सगळ्यांत भारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:03 AM2019-05-12T06:03:00+5:302019-05-12T06:05:06+5:30
सगळ्या मुलांनी पर्यावरणपूरक प्रकल्प बनवले होते. एकापेक्षा एक भारी. त्याचं त्यांना फार कौतुकही होतं, साहील आणि त्याच्या ग्रुपनं मात्र काहीच बनवलं नव्हतं. त्यांच्या हातात होते फक्त तीन फोटो आणि एक पत्र. सगळे त्यांची टर उडवत होते, तरीही पहिलं बक्षीस मिळालं ते त्यांनाच ! कारण त्यांचा प्रकल्प खरंच सर्वांपेक्षा खूप भारी होता !
- गौरी पटवर्धन
साहिल, ऊर्वी, राधिका आणि ईशान नुसतेच उभे होते. त्यांच्या आजूबाजूला धावपळ चालू होती. त्यांच्या आठवीच्या वर्गातली सगळी मुलं आपापल्या ग्रुपचा प्रोजेक्ट मांडून ठेवत होती. शाळेने सुटी लागायच्या आधी सांगितलं होतं, की सगळ्या मुलांनी 4-4 जणांच्या ग्रुपमध्ये पर्यावरणविषयक प्रकल्प करायचा. प्रत्येक इयत्तेतल्या आणि एकूण शाळेतल्या सगळ्यात चांगल्या प्रकल्पाला बक्षीस मिळणार होतं. आज सगळ्यांनी आपापला प्रकल्प मांडायचा होता. शहरातले मोठे पर्यावरणतज्ज्ञ प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. आणि म्हणूनच सगळी मुलं आपापले प्रकल्प मांडून ठेवण्यात बिझी होती.
एका ग्रुपने छोटी पाणचक्की बनवली होती. ती बघायला त्यांच्या टेबलभोवती गर्दी जमली होती. एका ग्रुपने सोलर पॉवर सिस्टीमचं मॉडेल विकत आणलं होतं. ते खिडकीपाशी जागा पकडून उभे होते. त्यांच्या त्या चिमुकल्या सोलर सिस्टीमवर छोटे एलक्ष्डी लाइट्स लागत होते. एक ग्रुप तर चक्क लॅपटॉप घेऊन आला होता. त्यांच्यातल्या एकाच्या वडिलांनी त्यांना एकदम मस्त पीपीटी बनवून दिलं होतं. ते त्यांनी ऑटो प्लेवर टाकलं होतं, त्यावर समुद्रातल्या प्लॅस्टिकमुळे होणार्या नुकसानीचे फोटो आणि माहिती देणार्या स्लाइड्स फिरत होत्या. त्याही बघायला मुलांची खूप गर्दी झाली होती. त्याशिवाय काही जणांनी छोटं जंगलाचं मॉडेल बनवलं होतं. काहींनी सोलर कूकरचं थर्माकोल मधलं मॉडेल स्वत: बनवून आणलं होतं. सगळीकडे आपापला प्रोजेक्ट मांडायची आणि सजवायची धावपळ सुरू होती. साहिल, ऊर्वी, राधिका आणि ईशान त्यांना दिलेल्या बेंचपाशी एक कागद हातात घेऊन नुसतेच उभे होते.
येणारी जाणारी मुलं त्यांना उत्सुकतेने विचारत होती, ‘तुम्ही काय केलंय?’ त्यावर ते चौघं हातातला कागद दाखवत होते. पण तीन फोटो आणि एक पत्न लिहिलेला कागद बघण्यात कोणालाच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळेच प्रमुख पाहुणे शाळेत आले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं, की या चौघांच्या ग्रुपने काहीच प्रोजेक्ट केलेला नाहीये आणि ते आईवडिलांची चिठ्ठी घेऊन आलेत. हे समजल्यावर सोलर पॉवर, पाणचक्की आणि पीपीटीवाले ग्रुप मुद्दाम त्यांच्या टेबलपाशी येऊन गेले होते. जाताना ते आपापसात म्हणत होते, ‘म्हणून वेळेवर प्रोजेक्ट सुरू करायचा असतो. नाहीतर अशी पालकांकडून चिठ्ठी आणायला लागते.’
मग त्यांची चर्चा ही त्यांच्यापैकी कोणाला कितवा नंबर मिळणार अशी सुरू झाली. कारण आठवीत पहिली तीन बक्षिसं याच तीन प्रकल्पांना मिळणार याबद्दल त्यांच्या मनात कसलीच शंका नव्हती. त्यांचे प्रकल्प बघून साहिल, ऊर्वी, राधिका आणि ईशानचा आत्मविशासही जरा डळमळीत झाला होता. पण आता काहीच करण्यासारखं नव्हतं. त्यामुळे ते परीक्षक त्यांच्या टेबलपाशी येण्याची वाट बघत चुळबुळ करत उभे होते.
शेवटी एकदाचे परीक्षक आठवीच्या प्रदर्शनात आले. त्यांनी सगळे प्रकल्प मनापासून बघितले. बघत बघत ते या चौघांच्या टेबलपाशी आले. यांच्या टेबलवरचा नुसता एक कागद बघून परीक्षकांबरोबर आलेल्या शिक्षकांच्या चेहर्यावरपण राग दिसायला लागला. त्यांनाही वाटायला लागलं की, हे चौघं आता पाहुण्यांसमोर पालकांची चिठ्ठी दाखवणार. तेवढय़ात पाहुण्या बाईंनी त्यांना विचारलं,
‘तुम्ही काय प्रकल्प केलात मुलांनो? बघू..’ असं म्हणून त्यांनी कागद घ्यायला हात पुढे केला. साहिल कागद त्यांना देणार एवढय़ात ऊर्वी म्हणाली,
‘आम्ही आधी आमचा प्रकल्प सांगतो.’
‘बरं चालेल.’ पाहुण्या म्हणाल्या. ‘पण थोडक्यात सांगा बरं का.. अजून नववी, दहावीचे प्रकल्प बघायचे आहेत मला.’
‘हो हो.’ राधिका म्हणाली, ‘अँक्च्युअली ना, आम्ही खूप दिवस विचार करत होतो की आपण काय प्रकल्प करायचा.’
‘कारण आम्हाला झाडं लावा, पाणी वाचवा आणि प्लॅस्टिक वापरू नका, असा कुठलाच प्रकल्प करायचा नव्हता.’ ईशान म्हणाला.
‘का रे?’ पाहुण्यांनी जरा आश्चर्याने विचारलं.
‘कारण या गोष्टी सगळेच एकमेकांना सांगतात आणि ते आता सगळ्यांना माहिती असतं. मग जे सगळ्यांना माहिती आहे, तेच आपण परत कशाला करायचं?’ साहिल अजूनही कागद हातात घट्ट पकडून उभा होता. मग ऊर्वीने सांगायला सुरु वात केली, कारण या प्रकल्पाची मूळ आयडिया तिची होती.
‘सगळेच करतील असा कॉमन प्रोजेक्ट आम्हाला करायचा नव्हता. आम्ही खूप दिवस काय प्रोजेक्ट करायचा हे ठरवण्यात घालवले. आम्ही चौघं एकाच कॉलनीत राहतो. आमच्या कॉलनीच्या जवळ एक छोटी टेकडी आहे. तिथे आम्ही गेलेलो असताना आम्हाला दिसलं की, त्या टेकडीवर खूप घाण होती. कागद, प्लॅस्टिक, बाटल्या, रॅपर्स असं काय काय होतं. म्हणून आम्ही ठरवलं की आपण ही टेकडी स्वच्छ करूया. म्हणून मग आम्ही एक आठवडा रोज तिथे जाऊन तिथला सगळा कचरा आवरला. हळूहळू तिथे फिरायला येणारे मोठे लोकपण आमच्या मदतीला आले. त्यांनीच आमचे फोटो काढले. त्यातले तीनच फोटो आम्ही प्रिंट केले. कारण गरज नसताना फोटो प्रिंट करणं बरोबर नाही, त्यात कागद वाया जातो. हे ते तीन फोटो आहेत. त्यातले दोन फोटो, आम्ही काम करत असतानाचे. त्यात आजूबाजूला कचरा दिसतोय आणि तिसरा स्वच्छ झालेल्या टेकडीचा.’
‘अरे वा..’ पाहुण्या बाईंना खूपच कौतुक वाटलेलं होतं; पण मग हे पत्न कसलं आहे?’
‘ते आम्हाला तिथे फिरायला येणार्या लोकांनी दिलं. त्यांनी लिहून दिलंय की आम्ही टेकडी स्वच्छ केल्यामुळे त्यांनाही परिसर स्वच्छ ठेवण्याचं महत्त्व समजलं आणि ते इथून पुढे टेकडी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांनी आपापसात पैसे गोळा करून टेकडीवर चार ठिकाणी कचर्याचे डबे बसवलेत. लोक आता त्यात कचरा टाकतात.. हे बघा पत्र..’
पाहुण्या बाईंनी साहिलच्या हातातून पत्र घेतलं आणि संपूर्ण वाचलं. त्यांना शाब्बासकी देऊन त्या पुढचे प्रकल्प बघायला गेल्या. थोड्या वेळाने सगळ्यांना शाळेच्या मोठय़ा हॉलमध्ये बक्षीस समारंभासाठी बोलावलं. सगळी मुलं तिथे जाऊन बसली. कोणाला बक्षीस मिळणार याची सगळ्यांना फारच उत्सुकता होती. नववी-दहावीच्या मुलांनीपण खूप छान प्रकल्प बनवलेले होते.
आठवीची बक्षिसं जाहीर झाली; त्यात या चौघांच्या प्रकल्पाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि जेव्हा सगळ्या शाळेतून सगळ्यात भारी प्रकल्प निवडायचा होता त्यावेळी पाहुण्या बाईंनी या चौघांना स्टेजवर बोलावलं आणि म्हणाल्या, ‘या मुलांचा प्रकल्प या शाळेतलाच नाही, तर मी आजवर बघितलेल्या सगळ्या प्रकल्पांपैकी सगळ्यात चांगला प्रकल्प आहे, कारण हा एकच प्रकल्प खरंच हाताने काम करून बनवलेला आहे.’
आणि मग साहिल, ऊर्वी, राधिका आणि ईशानच्या नुसत्या कागदावरच्या प्रकल्पाला पहिलं बक्षीस मिळालं..
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com