प्रश्न- तुम्ही ज्या गावात इंग्रजी विषयाचे उपक्रम करता त्या गावाची लोकसंख्या किती व त्या गावातील लोकांचे व्यवसाय काय आहेत?
- खरे तर या गावात सगळे कष्टकरी लोक राहतात. बहुसंख्य लोक ऊसतोडीला जातात. शेतकरी व कष्टकरी लोक जास्त आहेत. गावात फक्त एक नोकरदार आहे. गावाची लोकसंख्या १,३०० आहे; पण या गावातील मुलांना आम्ही इंग्रजीचा आत्मविश्वास देतो आहोत.
प्रश्न- तुम्हाला इंग्रजी विषयात आपण काम करावे, असे का वाटले? त्याचा परिणाम काय दिसतोय? - माझे शिक्षण पुण्यात झाले आहे. शहरी व ग्रामीण शिक्षणात फरक पडण्याच्या महत्त्वाच्या कारणात इंग्रजी हे महत्त्वाचे कारण आहे, असे माझ्या लक्षात आले. इंग्रजी माध्यमाकडे जाणारे विद्यार्थी थांबवायचे असतील, तर मराठी शाळेतून इंग्रजी विषय प्रभावी शिकवला गेला पाहिजे, असे वाटायला लागले. ब्रिटिश काऊन्सिलच्या प्रशिक्षणात जायची संधी मिळाली व त्यातून मुलांचा व माझा इंग्रजीतला आत्मविश्वास वाढला. आम्ही गावापुढे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी बोलण्याचे सादरीकरण केले. विद्यार्थी गावातील नागरिकांच्या मुलाखती घेतात. एक विद्यार्थी इंग्रजी शाळेत शिकतो. त्याचे पालक माझ्याकडे येऊन तिकडची फी इकडे देतो, असे म्हणत आहेत. इतका सकारात्मक बदल इंग्रजी विषय चांगला शिकवला त्यातून दिसतो आहे.
प्रश्न- शिक्षकांच्या इंग्रजी सुधार प्रकल्पात तुम्ही अनेक प्रशिक्षणे घेतली, यात तुम्ही शिक्षकांना इंग्रजीबाबत कसे मार्गदर्शन करता? - ब्रिटिश काऊन्सिलच्या तेजस प्रकल्पात माझी तालुका समन्वयक म्हणून निवड झाली. यातून आम्ही शिक्षकांच्या मनातील इंग्रजी अध्यापनाची भीती दूर करू शकलो. रोल प्ले, अॅक्टिव्हिटी, वेगवेगळ्या चित्रफिती दाखविणे यामधून हळूहळू वर्गातील इंग्रजीचा वापर वाढू लागला. शिक्षकांच्या प्रशिक्षणात आम्ही शिक्षकांचे विविध गेम्स घेतले. त्यात शिक्षकांना सहभागी केले. ब्रिटिश काऊन्सिलने लर्न इंग्लिश पाथवेज भाग-१ व भाग-२ हे ऑनलाईन कोर्सेस शिक्षकांनी केले. आॅनलाईन कॉन्फरन्समध्ये शिक्षक सहभागी होऊ लागले. आम्ही शिक्षकांचा इंग्रजी क्लब सुरू केला आहे. त्यात आम्ही नियमित प्रत्येकाचे उपक्रम बघतो व चर्चा करतो. एक विषय घेऊन त्यावर चर्चा करतो. यातून शिक्षकांचा इंग्रजी विषयाचा आत्मविश्वास वाढला आहे
प्रश्न- तुम्ही स्वत: इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायला काय प्रयत्न केले? - माझे इंग्रजी फार विशेष नव्हते; पण मी त्यासाठी हे ऑनलाईन कोर्स केले. त्यानंतर टी.व्ही.वर नियमित इंग्रजी बातम्या ऐकते. अनेक ऑनलाईन ब्लॉग्ज इंग्रजी शिकण्याबाबत शिक्षकांनी लिहिलेले आहेत. ते मी वाचते. सुरुवातीला मी शिक्षकांना फोन करायची व म्हणायची की आपण आता इंग्रजीत बोलू. मी तो फोनकॉल रेकॉर्ड करायची व नंतर पुन्हा ऐकायची व त्यात होणाऱ्या चुकांवर विचार करायची यातून इंग्रजी बोलणे सुधारत गेले.
प्रश्न- तुमचे विद्यार्थी इंग्रजीत काय काय करू शकतात? - माझे विद्यार्थी कोणत्याही विषयावर ५ ते १० वाक्ये बोलू शकतात. समोरच्याला काही प्रश्न विचारू शकतात. अंताक्षरीसारखे स्पेलिंगचे गेम खेळू शकतात. एकमेकांशी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनातून इंग्रजीची भीती गेली आहे.
प्रश्न- स्काऊट व गाईड उपक्रम जिल्हा परिषद शाळेत फारसा नसतो; पण हा उपक्रम तुमच्या शाळेत दिसतो? - मला शाळेत एनसीसीचे आकर्षण होते. स्काऊट गाईडची माहिती घेऊन मी माझ्या शाळेत सुरू केले. २४ मुलींना घेऊन जिल्हा मेळाव्यात मी राहुटीत राहिले. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर म्हैसूर येथे आम्ही मुलींना घेऊन सहभागी झालो. या माध्यमातून विविध पथनाट्ये सादर केली. त्यातून सामाजिक जागृती होत आहे. निसर्ग सहल, खरी कमाई, पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान, शोभायात्रा, यात मुलींसह मी सहभाग घेतला. त्यातून मुलींमध्ये सामाजिक भान निर्माण व्हायला मदत झाली.
- हेरंब कुलकर्णी