- शर्मिष्ठा मीना शशांक भोसलेसोलापूर जिल्ह्यातील तरंगफळ गावात माऊली कांबळेसरपंच म्हणून निवडून आले. ते लैंगिक अल्पसंख्य गटातले.लोकशाहीवरचा विश्वास वाढवणारीच ही घटना..पण लोकांच्या मानसिकतेचं काय? त्यामुळेच पहिल्या तृतीयपंथी प्राचार्यामानोबी बंदोपाध्याय यांना राजीनामा द्यावा लागला.भारतीय नौदलानं एका कर्मचाºयाला अवमानकारक पद्धतीनं काढून टाकलं.कोची मेट्रोतल्या ११ तृतीयपंथीयांनी निराशेनं नोकरी सोडली.लैंगिक अल्पसंख्यकांना त्यांचे हक्क मिळायला अजून खूप काळ जावा लागेलहे खरं; पण त्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा वापर तरीआपण त्यांना करू देणार की नाही?
काही दिवसांपूर्वीच एक बातमी आलीय. तृतीयपंथी समाजातले ज्ञानू ऊर्फ माउली शंकर कांबळे सोलापूर जिल्ह्यातल्या तरंगफळ गावात सरपंचपदी निवडून आलेत. बातमी सुखावणारीच आहे. लोकशाही या शब्दावरचा विश्वास अधिकच दृढ करणारी आहे.पण त्याआधीही काही बातम्या येऊन गेल्यात. कोची मेट्रोमध्ये २३ तृतीयपंथी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना नोकरी मिळाली; पण घरं मिळत नसल्याने आणि चिकटलेला ‘सोशल स्टिग्मा’ निघत नसल्याने त्यापैकी ११ व्यक्तींनी नोकरीचा राजीनामा दिलाय. तिकडे प. बंगालमध्ये पहिल्या तृतीयपंथी प्राचार्या मानोबी बंदोपाध्याय यांनीही सहकारी आणि विद्यार्थ्याकडून असहकार पुकारला जात असल्याचं कारण सांगून मागच्या वर्षाअखेर राजीनामा दिला. त्यावेळी त्यांचा कार्यकाळ होता फक्त दीड वर्षं! आत्ताच काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलाने सेवेत असलेल्या एका व्यक्तीला अतिशय अवमानकारक पद्धतीने काढून टाकलं. कारण ती लिंगबदल करून पुरुषाची स्त्री झाली. ‘भारतीय सैन्यदलात थेट युद्धभूमीवर स्त्रिया काम करू शकत नाहीत’, असं कारण त्यासाठी दिलं गेलं असलं तरी तिला इतर कुठल्या फ्रण्टमध्ये सामावून घेण्यासही सैन्यदलाने नकार दिला.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तृतीयपंथीयांना यापुढे सैन्यदलात नोकºया मिळणार नसल्याचा फतवा काढला. यावर अमेरिकेसह जगभरातून निषेधाचा मोठाच सूर उमटलाय.हे सगळं भारतासह जगभरात घडतं आहे. याचे नेमके अर्थ लावायला मात्र आपण कमी पडतोय असं दिसतं. भारत लोकशाही देश आहे. इथं जात-धर्मनिहाय अल्पसंख्य असणाºयांना प्राधान्यानं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता द्यायला लोकशाही सतत बांधील असते. मात्र लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्य असलेल्यांचं काय? त्यांच्या अल्पसंख्य असल्याने त्यांना आरक्षण वा तत्सम विशेष हक्क-अधिकार बहाल करण्याचा टप्पा गाठायला अजून खूप वेळ लागेल. किमान निसर्गाने घडवलेला माणूस म्हणून अंगी असलेली बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांचा वापर करू देण्याची अनुकूलता तरी? एवढी किमान गोष्टही तुमचा-माझा भवताल या अल्पसंख्यांना देऊ शकत नाहीय.पुरुषांचा प्रथम पंथ, स्त्रियांचा द्वितीय असं ठरवत एका मोठ्या बहुलिंगी ओळखीचं प्रतिनिधित्व करणाºया या व्यक्तींना आपण सोयीनं तृतीय पंथी असं विशेषण आपणच बहाल केलंय. स्त्री-पुरु षाव्यतिरिक्तची वेगळी लैंगिक ओळख असणाºयांसाठी एक कुठला सन्मानजनक शब्दही अजून मराठी देऊ शकली नाहीय. वरच्या चारेक प्रकरणांच्या बातम्या झाल्या असल्या तरी बातम्यात न येणारी-मावणारी कुचंबणा, घुसमट आणि मानहानी तृतीयपंथी व्यक्ती हरेक क्षणी अनुभवत असते.ट्रान्सजेण्डर कम्युनिटीत गुरु असलेल्या पिंकी शेख उद्विग्न सवाल विचारतात, आम्ही दुर्बल घटक नाही का? आरक्षण सोडाच, आमच्या अस्तित्वाचा साधा पुरावाच आम्हाला मिळत नाही. एखादी एक खिडकी योजना आमच्यासाठी असली तर हे मिळणं जरा सोपं होईल. पण सामाजिक मान्यतेसाठी झगडताना शासकीय मान्यता तरी कुठाय आम्हाला? एकीकडे लोक आमच्याकडे दैवी शक्ती असलेले म्हणून बघतात. पण दुसरीकडे आमचं स्वत:चं कुटुंबच आम्हाला स्वीकारत नाही. तू घरातून निघून जा. तुझ्यामुळे सगळ्या घराण्याची बदनामी होईल, लहानांची लग्न होणार नाहीत असे आणि अजूनही असंख्य आक्षेप असतात. मी म्हणते, आम्हाला निसर्गानेच जन्म दिलाय. तुम्ही पाळीव प्राण्यांना जीव लावता. पण आम्हाला अगदी अस्पृश्यच वागणूक देता. आम्ही कायम आदराची नजर आणि मायेचा स्पर्श यांना आसुसलेले राहतो. मानसिक छळ प्रचंड होतो. मग आमचे लोक नैराश्यात जातात, व्यसन करतात. मला सांग, ‘हिजडा ही शिवी का आहे?’ समाजानं काम दिलं असतं तर आम्ही भिक्षुकी केली असती का? लोकं आम्हाला बोलतात, ‘कामं करा ना !’ पण काम देतं कोण? ‘ए तू बायल्या, तू छक्का’ असं सगळे बोलतात. आम्ही व्यवहारात निव्वळ माणूस म्हणून जगा-वागायचं ठरवतोही; पण समाजच आम्हाला विसरू देत नाही आमची लैंगिक ओळख. ब्रिटिशांनी पारध्यांसारखंच आम्हालाही गुन्हेगार घोषित केलं. तो कलंक हळूहळू पुसट होतोय. पण प्रशासन अजूनही खूप सनातन आहे. पोलीसही आमची तक्रार नोंदवून घेत नाही. आम्ही या देशातच जन्मलोय, वाढलोय. संविधानातले हक्क आम्हाला कधी मिळणार? साधी भाड्यानं राहायची जागा मिळत नाही. मग नाइलाजानं झोपडपट्टीत राहावं लागतं. आम्हीपण सुधरू ना; पण संधी कुठायत? माझे बरेच शिष्य चांगलं शिकलेत. अनेकांना अजून शिकण्याची इच्छा आहे. पण कॉलेजात चांगली वागणूक मिळत नाही. शिकलेल्यांना नोकरी मिळत नाही. आता तू म्हणतेस हे सगळं कसं निवळेल? तर मला वाटतं, आमच्याबाबतची शास्त्रीय माहिती विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातच दिली पाहिजे. आम्हाला राजकीय, शैक्षणिक आरक्षण पाहिजे. ज्यांनी आमचं आयुष्य जगलं-भोगलंय त्यांनीच आमचे प्रश्न मांडले पाहिजेत. आता तरी आम्हाला पुरेशी राजकीय ओळखच नाही. सामाजिक मान्यता मिळण्यासाठी अजून खूप मैल चालावं लागेल...कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सन्मानानं निमंत्रित केल्या गेलेल्या गौरी सावंत. तृतीयपंथी समाजातल्या अनुभवी कार्यकर्त्या आहेत. बोलताना सुरुवातीलाच एक सुन्न करणारं निरीक्षण नोंदवतात. चळवळीच्या कामानिमित्त देश-विदेशात प्रवास होतो. एकदा भारतात एका विमानतळावर मी बसलेली होते. केबीसीमध्ये झळकल्यामुळे अनेक लोक मला ओळखायला लागले. एक बाई आपल्या मुलीला घेऊन जवळ आली. मला दोन हजाराची नोट देत म्हणाली, माझ्या मुलीला आशीर्वाद द्या. दोन हजाराची नोट पाहून वाटलं, पूर्वी पन्नास-शंभराची नोट मिळायची. आता भिक्षुकीच्या क्षेत्रातही माझं प्रमोशन झालं! आम्ही तृतीयपंथी आहोत म्हणजे भिक्षुकी करणं हेच आमचं भागधेय आहे का? आम्हाला कार्यकर्ता, शिक्षक, खेळाडू अशा कुठल्या रूपात स्वीकारूच शकत नाही का तुम्ही?माझे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांना लिंगबदल करायचाय. पण नोकरी सुटेल म्हणून ते करू शकत नाहीत. पुरुषांच्या शरीरात स्त्रीचं मन घेऊन घुसमटत राहतात. मी म्हणते, तुम्ही कोण देणारे आणि मी कोण घेणारी? क्वालिफिकेशन असेल तर हवी ती नोकरी मिळणे हा हक्कच आहे आमचा. पण कितीही शिका, काम करा, प्रसिद्ध व्हा, साधा कुटुंबात स्वीकार मिळत नाही. आजच्या आधुनिक म्हणवणाºया नागरी समाजात खरं तर हा इश्यूच नसला पाहिजे. आमच्यासाठी महिला-बालविकास मंत्रालयानं आजवर काय केलंय? जात, पितृसत्ता असे सगळेच काच आम्हाला सोसावे लागतात. अज्ञानात सुख असतं म्हणतात, समज वाढली की दु:ख अजून गडद होत राहतं. मला आता जुन्या आणि मधल्या पिढ्यांकडून अपेक्षाच नाही. नव्या पिढ्यांसाठी शाळा-कॉलेजातच जेण्डर सेन्सिटीव्हिटी घडवली पाहिजे. तृतीयपंथीयांचा होणारा मानसिक-शारीरिक छळ बहुपदरी असतो. सार्वजनिक ठिकाणी अवमान, टिंगलटवाळी होणं, त्यांना पाहताच पुरुषांनी लैंगिक अपेक्षा करणं आणि स्त्रियांनी बावरणं-बिचकणं, सतत अस्पृश्यांसारखी वागणूक मिळणं हे तर आहेच. कुठं काम मिळालंच, तर कामाच्या ठिकाणी काही गहाळ झाल्यास पहिला आरोप यांच्यावर होतो. राहायला भाड्यानं घर मिळत नाही, कारण लोकांना भीती असते, ‘हे इथं देहविक्र करतील’. यातून तृतीयपंथी व्यक्ती कणाकणानं खचत जाते. सतत नकार देणाºया भवतालाबाबत तिच्या मनामेंदूत एक साहजिक कटुता जन्मते.यंदा मार्चमध्ये माधुरी सरोदे आणि जय शर्माची जोडी बातम्यांचा विषय बनली. दोघांनी वाजतगाजत धार्मिक पद्धतीने लग्न केलं. माधुरी सांगते, ‘महाराष्ट्र तृतीयपंथी संघटने’तर्फे आम्ही ज्ञानू कांबळे आणि इतरही उल्लेखनीय काम केलेल्या आमच्या समूहातल्या व्यक्तींचा येत्या काळात सत्कार करणार आहोत. काही कौशल्यं आमच्यातही आहेत हे एव्हाना समाजाला कळलंय. पण आम्हाला स्वीकारण्याचा वेग कमी आहे. ‘अलायन्स इंडिया’ या प्रकल्पात मी सध्या ठाण्यात ट्रेनिंग आॅफिसर म्हणून काम करते. राज्यभरातल्या विविध एनजीओजचे कार्यकर्ते आमच्याकडे प्रशिक्षण घेतात. मला त्यांच्याकडून बहुतांश चांगलेच अनुभव आलेत. एकमेकांची मन जोडणं संवादातूनच हे होऊ शकेल. माझी तृतीयपंथी ही ओळख लोकांनी विसरून जावी, असा माझा वावर असतो. लोक स्वीकारायला बिचकतात हे खरंय; पण आपणही दोन पावलं पुढं जावं असं मला आमच्या कम्युनिटीबाबत वाटतं. मी आता प्रसिद्ध झाल्यानं माझ्याशी लोक आदरानंच बोलतात. पण समूहातल्या इतरांचं काय? लोकांना आमच्याबद्दल नेमकं काय आणि का वाटतं हे अजूनच खोदून-खोदून शोधलं पाहिजे. तर उत्तरांच्या दिशेनं जाता येईल. आम्ही अनेक शोषितांचं दु:ख समजून घेतलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर नीट करून घेतला पाहिजे. अनेकदा आमच्याबाबत गैरसमज पसरवले जातात. ते दूर करण्यासाठी सोशल मीडिया खूप प्रभावी ठरतोय.गेल्यावर्षी सादर करण्यात आलेलं प्रोटेक्शन आॅफ राइट्स आॅफ ट्रान्सजेण्डर पर्सन्स बिल लोकसभेत सादर झालंय. आता ते स्टॅण्डिंग कमिटीसमोर विचाराधीन आहे. तृतीयपंथीयांना स्वतंत्र आयडेण्टीटी बहाल करण्यासह त्यांच्यासोबत होणारा भेदभाव थांबवणं हा त्याचा हेतू आहे. कायदा धाक घालू शकेल. पण मनं-मतं बदलायला अजून काहीतरी जास्त पाहिजे.जेमतेम वीस वर्षांची विजया अगदी नकळत्या वयापासून चित्रपटसृष्टीत काम करते. कामानिमित्त देशभर फिरते. विशीची. सिरियल्स आणि सिनेमात काम करतेय. विजयाला माणूस म्हणूनच प्रेझेंट व्हायचंय. तृतीयपंथी असूनही ती इंडस्ट्रीत काम करते. ती म्हणते, मी कुटुंबाबरोबर राहते; पण त्यांना समजावण्याचा संघर्ष अवघडच होता. इतर नातेवाईक अजूनही स्वीकारत नाहीत. काही मोजकेच लोक प्रतिष्ठा देतात; पण रस्त्यावर काय? हम सिर्फ ताली नही बजा सकते, और भी बहुत कुछ कर सकते है. माध्यमातले लोकही आमच्याबाबत अनेक गैरसमज बाळगून असतात. आम्हाला ओळखा कधीतरी. आमचे काच कसे कळतील त्याशिवाय? त्यासाठी शोधलं पाहिजे, या सगळ्यांची मुळं नक्की कुठं आहेत? तृतीयपंथी म्हणवणाºयांच्या जगण्या-वागण्यात, समाजात, अंधश्रद्धा-गैरसमजात की अजून कशा-कशात?ही मुळं शोधून त्यांना उखडण्याचे प्रयत्नही सुरू आहेतच. ‘अनाम प्रेम’ हा अनेकार्थाने वंचित असलेल्यांसाठी काम करणाºयांचा एक प्रभावी ग्रुप. या ग्रुपचे सदस्य देशभरात पसरलेत. ‘अनाम’ मूकबधिर, दृष्टिहीन, अनाथ, तृतीयपंथी अशा अनेक समाजघटकांसाठी काम करते. गेल्या १५ वर्षांपासून ‘अनाम’साठी काम करणारी कृपाली बिडये सांगते, ‘अनाम’चे उपक्र म तसे १९९३पासून सुरू आहेत. आमची कुठली नोंदणीकृत संस्था नाही. आम्ही कुठल्या देणग्याही घेत नाही. ‘प्रेम सगळ्या समस्या सोडवू शकतं’ हे आमचं घोषवाक्य. प्रेमातूनच स्वीकाराची प्रक्रि या चांगली होते. २००५ पासून तृतीयपंथीयांसाठी काम करतोय. त्यांच्या संघर्षाला सलाम करणं एवढाच हेतू होता. मात्र तोवर आम्हा कार्यकर्त्यांना त्यांच्या जगण्या-भोगण्याबाबत खूपच जुजबी माहिती होती. हरेक क्षणी लोकांच्या नजरेतलीही घृणा कशी सहन करावी लागते, रक्ताचे लोक कसे दूर जातात, असुरक्षित वातावरणात श्वास कसा घुसमटतो याची जुबानी प्रत्यक्ष तृतीयपंथीयांकडून ऐकली. वाटलं, हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे. यांच्या दु:खावर उतारा शोधायला अनेक पातळ्यांवर काम करावं लागेल. कसंय, मुळात आपली समाजव्यवस्था पितृसत्ताक. स्त्रियांनाही तिचा फटका बसतोच. तृतीयपंथीयांबाबत तर समाज सतत डीनायक मोडवर असतो. ‘तृतीयपंथी’ या ओळखीला चिकटलेल्या धारणा, अंधश्रद्धा स्वच्छ करत या ओळखीला ‘नॉर्मलाइज करायची गरज आहे.‘अनाम’ने या समूहासाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करून त्या विस्तारता कशा येतील याचे प्रयत्नही चालवलेत. कृपाली सांगते, ‘अनेक तृतीयपंथी मेहेंदी रचण्यात, मेकअप करण्यात वाकबगार असतात. ‘अनाम’च्या ग्रुप्समध्ये कुणाकडेही लग्न किंवा इतर कार्यक्र म असू दे, आम्ही आवर्जून आमच्या तृतीयपंथी मैत्रिणींनाच मेंदी मेकअप, रांगोळीची कामं द्यायला सुरू केली. त्यांना कौशल्यानुरूप रोजगार मिळाला. आमचं पाहून हळूहळू त्या समारंभात येणाºया लोकांनीही वेळोवेळी यांना बोलवायला सुरुवात केली. बदल असा हळूहळू; पण मुळातून व्हायला हवाय. लोक या समूहाकडे सतत ‘पैशाच्या बदल्यात आशीर्वाद’ अशाच एकारल्या नजरेतून बघतात. हे बदलून ‘पैशाच्या बदल्यात कौशल्य’ असा दृष्टिकोन तिथं रुजवायचाय.’दृष्टी बदलण्याची गोष्ट येते तेव्हा गौरी सावंत, पिंकी शेख, स्वत:ला शब्दवेडी म्हणवणारी कवयित्री दिशा शेख, रंग-रेषांमध्ये रमणारी प्राची, माधुरी सरोदे, विजयालक्ष्मी या सगळ्याजणींची फेसबुक वॉल मला आधुनिक जगातलं प्रबोधनमाध्यम वाटतं.दिशा कधी लग्नात नाचणाºया तिच्या मैत्रिणींचे फोटो टाकते, कधी कुणा नॉन-ट्रान्सजेण्डर मित्र-मैत्रिणीच्या घरी मुक्काम केल्यावर त्या अनुभवाबाबत सांगते तर कधी बाजारात ती करत असलेल्या मंगतीला (भिक्षुकी) थेट ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून समोर ठेवते. या सगळ्याच मैत्रिणींचा आॅनलाइन वावर मला-तुम्हाला एका वेगळ्याच ‘तिसºयांच्या’ जगाशी मुखातीब करतो. या मैत्रिणींनी वेळोवेळी सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक विषयांवर नोंदवलेली परखड मतं त्यांना ‘तृतीयपंथी’ या ओळखीपलीकडे घेऊन जाणारी असतात. त्यांच्या पोस्ट्समधले विचार, सवाल, भावना आणि कमेंट्समध्ये त्यावर रंगलेले वाद-संवाद यातून अनेकजण अधिक समजदार, सहिष्णू बनत जातात. या सगळ्याजणी करत असलेला ‘व्हर्च्युअल स्पेस’चा वापर समाजाला कळत-नकळत शहाणं बनवतो आहे.मला वाटतं, तृतीयपंथीयांच्या स्वीकाराला मिळत असलेल्या नकाराची मुळं चुकीच्या लैंगिक धारणांमध्ये लपलीत. ‘स्त्री’ आणि ‘पुरु ष’ या दोन लैंगिक ओळखीच मुळात आपण कमालीच्या सनातन आणि अपरिवर्तनीय पद्धतीनं वागवतोय, हाताळतोय. अमुक-अमुक म्हणजे ‘फेमिनाइन’ आणि तमुक म्हणजे ‘मस्क्युलाइन’वाल्या गैरसमजांचं जोखड जोवर मना-मेंदुवरून सैल होत नाही, तोवर या दोन्हींच्या पलीकडं असणाºया बहुलिंगी व्यक्तींचं इथलं जगणं कसं बदलेल? निसर्गानं निर्माण केलेल्या अनेकविध लैंगिक ओळखींकडे सहजपणे पाहण्याची, त्यांना सन्मानाने स्वीकारण्याची पात्रता आपसूक येणार नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. या प्रयत्नांची वाट बहुलिंगी समाजाच्या जगण्यासह बाकीच्या समाजालाही उन्नत करणारी असेल!
‘अनाम प्रेम’चे बोलके प्रयत्न‘‘अनाम प्रेम’चे लहान-मोठे प्रयत्न केवढे तरी बोलके आहेत. त्यांनी तृतीयपंथीयांवर काही फिल्म्स बनवल्या. सोबतच काही गेम्स बनवलेत. उदा. स्पर्शाचा गेम. सिग्नलवरच्या तृतीयपंथी व्यक्तीला डोळ्यांवर पट्टी बांधायची. मग उभ्या असलेल्या गर्दीतल्या लोकांपैकी कुणीही त्याचा हात धरून पलीकडच्या बाजूला सोडून यायचं. स्पर्शातून स्त्री-पुरु षांची भीती कमी होण्याची सुरुवात होते.अजून एक सुरेख उपक्र म त्यांनी २०१० पासून चालवलाय. यात दहा कुटुंबं प्रत्येकी एका तृतीयपंथी व्यक्तीला स्वत:च्या घरी जेवायला किंवा नास्त्याला बोलवतात. आणि पुन्हा एकत्र येऊन आपापले अनुभव एकमेकांसमोर ठेवतात. मुंबईसह देशभर गुजरात, कर्नाटक आणि देशभरात हा उपक्र म दरवर्षी घेतला जातो. यावर्षी तर त्या त्या कुटुंबांनी आपापल्या शेजाºयांनाही सहभागी करून घेतलं. फॅमिली मीट ‘कम्युनिटी मीट’ बनली.अजून एक मोठा प्रयोग म्हणजे ‘अनाम’ने ‘ट्रान्स अॅण्ड हिजडा एम्पावरमेंट मेला’ सुरू केला. या मेळ्यात सहभागी व्हायला १५ राज्यातून तृतीयपंथी समूह येतात. इथं खाद्यपदार्थांसह इतर अनेक उपयोगी वस्तूंचे स्टॉल्स लावले जातात. ‘अनाम’च्या कार्यकर्त्यांना आधी भीती होती, की तृतीयपंथीयांनी बनवलेले खाद्यपदार्थ लोक खातील का? पण अक्षरश: ४-५ तासात फूड स्टॉल्सवरचं सगळं संपलं. पहिली तृतीयपंथी न्यायाधीश बनलेली जोयीता मंडल हीसुद्धा या मेळ्याला आली होती. शिवाय, मेळा संपल्यावर ‘अनाम’ने या देशभरातून आलेल्या समूहांसोबत ग्रुप डिस्कशन्स आणि प्रश्नोत्तरं केली. त्यातून समोर आलेल्या बाबींचा एक अहवाल बनवून तो ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन’ला पाठवला.
तृतीयपंथीयांसाठी केरळचं स्वतंत्र धोरणकेरळ शासनाच्या सामाजिक न्याय विभागानं गेल्यावर्षीच तृतीयपंथीयांसाठी त्यांच्या राज्यापुरतं स्वतंत्र धोरण तयार केलंय. हे असं धोरण तयार करणारं केरळ पहिलं राज्य ठरलंय. या अहवालातली सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते, ‘वेगळ्या लैंगिक ओळखीमुळे नोकरीसाठी किमान एकदा नकार मिळालेले तृतीयपंथी आहेत १००टक्के, एखादी बरी नोकरी मिळालेले केवळ ११.६टक्के, पोलिसांच्या छळाला सामोरे गेलेले ५२ टक्के, जोडीदार वा नातेवाइकाच्या लैंगिक अत्याचाराचे बळी ठरलेले २८ टक्के, झालेल्या छळाबाबत तक्र ार करायला घाबरणारे ९६टक्के, आपली लैंगिक ओळख समाजात वा शासकीय कागदपत्रांवर जाहीर न करणारे ७८टक्के, कुटुंबापासून लैंगिक ओळख लपवणारे ५१टक्के, लैंगिक ओळख बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेऊ इच्छिणारे; पण कुणाचंही पाठबळ नसलेले ८१टक्के. कोची मेट्रोच्या तृतीयपंथी कर्मचाºयांनी नाइलाजानं राजीनामे देण्याची घटना या आकडेवारीला पुष्टी देणारी आहे.