उत्तर प्रदेश आणि बाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:03 AM2020-10-04T06:03:00+5:302020-10-04T06:05:06+5:30

उत्तर प्रदेशचे राजकारण आजही  ‘कट्टे’ आणि ‘पट्टे’ याभोवती फिरते.  त्यात एकीकडे पुरुषांना अर्मयाद स्वातंत्र्य,  तर दुसरीकडे महिलांची मुस्कटदाबी.  अनेक महिलांच्या नावात ‘देवी’, पण त्यांना वागणूक मात्र पशूच्याही खालची!

Uttar Pradesh and Women... | उत्तर प्रदेश आणि बाई...

उत्तर प्रदेश आणि बाई...

googlenewsNext
ठळक मुद्देआजही भारताच्या या प्रांतात ‘बाई’ची जागा   उर्मट ‘व्यवस्थे’च्या पायाशी आहे.. का?

- सुधीर लंके
‘फांसी दो, फांसी दो. दरींदोंको फांसी दो’ 
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेने या घोषणा देशात पुन्हा एकवार उठल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता त्या राज्यात ‘ऑपरेशन दुराचारी’ हे अभियान जाहीर केलेय. महिलांवर अत्याचार करणार्‍यांचे पोस्टर चौकात लावणार, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलांवर अत्याचार होतील तेथील अधिकार्‍यांना जबाबदार धरणार अशा त्यांच्या घोषणा आहेत. 
हाथरसच्या भयंकर घटनेचे तपशील आता सर्वांनाचा माहिती आहेत. ती मुलगी जिवंत असताना जे झाले ते जितके भयंकर, तेवढेच ती गेल्यावर जे झाले-होते आहे ते अत्यंत संतापजनक! 
यानिमित्ताने मी उत्तर प्रदेशातून केलेले काही प्रवास आठवतात आणि त्या प्रवासात भेटलेल्या स्रिया. आणि त्यांना मुठीत ठेवणे हेच आपले जीवितकार्य मानणारे पुरुष! उत्तर प्रदेशचे राजकारण आजही ‘कट्टे’ आणि ‘पट्टे’ याभोवती फिरते. कट्टे म्हणजे बंदुकीचे लायसन्स आणि ‘पट्टे’ म्हणजे जमिनीचे तुकडे, जमीनदारी. उत्तर प्रदेशच्या बहुतांश गावात फिरताना ठाकूर व जमीनदारांच्या बगलेत बंदूक आणि महिलांच्या चेहर्‍यावर घुंगट दिसतो. बंदूकधारी माणसं आणि घुंगटधारी महिला. परंपरागत जमीनदारांना आजही बंदूक हीच आपली ओळख वाटते. म्हणजे एकीकडे पुरुषांना अर्मयाद स्वातंत्र्य. दहशत करण्यास परवानगी. दुसरीकडे महिलांना घुंगटमध्ये ठेवून त्यांची मुस्कटदाबी. या प्रदेशातील बुंदेलखंड या मागासलेल्या भागात शंभरपैकी नव्वद महिलांच्या नावात ‘देवी’ हा शब्द आढळतो; पण त्यांना देवीचे स्थान मात्र कधीच मिळत नाही. 
 ‘लोकमत’च्या दीपोत्सव या दिवाळी अंकाच्या लेखासाठी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडात मी 2012 मध्ये फिरलो होतो. त्यावेळी तेथील ‘गुलाबी गँग’ या महिला संघटनेच्या प्रमुख संपत पाल भेटल्या. त्यांच्याकडे ज्या महिला आपले गार्‍हाणे मांडण्यासाठी येत होत्या त्यात अत्याचाराच्या कहाण्याच अनेक होत्या. कुणाच्या मुलीवर बलात्कार झाला होता, तर काही महिलांवर त्यांच्या घरातीलच सदस्य वाईट नजर ठेवून होते. महिलांनी स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हावे म्हणूनच या महिला गुलाबी गँग नावाच्या संघटनेत सामील होत होत्या. आपल्या संरक्षणासाठी प्रसंगी लाठी उगारायची असे या गँगचे सांगणे होते. 
या ‘गुलाबी गँग’चा फत्तेहपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी निघालेला मोर्चा पाहण्याची संधी मिळाली. काय होती या मोर्चाची मागणी? मोर्चात सहभागी झालेल्या दलित समाजातील सुनीतादेवीचा पती दहा दिवसांपूर्वी मयत झाला होता. त्यामुळे रात्री, अपरात्री तिचा सासरा तिला त्रास देत होता. तिला स्वत:च्या सासर्‍यापासूनच संरक्षण हवे होते. रामखेलावत नावाच्या महिलेची मुलगी घरातून बेपत्ता होती. सोमवती नावाच्या महिलेला गावातील ठाकूरांकडून धमक्या मिळत होत्या. या गँगसोबत फिरताना एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्यावेळी तेथील दरोगा चक्क बनियन व अंडरवेअरवर बसून पोलीस स्टेशन चालवत होता आणि या संघटनेच्या महिलांशी त्याच अवस्थेत बोलत होता. 
फुलनदेवी ही उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडातील महिला. अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हाती बंदूक घेऊन ती डाकू बनली, असे तिचे चरित्र सांगते. त्यावर चित्रपटही आला. फुलनदेवीसंदर्भात बुंदेलखंडात एक गाणे प्रसिद्ध आहे. ‘हाथ तू नली कारतूस ते चली, मल्लाही की लली  बदला लेन को चली’. ‘लली’ म्हणजे मुलगी आणि ‘मल्लाही’ म्हणजे नाव चालविणारी जमात. ‘एनएच-44’ या प्रदीर्घ वृत्तलेखासाठी आमची ‘लोकमत’ टीम 2016 साली उत्तर प्रदेशात गेली त्यावेळी चंबळ खोर्‍यातील डाकू मलखानसिंग याची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. मलखानचे म्हणणे होते, ‘गावात आमच्यावर जमीनदारांनी जे अत्याचार केले त्याच्याविरुद्ध बंड पुकारण्यासाठी आम्ही चंबळमध्ये जाऊन बंदुका हाती घेतल्या. आम्ही आमच्या हक्काची व माता, भगिनींच्या संरक्षणाची लढाई लढत होतो!’-   एकेकाळी डाकू राहिलेला मलखानसिंगही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडतो, याचा अर्थ काय? 
हे झाले काही वर्षापूर्वींच्या उत्तर प्रदेशचे चित्र; पण अखिलेश यादव सरकारने मुलांच्या हातात लॅपटॉप दिले तेव्हातरी उत्तर प्रदेशचे चित्र काय होते?  तंत्रज्ञान आले तरी महिला व दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत. 2017 साली उन्नाव घडले. ज्यात एका भाजप नेत्यावर अत्याचाराचा आरोप आहे. उन्नावच्या घटनेत पीडितेच्या वडिलांचा पोलीस स्टेशनमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनाच पोलिसांनी डांबले होते. 
2012 ला निर्भयाकांड घडल्यानंतर अनेक कायदे बनले. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालये व फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यास सांगितले. परंतु याची अंमलबजावणी उत्तर प्रदेशसह इतरही राज्यात फारशी झाली नाही. 
घटनांवर तत्कालिक प्रतिक्रिया देणे व नंतर विसरून जाणे अशी आपली आजची व्यवस्था आहे. त्यामुळे घटना घडत राहतात व ‘ऑपरेशन दुराचारी’ अपयशी ठरते. महिला या जातीय द्वेषाच्या व पुरुषी मानसिकता या दोन्ही बाबींच्या शिकार होत आहेत हे आपले सरकार मान्य करणार नाही तोवर या घटना थांबणे अवघड आहे. उत्तर प्रदेशातील स्रीशक्तीचा इतिहास झाशीच्या राणीपासून सुरू होतो. राणी लक्ष्मीबाई यांना साथ केलेल्या झलकारीबाई यांच्या अस्मितेचा फायदा उठविण्याचा खटाटोप सध्या उत्तर प्रदेशात भाजपसह सर्व पक्षांकडून सुरू आहे. कारण झलकारीबाई ज्या जातीच्या होत्या त्या जातीची मते सर्वांना हवी आहेत. मतासाठी महिलांच्या नावांची अस्मिता हवी आहे; पण तिला संरक्षण व सन्मान देण्याची मात्र सरकार व जनता अशी दोघांचीही तयारी नाही. सर्वच राज्यात कमी -जास्त प्रमाणात हेच चित्र आहे. योगी सरकार उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारत आहे. ही फिल्म सिटी उभारावी, मात्र सिनेमांनाही लाजवतील अशा महिला अत्याचाराच्या कहाण्या त्यांनी थांबवाव्यात. 

sudhir.lanke@lokmat.com
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.) 

Web Title: Uttar Pradesh and Women...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.