- पवन देशपांडे
आधी केवळ तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या आणि बहुतेकांची व्यक्त होण्याची हक्काची जागा असलेल्या फेसबुकच्या अधोगतीचे दिवस सुरू झाले की काय, अशी शंका आता सध्याची परिस्थिती पाहता उपस्थित होऊ लागली आहे. केंब्रिज ॲनालिटिकापासून सुरू झालेला हा वादाचा अध्याय अजूनही संपायला तयार नाही. त्यामुळे फेसबुकच्या एकूणच भविष्याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. जाणून घेऊ फेसबुकचे काय चुकतेय आणि त्याचा फटका कंपनीला कसा बसतोय, बसू शकतो...
काय चुकत गेले?
१. अमेरिका आणि इतर देशांमधील निवडणुकांमध्ये लोकांच्या विचारांवर परिणाम करतील अशा पोस्ट सातत्याने दाखविण्यात आल्या. त्याचे कनेक्शन थेट फेसबुकपर्यंत आले आणि आता तर याच प्रकरणात थेट मार्क झुकेरबर्गला प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल कंपनीच्या विरोधात लागला तर शिक्षा थेट झुकेरबर्गलाही होऊ शकते.
२. युजर्सच्या माहितीच्या सुरक्षेपेक्षा कंपनीने कायम आर्थिक फायद्याचे गणित पाहिल्याचा आरोप कंपनीच्याच एका माजी बड्या कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी केला होता. थेट अमेरिकन काँग्रेसमध्ये हा सगळा प्रकार झाल्याने फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
३. गेल्या आठवड्यात फेसबुक ६ तास बंद होते. त्यामुळे फेसबुकचे जसे नुकसान झाले, तसेच ज्यांचा व्यवसाय फेसबुकवर अवलंबून आहे त्यांनाही फटका बसला.
४. फेसबुकला नुकताच ५२० कोटी रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. आतापर्यंत कंपनीला झालेली ही सर्वांत मोठी दंडाची शिक्षा आहे. दंडाची रक्कम कंपनीचा एकूण आकार पाहता मोठी नसली तरीही त्यातून कायद्यांना फाटा देण्याची कंपनीची वृत्ती समोर आली आहे.
याचा परिणाम काय होणार?
१. जगातील कोणतीच कंपनी सदैव नंबर एकवर राहिलेली नाही. एखादी नवीन कंपनी येऊन जलदगतीने पुढे गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. येत्या काळात फेसबुकचे तसे झाले नाही तरच नवल.
२. फेसबुकवर आपली माहिती सुरक्षित असते, असा समज करून जे युजर्स सर्रास फेसबुक वापरतात त्यांनाही कदाचित फेसबुकवर शंका निर्माण होऊ शकते.
३. फेसबुकवरील आपल्या डेटाचा गैरवापर होईल याची भीती युजर्सना कायम असतेच. ती वाढत गेली तर युजर्सची संख्या, वाढीची गती कमी होत जाईल.
शेअर घसरू शकतो...
यावर्षी फेसबुकच्या शेअरने ३८२ डॉलर प्रति शेअर असा उच्चांक गाठला होता. तो आता ३४० डॉलरवर आला आहे. महिनाभरात फेसबुकचा शेअर ४० डॉलरने घसरला.
* ६ अब्ज डॉलर्सचा फटका फेसबुकला एकाच दिवसात बसला आहे.
*६ तासांच्या बंदमुळे मोठे नुकसान फेसबुकला सहन करावे लागले होते.
*२० अब्ज डॉलर्सने मार्क झुकेरबर्गची संपत्ती घटली.
(सहायक संपादक, लोकमत)
pavan.deshpande@lokmat.com