- डॉ. उज्ज्वला दळवी
मध्यरात्री मोठय़ा गडगडाटाने मला गाढ झोपेतून जाग आली. आमच्या बर्फघराचा, इग्लूचा तळ दुभंगला होता! पुढल्याच क्षणी मी रक्त गोठवणा:या बर्फगार पाण्यात पडलो. बरोबरच्या एस्किमोंनी प्रसंगावधानाने मला वेळीच वर खेचलं. नाहीतर मृत्यू अटळ होता.’
उत्तर ध्रुव सर करायला निघालेल्या फ्रेडरिक कुक या अमेरिकन डॉक्टरच्या पथकावर तसे अनेक जीवघेणो प्रसंग आले. कधी इग्लूचं जडशीळ छप्पर अंगावर कोसळलं, कधी बर्फाच्या मा:यात कुत्रे गाडले गेले, तर कधी ध्रुवाजवळच्या भल्याथोरल्या अस्वलाने हल्ला केला. महिनोन्महिने त्यांच्या पायांखाली जमीन नव्हती. होता तो समुद्रबर्फाच्या ओबडधोबड, ऐसपैस आणि अस्थिर लाद्यांचा तरंगता रस्ता! त्याच्यावरून सामानाने-शिध्याने लादलेल्या घसरगाडय़ा हाकत त्यांनी शेकडो मैलांचा पल्ला गाठला.
कधी कधी तो बेभरवशाचा रस्ता दुभंगून समुद्रबर्फातल्या त्या दरीत वाहत्या पाण्याची रुंद नदी तयार होई. तिच्यावर नव्या बर्फाची साय जमली की मगच, जीव मुठीत धरून, अवजड घसरगाडय़ा हलक्या पावली त्या नाजूक सायीवरून ओढून न्याव्या लागत. कधी अक्राळविक्राळ राक्षसांसारखे हिमखंड एकमेकांना ढुशा देत मार्गात आडवे येत; त्यांच्यामधून वाट काढणा:याचा चुराडा करत.
थंडीने फुटलेल्या गालांवर जखमांची नक्षी होई. श्वास थिजून नाकातल्या केसांच्या तीक्ष्ण सुया होत. गोठलेल्या पापण्यांच्या गजांआड डोळे कैद होत. मिणमिणा सूर्य ऊब मुळीच देत नसे, पण चमचमत्या बर्फावरून प्रखर प्रकाशाचे भाले डोळ्यांत खुपसून वेदना मात्र देई. तपमान शून्याखाली 40-50 अंश असूनही अविश्रंत अंगमेहनतीमुळे घामाच्या धारा लागत. घामाने भिजलेले लोकरीचे कपडे गोठून कडक होत. म्हणून एस्किमोंसारखे चामडय़ाचे सैलसर कपडेच सोयिस्कर होत.
थंडीतल्या मेहनतीला फार मोठय़ा खुराकाची नितांत गरज होती. पण त्या कठीण परिस्थितीतले चणो खरोखरच लोखंडाहून कठोर होते.
मोहीम ध्रुवाजवळ पोचेतोवर इंधन संपत आलं. अन्न गरम करणं जमेना. गोठलेलं अन्न कु:हाडीने फोडताना कु:हाडीच्या ठिक:या उडत. ते कडक घास बत्तीस वेळा चावून, मऊ करून खाताना अपु:या अन्नानेही पोट भरल्यासारखं वाटे.
तशा सात-आठशे मैलांच्या मजलीनंतर सोबतचे अनुभवी एस्किमोही पार थकले. घरच्या आठवणी जागवून, पाऊल पाऊल चालवत त्यांना महत्प्रयासाने पुढे न्यावं लागलं.
‘त्या सा:या दिव्यातून अक्षांशांची शिडी चढत आम्ही नव्वद अंशांपर्यंत पोचलो. सगळे रेखांश पायातळी एकवटले. परतीची ओढ लागलेल्या एस्किमोंनी आनंदोत्सव साजरा केला. आणि मग एकाएकी तो अद्भुत क्षण गेल्या कित्येक दिवसांच्या प्रचंड थकव्याच्या भाराखाली दबून गेला’ - कुकने रोजनिशीत नोंद केली.
उत्तर ध्रुवाजवळ पोचणं महाकठीण होतं. तिथल्या तरंगत्या बर्फाने अनेक साहसवीरांचे बळी घेतले होते. तरी नॉर्वेच्या दर्यासारंगांनी 1887 पासून तो ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी त्या बर्फावर कुरघोडी करणा:या खास जहाजातून
86 अंश उत्तरेपर्यंतचा पल्ला गाठला.
आमुंडसेन नावाच्या नॉर्वेच्या मोहीमवीराने तीन वर्षांच्या मोहिमेत युरोप-कॅनडा-अमेरिका-रशिया यांच्यामधून अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर जोडणारी, उत्तर ध्रुवालगतची सागरी वाट 19क्6 मध्ये शोधून काढली. तो उत्तर ध्रुवावर स्वारी करणार होता. पण 19क्9 साली कुक आणि पियरी या दोन अमेरिकन साहसवीरांनी वेगवेगळ्या मोहिमांतून उत्तर ध्रुव गाठल्याचा दावा केला. ते साध्य हातून निसटल्यामुळे आमुंडसेनाने तो नाद सोडला.
स्कॉट नावाच्या इंग्लिश साहसवीराने आखलेली दक्षिण ध्रुवाची मोहीम त्यावेळी जगभरात गाजत होती. तरी आमुंडसेनानेही दक्षिण ध्रुवाचा ध्यास घेतला.
दक्षिण ध्रुवावर भक्कम जमिनीचा पाया आणि त्यावर कायमस्वरूपी बर्फाचा थर होता. त्यामुळे तिथला प्रवास खडतर असूनही उत्तरेइतका धोकादायक नव्हता. शिवाय तिथे अस्वलांची भीतीही नव्हती.
अनुभवी आमुंडसेनाने आपली दक्षिण मोहीम काळजीपूर्वक आखली. एक लंबाचौडा हिमनग त्याने रस्ता म्हणून वापरला. त्याच्यावरून पूर्वतयारीसाठी एक वेगळा दौरा केला. अनेक सोयिस्कर तळांवर जात्यायेत्या प्रवासाला पुरेल अशी अन्नाची बेगमी केली. तिथे ठळक खाणाखुणा ठेवल्या. घसरगाडय़ा ओढायला त्याने बर्फातल्या प्रवासाचे भरवशाचे साथी म्हणजे सायबेरियन कुत्रे सोबत घेतले.
बावन्न खात्रीचे आणि तगडे कुत्रे, स्की वापरायचं उत्तम कसब असलेले चार अनुभवी सोबती आणि चार गाडय़ा एवढाच गोतावळा घेऊन तो 19 ऑक्टोबर 1911 ला अंतिम टप्प्याला निघाला. 14 डिसेंबरला दक्षिण ध्रुव सर करून आमुंडसेन 25 जानेवारीला सुखरूप मूळ तळावर परतला.
स्कॉटने मोहिमेची नीट आखणी केली नव्हती. वाटेतल्या तळांवर ठळक निशाण्या लावण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. दुस्तर बर्फाळ प्रदेशात जाताना ना त्याच्याकडे पुरेसे कुत्रे होते ना त्याच्या पथकाला स्की वापरणं जमत होतं. त्याने यांत्रिक घसरगाडय़ा सोबत घेतल्या पण त्यांचा तज्ज्ञ इंजिनिअर ऐनवेळी मोहिमेवर आलाच नाही. त्यांच्यातल्या एका गाडीला सुरु वातीलाच जलसमाधी मिळाली आणि बाकीच्या थंडीने नादुरु स्त झाल्या. त्याची भरवशाची तट्टं अतिश्रमांनी मेली, काही वाहून गेली आणि काही व्हेलमाशांनी खाल्ली. पुढची अवजड वाहतूक माणसांच्या काबाडकष्टांनी झाली. त्यासाठी स्कॉटने एक जादा माणूस सोबत घेतला.
मोहिमेच्या अंतिम भागात अन्नाचा पुरवठा मोजका होता. दुष्काळात पाचवा माणूस महागात पडला. घामाने गोठणा:या लोकरीच्या कपडय़ांनी हालात भरच घातली. तरी त्या वीरांनी जिद्दीने पल्ला गाठला.
18 जानेवारीला, ध्रुवापासून दीड मैलावर त्यांना आमुंडसेनाचा तळ सापडला; तिथल्या नोंदी मिळाल्या आणि ध्रुव सर झाल्याचंही कळलं.
पराभवाने खचून, दिवास्वप्नांची लक्तरं ओढत त्यांनी दक्षिण ध्रुव नावाची ‘भयाण जागा’ गाठली; तिथे ब्रिटनचा ङोंडा कसाबसा रोवला आणि आठशे मैलांची परतीची फरफट सुरू केली.
तेवढय़ात हवामान बिघडलं. तुटपुंजं अन्नपाणी, अतिश्रम, बेसुमार थंडी यांनी पाचही जण हैराण झाले. दोघे वाटचालीत आणि उरलेले उपासमारीने गेले. ‘आणखी लिहू शकत नाही’ अशी नोंद करून 29 मार्च 1912 ला स्कॉटची लेखणी थांबली.
वैराण हिमप्रदेशातल्या त्यांच्या वीरमरणाची वार्ता जगाला कळायला आणखी आठ महिने लोटले. आणि मग मात्र त्यांच्या हालांचे-हौतात्म्याचे पोवाडे गायले गेले. त्यादरम्यान उत्तर ध्रुव विक्रमाचा दावा सिद्ध करायला लागणारे महत्त्वाचे पुरावे कुक आणि पियरी यांना देता आले नाहीत. पियरीच्या तालेवार गटाने कुकवर निंदेची-कुचेष्टेची चिखलफेक केली, त्याच्या पूर्वायुष्यातल्या चुका उकरून काढल्या, त्याला आयुष्यातून उठवलं.
1926 साली आमुंडसेनानेच उत्तर ध्रुवावरही पोचून निशाण फडकावलं. त्याने शास्त्रशुद्ध मोहिमांनी दोन्ही ध्रुव बिनबोभाट जिंकले; ते यश सिद्धही केलं.
पण आमुंडसेनाचा विजय कुक-पियरींच्या हीन वादाइतका सनसनाटी किंवा स्कॉटच्या हौतात्म्याइतका उदात्त ठरला नाही.
गुणी, धोरणी, महत्त्वाकांक्षी आमुंडसेनाची घोर उपेक्षा झाली.
ध्रुवांना धडक द्यायचं धाडस करणा:या त्या चारी वीरांचा पराक्र म उत्तुंगच होता. पण अपयश, लांच्छनं, उपेक्षा अशा काही ना काही कारणाने त्यांच्या यशकीर्तीचा ध्रुवतारा झाकोळून गेला.
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया
आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com