त्यात बरं!
(लेखिका लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com